गुरुवार २६ मार्चपासून सुरू होणाऱ्या पाकिस्तान सुपर लीगच्या (पीएसएल) ११ व्या हंगामावर दहशतीचे सावट पसरलेले दिसत आहे. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) च्या जमात-उल-अहरार गटाने अधिकृत निवेदन जारी करत पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये सहभागी होणाऱ्या परदेशी खेळाडूंना तातडीने पाकिस्तान सोडण्याचा इशारा दिला आहे. देशातील सुरक्षा परिस्थिती अत्यंत अस्थिर आणि धोकादायक असल्याचा दावा या निवेदनात करण्यात आला आहे.
"आज, पाकिस्तानचे लोक, विशेषतः खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तानमधील लोक, पद्धतशीर लष्करी दडपशाही आणि शासनाच्या नेतृत्वाखालील हिंसाचारामुळे अभूतपूर्व हालअपेष्टा सहन करत आहेत. एकीकडे आपल्या रस्त्यांवर आपल्या प्रियजनांचे अंत्यविधी सुरू आहेत आणि आपल्या माता आपल्या मुलांच्या बेपत्ता होण्यावर शोक करत आहेत, तर दुसरीकडे पाकिस्तान सुपर लीगचे (पीएसएल) आयोजित प्रदर्शन आमच्या दुःखाची एक क्रूर थट्टा ठरत आहे," असे या निवेदनात म्हटले आहे.
या इशाऱ्यानंतर PSL स्पर्धेभोवती पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, विशेषतः विदेशी खेळाडूंच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आधीच वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अशा धमक्यांमुळे स्पर्धेच्या आयोजनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सुरक्षा यंत्रणांनी मात्र परिस्थितीवर नियंत्रण असल्याचा दावा करत, खेळाडू आणि प्रेक्षकांच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना करण्यात आल्याचे सांगितले आहे. तरीही अशा प्रकारच्या धमक्या PSL च्या प्रतिमेला आणि आंतरराष्ट्रीय सहभागाला धक्का देऊ शकतात.
जरी पीसीबीने राष्ट्रपती स्तरावरील सुरक्षा कवच अभेद्य असल्याचा दावा केला असला तरी, या धोक्याचा खेळाडूंवर मानसिक परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सोमवारीच, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथ मुलतान सुलतान्स संघात सामील होण्यासाठी पाकिस्तानात दाखल होताना दिसला. नुकताच बिग बॅश लीगमध्ये यशस्वी कामगिरी केलेला स्मिथ, पीएसएलमध्ये आपलं पदार्पण करणार आहे.
दरम्यान, देश इंधनाच्या भीषण संकटाशी झुंजत असल्याने, पीएसएल ११ प्रभावीपणे घरबसल्या पाहण्याच्या स्पर्धेत रूपांतरित झाली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी रविवारी पुष्टी केली की, ही स्पर्धा बंद दाराआड आणि केवळ दोनच ठिकाणी मर्यादित स्वरूपात खेळवली जाईल. प्रेक्षक याचा घाई बसून आस्वाद घेऊ शकतात.