३० लाख नागरिकांना मिळणार लाभ
मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यातील मालमत्ताधारकांसाठी महसूल विभागाने मोठी घोषणा केली आहे. यापुढे मिळकतींच्या फेरफाराची प्रक्रिया पूर्णपणे 'डिजिटल' होणार असून, मुंबईत प्रथमच तब्बल ४५ प्रकारच्या फेरफारांसाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा लाभ मुंबईतील सुमारे ३० लाख नागरिकांना मिळेल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
मुंबई शहर आणि उर्वरित महाराष्ट्रातील 'प्रॉपर्टी कार्ड' संगणकीकरणाच्या प्रणाली भिन्न असल्यामुळे आतापर्यंत मुंबईत ऑनलाईन फेरफार प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडथळे येत होते. मात्र, नागरिकांची वाढती गरज लक्षात घेऊन शासनाने विशेष ऑनलाईन प्रणाली विकसित केली असून, आता घरबसल्या अर्जाची सोय उपलब्ध झाली आहे.
मुंबई शहर जिल्ह्यातील १९ महसूल विभाग आणि ४ नगररचना योजनांमधील सुमारे २७ हजार ८४७ मिळकत पत्रिका आता 'mahabhumi.gov.in' या संकेतस्थळावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधेमुळे नागरिकांना आपल्या अर्जाची सद्यस्थिती देखील ऑनलाईन तपासता येणार आहे. त्यामुळे आता फेरफाराच्या कामासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज भासणार नाही.
या नव्या प्रणालीमध्ये केवळ खरेदीखतच नव्हे, तर वारसा नोंद, बक्षीसपत्र, भाडेपट्टा, गहाणखत, रोड सेटबॅक, आरक्षण आणि भूसंपादन अशा विविध ४५ प्रकारच्या नोंदींसाठी ऑनलाईन अर्ज करता येतील. या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल महसूल मंत्र्यांनी मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि त्यांच्या टीमचे विशेष कौतुक केले.