मुंबई : भोंदूबाबाचे कारनामे २००३ पासून सुरू होते, मात्र काँग्रेस सरकार आणि महाविकास आघाडी सरकारने त्याला बेड्या ठोकण्याची हिंमत दाखवली नाही. या भोंदूबाबाला पायघड्या घालण्याचे काम, भोंदूबाबाच्या आश्रमाला पाणी पुरवण्याचे काम उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मविआ सरकारने केले. महायुती सरकारमधील नऊ मंत्र्यांना त्यांचे भोंदूबाबासोबत फोटो आहेत म्हणून त्याला आक्षेप घेत सहआरोपी करा अशी मागणी संजय राऊत करत आहेत. मग या न्यायाने उद्धव ठाकरे यांनाही सहआरोपी करायचे का असा खरमरीत सवाल भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. न्याय सर्वांना एकच असायला हवा असेही ते म्हणाले.
भोंदूबाबाला बेड्या ठोकण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे चार दिवसांपूर्वी अभिनंदन करणारे राऊत आज मात्र या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजकारण करत आहेत अशी टीका करतात हा विनोदच आहे. भोंदूबाबा मुद्द्यावरून राऊत राजकारण करत आहेत. खोटेनाटे आरोप करणे, भोंदूबाबाला पायघड्या घालणे याला हीन राजकारण करणे म्हणतात असे हीन राजकारण करण्यात राऊतांचा हात कोणी धरणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या कारकीर्दीत भोंदूबाबाच्या काळ्या कृत्याला जे कोणी साथ देत असतील त्या सर्वांवर चौकशीअंती कठोर कारवाई होणार असे बन म्हणाले.
विरोधी पक्षातील आणि उबाठा गटातील खासदार हे निधीमुळे नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या वर्तनामुळे नाराज आहेत. उद्धव ठाकरे त्यांना भेटत नाहीत, घराबाहेर पडत नाहीत, मतदारसंघाचा दौरा करत नाहीत की महाराष्ट्राचा दौरा करत नाहीत, याबद्दल त्यांची नाराजी आहे. तसेच आदित्य ठाकरेही आमदार-खासदारांना भेटत नाहीत.यामुळेच ४० आमदार साथ सोडून गेले तरी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि राऊतांना शहाणपण सुचत नाही असा टोमणाही बन यांनी लगावला.
राऊत विरुद्ध उबाठा असा संघर्ष सुरू
संजय राऊत यांच्या पुस्तकाच्या हिंदी-इंग्रजी आवृत्तीच्या दिल्लीत होणा-या प्रकाशन समारंभाचे निमंत्रण देऊनही उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमाला जाणे टाळले. उबाठा गटात राऊत विरुद्ध ठाकरे असा संघर्ष वाढत असल्यामुळेच उद्धव यांनी दिल्लीतील पुस्तक प्रकाशन समारंभाला जाण्याचे टाळले अशी टीका बन यांनी केली. हा संघर्ष पुढे आणखी तीव्र होण्याची शक्यता ही त्यांनी वर्तवली.
उद्धव ठाकरे कर्तृत्वशून्य मुख्यमंत्री आणि आमदार
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कृपेने सहा वर्षांपूर्वी विधान परिषदेचे आमदार झालेले आणि भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे हे कर्तृत्वशून्य मुख्यमंत्री आणि आमदार होते. आमदारकीच्या आणि मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत उद्धव यांनी महाराष्ट्राच्या हिताचे एकही काम केले नाही, महाराष्ट्राच्या हिताचा एक ही प्रश्न विधान परिषदेत विचारला नाही अशी टीका बन यांनी केली. अडीच दिवस मंत्रालयामध्ये येणारे मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांनी उद्धव यांची अवहेलना केली होती याचेही स्मरण बन यांनी करून दिले.






