मुंबई : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाचा तपास पुढे सरकत असताना आता या प्रकरणाचे धागेदोरे इतर संस्थांकडेही पोहोचताना दिसत आहेत. तपास यंत्रणांनी या प्रकरणाशी संबंधित शिवनिका ट्रस्टच्या कामकाजावर लक्ष केंद्रित केल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रस्टमधील पदाधिकारी आणि विश्वस्तांच्या भूमिकेची पडताळणी करण्यासाठी विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर संबंधित ट्रस्टींना चौकशीसाठी समन्स बजावले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या ट्रस्टमध्ये शिवनिका संस्थानाचे अध्यक्षपद स्वतः अशोक खरात यांच्याकडे होते. काही वर्षांपूर्वी ट्रस्टच्या रचनेत बदल करत नव्या विश्वस्तांची नियुक्ती करण्यात आली होती. त्या काळात यामध्ये खरातने स्वतःच्या पत्नीचाही समावेश केला होता तर रुपाली चाकणकर याही या संस्थानाच्या विश्वस्त मंडळावर होत्या.
दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित काही घडामोडींमुळे संशय अधिक वाढला आहे. खरात अटकेत गेल्यानंतर ट्रस्टशी संबंधित माहिती अचानक अनुपलब्ध झाल्याची बाब तपास यंत्रणांच्या लक्षात आली आहे.तपास यंत्रणेकडून विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले असून, संस्थानमधील कारभार, निर्णयप्रक्रिया आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी केली जात आहे. याच अनुषंगाने संबंधित ट्रस्टींना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यात वर्तवली जात आहे.
याआधीच या प्रकरणामुळे राजकीय स्तरावर वाद निर्माण झाला होता. रुपाली चाकणकर यांनी अशोक खरात याच्या केलेल्या पाद्यपूजनाचे फोटो समोर आले आणि विरोधकांनी टीकेचे झोड उठवले. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश दिले, त्यानंतर चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्याकडे तात्काळ सुपूर्द केला. त्यामुळे या प्रकरणाला आणखी वेग मिळाला.
सध्या तपास यंत्रणा विविध अंगांनी चौकशी करत असून, येत्या काळात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे कोणते नवे खुलासे होतात, याकडे लक्ष लागले आहे.






