Monday, March 23, 2026

मुंबई महापालिका सभागृहात दिवंगत अलका केरकर यांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई महापालिका सभागृहात दिवंगत अलका केरकर यांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई: मुंबई महापालिकेच्या माजी उपमहापौर आणि प्रभाग क्रमांक ९८च्या भाजप नगरसेविका अलका केरकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने महापालिका सभागृहात शोक व्यक्त करत सर्व नगरसेवकांनी श्रध्दांजली वाहिली. शांत संयमी असे व्यक्तीमत्व असलेल्या अलका केरकर यांचे निधन म्हणजे सर्वच नगरसेवकांच्या मनाला चटका लावणारे आहे. त्यामुळे एका अभ्यासू नगरसेवकाला महापालिका मुकली अशाप्रकारच्या भावना सदस्यांनी व्यक्त करत त्यांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी अलका ताईंच्या सतत संपर्कात असणाऱ्या हेतल गाला आणि राजेश्री शिरवडकर यांना अश्रु आवरता आले नाही.

भाजपच्या प्रभाग क्रमांक ९७च्या नगरसेविका अलका केरकर यांचे लिलावती रुग्णालयात उपचार सुरु असताना शनिवारी सायंकाळी निधन झाले. अलका केरकर यांनी महापालिकेत सन २०१२मध्ये निवडून आल्यानंतर २०१४- २०१७पर्यंत उपमहापौरपद भूषवले होते. तसेच नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजय मिळवत त्यांनी विजयाची हॅट्रीक साधली होती. या नगरसेवक पदाच्या तीन टर्ममध्ये उपमहापौरपदासह स्थायी समिती, सुधार समिती, स्थापत्य उपनगरे तसेच वृक्ष प्राधिकरण आदी समित्यांमध्ये सदस्यत्व पद भूषवले. त्यांच्या निधनाचा शोक प्रस्ताव महापालिका सभागृहात मांडत महापौर रितू तावडे यांनी प्रभागात त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. पक्षनिष्ठा, भ्रष्टाचारविरोधी भूमिका आणि अनधिकृत कामांना कधीही थारा न देण्याचा त्यांचा ठाम स्वभाव होता. त्यामुळे त्या आदर्श नगरसेविका म्हणून जनमानसात ओळखल्या जात होत्या. सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्या नेहमी तत्पर असत. अलका केरकर ह्यांच्या निधनामुळे आपले शहर एका निष्ठावान सामाजिक कार्यकर्त्यास आणि एका जनहितदक्ष नागरिकास मुकले आहे, या शब्दांत महापौर रितू तावडे यांनी दिवंगत अलका केरकर यांना श्रद्धांजली अर्पित केली.

यावर बोलतांना सभागृहनेत्या गणेश खणकर यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांचा आलेला फोन याची आठवण सांगताना, 'ताईंनी मला फोन केला आणि माझी ठरावाची सूचना आपण मांडावी अशी सूचना केली होती',असे सांगितले. अत्यंत मनमिळावू व्यक्तिमत्व असलेल्या अलकाताई या वॉर्ड अध्यक्षा, महामंत्री तसेच अध्यक्षा झाल्या आणि त्यानंतर नगरसेविका झाल्या तरी त्यांच्यात काही बदल झाला नव्हता. त्यांच्या अंत्यविधीला लोटलेला जनसागर पाहता. त्यांचा जनसंपर्क किती दांडगा होता याचा प्रत्यय येतो. त्यामुळे आम्ही पक्षाच्या कार्यकर्ता, नेता तसेच लोकप्रतिनिधीलाही मुकलोच आहोत,अशा भावना व्यक्त केला.

यावर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनीही शोक व्यक्त आपल्याला त्यांच्या अंत्ययात्रेत मुंबईत नसल्यामुळे सहभागी होता आले नाही याबाबत खंत व्यक्त केली. महापौरपदाच्या स्पर्धेत त्यांचेही नाव होते, पण वयोमानानुसार कदाचित त्यांच्या पक्षाने विचार केला नाही. त्यामुळे अत्यंत शांत असे त्यांचे व्यक्तिमत्व असल्याचे सांगत त्यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.

