मुंबई: विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर, आता विधान परिषदेतही विरोधकांचे संख्याबळ कमालीचे घटणार आहे. येत्या १३ मे २०२६ रोजी वरिष्ठ सभागृहातील ९ सदस्यांची मुदत संपत असून, विधानसभेतील सध्याचे पक्षीय बलाबल पाहता महाविकास आघाडीला या नऊपैकी केवळ दोनच जागांवर समाधान मानावे लागणार आहे. परिणामी, परिषदेतील सत्ताधारी महायुतीची बाजू आणखी भक्कम होणार आहे.
निवृत्त होणाऱ्यांमध्ये भाजपचे रणजितसिंह मोहिते-पाटील, संजय केनेकर, संदीप जोशी आणि दादाराव केचे यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त नीलम गोऱ्हे (शिवसेना), अमोल मिटकरी (राष्ट्रवादी काँग्रेस), शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट), राजेश राठोड (काँग्रेस) आणि उद्धव ठाकरे (उबाठा) यांचीही मुदत संपत आहे. मंगळवारी या सदस्यांना औपचारिक निरोप दिला जाणार आहे.
दरम्यान, मुदत संपत असलेल्या ९ जागांसाठी एप्रिल महिन्यात निवडणूक लागण्याची शक्यता आहे. निवृत्त होणाऱ्यांमध्ये सर्वाधिक सदस्य भाजपचे असले, तरी विधानसभेतील प्रचंड संख्याबळाच्या जोरावर भाजप आपल्या जागा पुन्हा सहज जिंकू शकते.
शरद पवार गटाला माघार घ्यावी लागणार
विधानसभेतील सद्यस्थिती पाहता महाविकास आघाडीकडे एकूण ४६ (उबाठा २०, काँग्रेस १६ आणि शरद पवार गट १०) आमदार आहेत. या मतांच्या जोरावर मविआला जास्तीत जास्त दोनच जागा जिंकणे शक्य आहे. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी झालेल्या तडजोडीनुसार, या दोन जागांपैकी एक जागा उबाठा आणि दुसरी जागा काँग्रेसला सोडण्याचे निश्चित झाले आहे.यामुळे शरद पवार गटाला या निवडणुकीतून माघार घ्यावी लागणार आहे.
पोटनिवडणुकीनंतर अतिरिक्त बळ मिळणार
दुसरीकडे, महायुतीकडे (भाजप १३२, शिवसेना ५७ आणि अजित पवार गट ४१) असे मोठे संख्याबळ आहे. त्यातच राहुरी आणि बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध झाल्यास महायुतीच्या खात्यात अतिरिक्त दोन आमदारांची भर पडणार आहे. यामुळे रिक्त होणाऱ्या नऊ जागांपैकी सात जागांवर महायुतीचा विजय सुकर मानला जात आहे.
निवृत्तीनंतर विरोधकांची स्थिती
काँग्रेस : ५ उबाठा : ५ शरद पवार गट : २






