पुणे : सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे तसेच नगरपरिषद राजगुरुनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वंदे मातरम्’च्या सार्ध शताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आज राजगुरुनगर येथे उत्साहात संपन्न झाला.
शालीमार पॅलेस, चांडोली, राजगुरुनगर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास नागरिक, विद्यार्थी, कलाकार आणि सांस्कृतिक रसिकांचा मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रभक्तीपर वातावरणात करण्यात आली.
शहीदी दिनाच्या निमित्ताने संपूर्ण देश वंदन करत, शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव तसेच ‘वंदे मातरम्’चा आत्मा मूर्त रूपात साकारणाऱ्या आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना गौरवपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमात देशभक्तीपर गीत, संगीत, नृत्य आणि निवेदनाच्या माध्यमातून स्वातंत्र्य संग्रामाची प्रेरणादायी गाथा सादर करण्यात आली. कलाकारांच्या प्रभावी सादरीकरणामुळे उपस्थितांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत झाली.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेले स्वातंत्र्य संग्रामावर आधारित भव्य प्रदर्शन नागरिकांच्या विशेष पसंतीस उतरले. या प्रदर्शनामध्ये क्रांतिकारकांचे जीवनकार्य, ऐतिहासिक घडामोडी आणि ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांच्या प्रवासाचे प्रभावी चित्रण करण्यात आले होते. या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, उपस्थितांनी स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासाची माहिती आवर्जून जाणून घेतली.
या प्रसंगी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, बाबाजी काळे आमदार खेड, विवेक अग्रवाल (भा प्र से ) सचिव संस्कृति कार्य भारत सरकार, समर नंदा, सहसचिव संस्कृति कार्य भारत सरकार, डॉ किरण कुलकर्णी (भा प्र से ) सचिव सांस्कृतिक कार्य व मराठी भाषा विभाग उपस्थित होते. मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आपल्या मनोगतात शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या अद्वितीय बलिदानाचा गौरव करत, त्यांच्या देशभक्ती आणि त्यागातूनच ‘वंदे मातरम्’ची भावना अधिक बळकट झाल्याचे सांगितले. तरुण पिढीने या क्रांतिकारकांच्या विचारांपासून प्रेरणा घ्यावी, असेही त्यांनी आवाहन केले. या यशस्वी आयोजनाबद्दल महाराष्ट्र राज्य, सांस्कृतिक कार्य विभाग व स्थानिक जिल्हा प्रशासन सर्व संबंधित अधिकारी, कलाकार आणि सहकाऱ्यांचे आभार मानले.






