Tuesday, March 24, 2026

Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

नाशिकमध्ये गाजत असलेल्या महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी अशोक खरात याला न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कोठडीची मुदत संपल्यानंतर आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. तपासासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचे सांगत सरकारी पक्षाने कोठडी वाढवण्याची मागणी केली होती, जी न्यायालयाने मान्य केली.

कोर्टात कडेकोट बंदोबस्त, मोठी गर्दी :

खरातला न्यायालयात आणण्यापूर्वी त्याची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर कडेकोट पोलीस बंदोबस्तात त्याला कोर्टात हजर करण्यात आले. प्रकरणाच्या संवेदनशीलतेमुळे न्यायालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान वकिलांचीही मोठी उपस्थिती पाहायला मिळाली.

एसआयटी कडून धक्कादायक खुलासे :

सुनावणीदरम्यान एसआयटी अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी तपासातील महत्त्वाची माहिती न्यायालयासमोर मांडली. आरोपी महिलांना खडे, पेढे देत असे तसेच पाण्यात काही पदार्थ मिसळून देत असे, ज्यामुळे त्या अस्वस्थ होत आणि त्यानंतर त्यांचे शोषण केले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.

तपासात आरोपीकडून मोठी रोकड, लॅपटॉप, तसेच एक रिव्हॉल्व्हर आणि काडतुसे जप्त करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली. काही काडतुसे वापरले गेल्याचा संशय असून त्याचा तपास सुरू आहे. तसेच नरबळी दिल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला.

‘सिद्ध पुरुष’ असल्याचा दावा, फसवणुकीचे जाळे :

अशोक खरात स्वतःला ‘सिद्ध पुरुष’ सांगत लोकांची फसवणूक करत असल्याचा आरोप आहे. भीती निर्माण करण्यासाठी साप, वाघ यांचा वापर केला जात होता. तसेच कस्तुरीसारख्या वस्तूंचा वापर करून वन्यजीव कायद्याचे उल्लंघन झाल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला.

बचाव पक्षाचा युक्तिवाद :

बचाव पक्षाने सात दिवसांत पुरेसा तपास झाल्याचा दावा करत पुढील पोलीस कोठडीची गरज नसल्याचे सांगितले. आवश्यक पुरावे आधीच जप्त झाले असून पुढील तपास न्यायालयीन कोठडीतही होऊ शकतो, असा युक्तिवाद करण्यात आला.

सरकारी पक्षाची भूमिका ठाम :

सरकारी वकिलांनी मात्र प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे सांगत पुढील तपासासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. आर्थिक व्यवहार, कथित धार्मिक विधी आणि इतर बाबींचा तपास अद्याप बाकी असल्याचे त्यांनी नमूद केले.

कोर्टात आरोपीची प्रतिक्रिया :

सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी विचारल्यानंतर अशोक खरातने साप आणि वाघ याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. तसेच मंदिरात तो अधूनमधून जात असल्याचेही त्याने नमूद केले.

एकूणच, गंभीर आरोप आणि तपासातील नव्या बाबी लक्षात घेता न्यायालयाने आरोपीला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा