Tuesday, March 24, 2026

Iran-US-Israel War : इराणकडून हल्ल्यासाठी पश्चिम आशियातील वीज, जल प्रकल्पांची यादी जाहीर

Iran-US-Israel War : इराणकडून हल्ल्यासाठी पश्चिम आशियातील वीज, जल प्रकल्पांची यादी जाहीर

अमेरिकेकडून इराणच्या ऊर्जा केंद्रांवर हल्ला करण्याची धमकी देण्यात आल्यानंतर, त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने संपूर्ण पश्चिम आशियातील ऊर्जा आणि जल प्रकल्पांवर हल्ला करण्याचा इशारा दिला होता. आता इराणने ही धमकी पुन्हा देत पश्चिम आशियातील ऊर्जा केंद्रे आणि जल प्रकल्पांची यादी जाहीर केली आहे. इराणच्या माध्यमांनी ही यादी प्रसिद्ध केली असून, इराणला आपल्या लक्ष्यांची सविस्तर माहिती असल्याचे यातून स्पष्ट होते. त्यामुळे पश्चिम आशियातील देशांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

इराणची सरकारी न्यूज एजन्सी, जी इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) च्या जवळची मानली जाते, तिने पश्चिम आशियातील ऊर्जा आणि जल प्रकल्पांची यादी जाहीर केली आहे. या यादीत मध्य पूर्वेतील अनेक महत्त्वाचे वीज प्रकल्प आणि समुद्राच्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणारे (डिसॅलिनेशन) प्रकल्प समाविष्ट आहेत.या यादीत संयुक्त अरब अमिरातीमधील बराकाह अणुऊर्जा प्रकल्पाचाही समावेश आहे. या प्रकल्पात चार अणुभट्ट्या असून तो सौदी अरेबियाच्या सीमेच्या जवळील पश्चिमेकडील वाळवंटी भागात स्थित आहे.

इराणच्या न्यायव्यवस्थेशी संबंधित एका न्यूज एजन्सीनेही याच प्रकारची यादी प्रसिद्ध केली आहे. तेहरानकडून देण्यात आलेल्या या इशाऱ्यामुळे खाडी देशांतील वीज आणि पाणीपुरवठ्यावर धोका निर्माण झाला आहे. विशेषतः वाळवंटी प्रदेशातील या देशांमध्ये वीज निर्मिती केंद्रे आणि समुद्राच्या पाण्याचे पिण्यायोग्य पाण्यात रूपांतर करणारे प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे मानले जातात.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेला ४८ तासांचा अल्टिमेटम मंगळवारी मध्यरात्री संपणार आहे. ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार जर अमेरिकेने इराणच्या ऊर्जा केंद्रांवर हल्ला केला, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून इराण पश्चिम आशियातील ऊर्जा आणि जल प्रकल्पांना लक्ष्य करू शकतो. त्यामुळे हा संघर्ष संपूर्ण खाडी प्रदेशात पसरू शकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आधीच जागतिक तेलपुरवठ्यावर परिणाम झाला असून जगभरात तेल आणि वायूच्या किमती वाढल्या आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >