Saturday, March 21, 2026

जागतिक जल दिन

जागतिक जल दिन

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे

पाणी हेच जीवन. थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात ना अगदी तसं ते साठवलं पाहिजे. आपल्या मुलभूत गरजांमध्ये जिवंत राहण्यासाठी पाणी अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु इतकं महत्वाचं असूनही आणि हे आपणास ठाऊक असूनही आपण पाण्याचा अपव्यय करतो. पाणी आपल्या रोजच्या दैनंदिन गरजांसाठी, तहान भागवण्यासाठी, जेवणासाठी, स्वच्छतेसाठी, आरोग्यासाठी, परिसर स्वच्छतेसाठी त्याचप्रमाणे सर्व झाडे, वेली, प्राणी, फुलं,पापक्षी, धान्य, भाजीपाला सर्वच गोष्टींसाठी पाणी अत्यंत महत्त्वाचे आहे. याची बचत करणं हे आपले आद्य कर्तव्य आहे.

आज ‘जागतिक जल दिन’आहे. प्रतिवर्षी २२ मार्च रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो. स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे व त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे याचा संदेश देणे यासाठी या दिवसाची योजना केली गेली आहे.

पाण्याचे संरक्षण कसे करावे याविषयी आपण येथे चर्चा करू या. प्रथमतः स्वतःपासून पाणी वाचवण्यासाठी धडपड करा. सतत नळ सुरू ठेवू नये. पाणी साठवावे. त्याचे शुद्धीकरण करून पुनर्वापर करावा. पाण्याचा वापर, उपयोग कमीत कमी करण्यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी. पाण्याचे संरक्षण आणि संवर्धन करावे. रोजच्या रोज घरीसुद्धा वैयक्तिक आणि सामूहिकरीत्या पाण्याचा वापर करताना सावधानता बाळगावी. पाण्याचा नळ बंद ठेवावा. सतत वाहत असतो दाढी करताना ती होईपर्यंत, दात घासेपर्यंत बंद ठेवावा. शॉवर कमीत कमी वेळा घ्यावा. पावसाचे पाणी साठवण्यासाठी टाकी बांधा आणि हेच पाणी शुद्धीकरण करून पुनर्वापर सुद्धा करू शकता. हे पाण्याच्या बचतीचे उपाय तुम्ही जाणून घेतले, तर निश्चितच आपण त्या पाण्याचे संरक्षण आणि संवर्धनदेखील करू शकतो. दुष्काळ असलेल्या भागात पाणीच नसते, तेथे पैसे देऊन आठ-पंधरा दिवसांनी टँकर बोलावले जातात आणि मग लांबलचक रांगच रांग लावली जाते. पाणी भरले जाते म्हणजे पाण्याचा एक एक थेंब सुद्धा मानवाच्या आरोग्यासाठी, आयुष्यासाठी आणि जगण्यासाठी अनमोल आहे. ‘पाणी वाचवा पाणी साठवा’ ‘पाणी हेच जीवन’. ‘पाण्याचा अपव्यय टाळा’. ‘पाणी बचतीची शिस्त पाळा’. ‘पाणी वाचवा जीवन वाचवा’.

पाण्याचे संकट ओढवले असता सगळी घडी विस्कटते. अस्वच्छता, रोगराई, दुष्काळ, पाणीटंचाई, यामुळे माणसाचे जीवन विस्कळीत होते. कारण रोजच्या वापरामध्ये आपण खूप पाणी वापरत असतो ही पाण्याची आवश्यकता. रोज प्रत्येकाला तीन लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी आपल्या जीवनाची अनन्यसाधारण अशी बाब आहे. कारण ते पचन रक्तसंचार आणि शरीरातील तापमान नियंत्रण करतेच; परंतु आपल्याला सजीव ठेवते, चिरंतन चैतन्यमय ठेवते. पाणी जपून वापरावे हे सगळ्यांनाच समजत नाही. त्यांना त्याची जाणीव - जागृती करावी. पाणी प्रदूषणासाठी सुद्धा जागृती होणे गरजेचे आहे. नद्या-नाल्यांमध्ये, समुद्रामध्ये पाण्याचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढतंय. कंपन्या, उद्योग-व्यवसाय, अन्य लघू उद्योग यांचे दूषित पाणी, कार्बन डायऑक्साइडयुक्त उपद्रवी पदार्थ पाण्यात सोडले जातात. यामुळेही पाणी प्रदूषण वाढते. गुरं-ढोरं, गाड्या पाण्यात धुतली जातात कधी कधी पाण्याचा बेसुमार वापर केला जातो. पाणी चोरी केले जाते. आजचे पाणी उद्या शिळे म्हणून ओतूनही दिले जाते. यामुळे पाण्याची अतोनात नासाडी होते. शॉवर घेताना, दाढी करताना दात घासताना, शौचालयाचे चालू नळ, सातत्याने अनाठायी पाण्याचा अप‌‌व्यय केला जातो. एक दिवस पाणी मिळाले नाही की मोर्चे निघतात. पण ही परिस्थिती आपणच ओढ‌‌वून घेतली आहे. तेव्हा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकाने थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे पाणी वापरावे. आपण पाणी जपून वापरावे. कारण पाणी हे केवळ आपलेच नाही तर सर्वच प्राणीमात्रांचे जीवन आहे. आणि ते जपण्याचे, साठवण्याचे कामही मनुष्यप्राण्याचे आहे. तेव्हा एक जागरुक नागरिक बनून प्रत्येकाने या जलदिनी पाण्याच्या वापरासंबंधी दक्षता घेतली तरी आपण एक आपण आपले कर्तव्य चोख बजावले.

Comments
Add Comment