भाजपच्या राजेश्री शिरवडकर यांनी त्यांच्या जुन्या आठवणी सांगत समोरचा कितीही आक्रमक झाला असला तरी आपण स्वत: शांत आणि संयमी कसे राहावे हे त्यांच्याकडून शिकावे असे सांगितले. यावेळी त्यांनी जुना किस्सा सांगत, उपमहापौर असताना त्याचा एक कार्यकर्ता मोठा आवाजात बोलत असताना त्या शांत बसून त्यांचे ऐकत होत्या. पण मलाच ते सहन झाले नाही आणि मी त्यांना शिपायाला बोलावून त्यांना बाहेर काढण्याची सूचना केली. पण त्यानंतर ते निघून गेल्यानंतर मला अलका ताईंनी समजावून सांगितले. हे आपले कार्यकर्ते आहेत आणि आपल्याकडून त्यांच्या काही अपेक्षा असतात. त्यामुळे त्यांचे ऐकून घेणे हे आपले कर्तव्य आहे. महापालिकेचे कामकाज कसे करावे हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो,असे सांगतानाच शिरवडकर यांचा कंठ दाटून आला होता.

विशेष म्हणजे अलका केरकर या नगरसेवक पदावर कार्यरत असताना त्यांच्या सतत संपर्कात राहणाऱ्या भाजपच्या नगरसेविका आणि बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्षा हेतल गाला यांना श्रद्धांजली अर्पित करताना त्यांना अश्रू अनावर झाले. अलका केरकर आई होत्या, मैत्रिण होत्या, एक आदर्श शिक्षिका होत्या आणि पालिका कामकाजासंदर्भात आम्ही कायमच त्यांचे मार्गदर्शन घ्यायचो, असे सांगत असतानाच त्यांना मुखातून शब्द फुटले नाही आणि त्या ढसाढसा रडू लागल्या.

तर भाजपच्या स्वप्ना म्हात्रे यांनी, दिवंगत अलका केरकर यांच्या निधनामुळे आपण त्यांच्या प्रेमाला मुकल्याची खंत व्यक्त केल्या. त्यांचे सर्वच भाषांवर प्रभूत्व होते आणि आम्ही विधानसभेत किंवा जिल्ह्यात कोणताही कार्यक्रम घ्यायचा असल्यास त्यांचे पत्रक किंवा काहीही केल्यास ते अलका ताईंच्या नजरेखालून घातल्या नाही असे व्हायचे नाही,असे सांगितले.आपल्या स्वभावाने आणि कामाने लोकांची मनोभावे सेवा करीत मने जिंकली,असे स्वप्ना म्हात्रे यांनी सांगितले. चौफेर नजर असणारे असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. तर मुर्ती लहान पण किर्ती महान असे त्यांचे व्यक्तिमत्व होत असे माजी महापौर विशाखा राऊत यांनी सांगितले, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला असे सांगत माजी महापौर श्रध्दा जाधव यांनी श्रध्दांजली वाहिली. यावेळी झालेल्या चर्चेत बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव, स्थापत्य समिती अध्यक्षा यामिनी जाधव , नगरसेवक प्रकाश गंगाधरे,प्रकाश दरेकर, प्रवीण छेडा, रहेबर खान आदींनीही जुन्या आठवणींना उजाळा देत दिवंगत अलका केरकर यांना श्रद्धांजली अर्पित केली. दरम्यान, बेस्ट समिती, स्थापत्य शहर समिती आणि स्थापत्य उपनगरे समितींच्या बैठकांमध्येही त्यांना श्रध्दांजली वाहत कोणतेही कामकाज न करता सभेचे कामकाज तहकूब केले.

ज्येठ नेते दत्ता मेघे यांना महापालिका सभागृहात श्रध्दांजली

माजी मंत्री आणि विदर्भातील ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे २२ मार्च रोजी दुःखद निधन झाल्याने त्यांनाही महापालिका सभागृहात महापौर रितू तावडे, सर्वपक्षीय गटनेते नगरसेवकांनी श्रद्धांजली अर्पित केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >