Tuesday, March 24, 2026

Iran-US-Israel War : धक्कादायक! इस्रायलचा तेहरानमधील रुग्णालयावर हल्ला

Iran-US-Israel War : धक्कादायक! इस्रायलचा तेहरानमधील रुग्णालयावर हल्ला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ले पाच दिवस थांबवण्याची घोषणा केली असतानाही इस्रायल आणि अमेरिकन सैन्याने तेहरानमधील एका रुग्णालयाला लक्ष्य केल्याचा दावा करण्यात आला आहे. इराणच्या एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, तेहरानच्या नैऋत्येकडील एंडीमेश्क शहरातील इमाम अली रुग्णालयावर अमेरिका आणि इस्रायलने थेट हल्ला केला. या हल्ल्यात रुग्णालयाचे मोठे नुकसान झाले आहे. या थेट हल्ल्यानंतर रुग्णालय पूर्णपणे रिकामे करण्यात आले असून सध्या ते सेवाबाह्य झाले आहे.

वृत्तवाहिनीने रुग्णालयातील नुकसानीचा व्हिडिओही प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये ओपीडी, आयपीडी आणि आपत्कालीन विभागांच्या इमारतींचे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे. हे शहरातील एकमेव प्रमुख रुग्णालय असल्याने हल्ल्यानंतर रुग्णांना तातडीने इतर शहरांतील रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले. रुग्णालयाची इमारत, वैद्यकीय उपकरणे, प्रयोगशाळा आणि कॉरिडॉरमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाल्याचे दिसून आले. अलीकडील काळात इराणवर झालेल्या अमेरिका-इस्रायल संयुक्त हल्ल्यांच्या मालिकेतील हा एक भाग असल्याचे सांगितले जात आहे, ज्यामध्ये खुजेस्तान प्रांतातील एंडीमेश्क परिसराला लक्ष्य करण्यात आले.

इराणच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते होसैन करमानपूर यांच्या हवालीने वृत्तवाहिनीने म्हटले आहे की, हवाई हल्ल्यात रुग्णालयाचे गंभीर नुकसान झाले आहे. इराणी सरकारने या घटनेला युद्धगुन्हा घोषित केले आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला असून उपचार व्यवस्था विस्कळीत झाली आहे.आतापर्यंत मोठ्या जीवितहानीची अधिकृत पुष्टी झालेली नसली तरी एका बालकाच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे.

इराणी माध्यमे आणि सरकारी सूत्रांनी या हल्ल्याचा निषेध करत नागरी आरोग्य सुविधांना लक्ष्य करणे हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना असून परिसरात तणावपूर्ण परिस्थिती कायम आहे. या घटनेमुळे इराणमधील इराणमधील आरोग्य सेवांवर गंभीर परिणाम झाला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >