अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव आता अत्यंत गंभीर टप्प्यावर पोहोचला आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट ४८ तासांचा अल्टिमेटम दिला होता. होर्मुज सामुद्रधुनी जहाजांच्या वाहतुकीसाठी तात्काळ खुली न केल्यास, अमेरिकन वायूसेना इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ले करून त्यांना उद्ध्वस्त करेल, असा थेट इशारा त्यांनी दिला होता. विशेष म्हणजे, या कारवाईची सुरुवात इराणमधील सर्वात मोठ्या वीज प्रकल्पापासून केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
अमेरिकेच्या या धमक्यांना इराणने स्पष्ट भाषेत उत्तर दिले आहे. अमेरिकेने वीज प्रकल्पांवर हल्ले केले तर आम्ही होर्मुझ पूर्णपणे कायमची बंद करू.
इराणचे लष्करी प्रवक्ते इब्राहिम झोल्फकारी यांनी इशारा दिला आहे की, इराणच्या ऊर्जा नेटवर्कवर कोणताही हल्ला झाल्यास त्याचे योग्य उत्तर दिले जाईल.
"जर शत्रूने इराणच्या इंधन आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ला केला, तर पूर्वी दिलेल्या इशाऱ्यांनुसार अमेरिका आणि त्या प्रदेशातील राजवटीच्या मालकीच्या सर्व ऊर्जा पायाभूत सुविधा, तसेच माहिती तंत्रज्ञान आणि पाणी शुद्धीकरण सुविधांना लक्ष्य केले जाईल," असे इराणचे लष्करी प्रवक्ते इब्राहिम झोल्फकारी यांनी सरकारी माध्यमांना सांगितले.
नेमकं प्रकरण काय?
इराण-इस्रायल संघर्ष सुरू झाल्यापासून इराणने आपल्या सागरी हद्दीतील अत्यंत महत्त्वाचा मार्ग असलेली होर्मुज सामुद्रधुनी बंद ठेवली आहे. जगातील एकूण तेल पुरवठ्यापैकी सुमारे २० टक्के वाहतूक या मार्गावरून होते. त्यामुळे या मार्गावरील अडथळ्यांमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ या सोशल प्लॅटफॉर्मवरून इराणला इशारा देत, “४८ तासांत मार्ग खुला करा, अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल,” असे स्पष्ट केले होते. त्यावर आता इराणने स्पष्ट उत्तर दिले आहे.






