पुणे : गॅस टंचाईमुळे पर्यायी साधनांकडे वळणाऱ्या नागरिकांना आता सायबर फसवणुकीचा धोका वाढल्याचे समोर आले आहे. पुण्यात इलेक्ट्रिक शेगडी खरेदीच्या बहाण्याने एका ज्येष्ठ नागरिकाची लाखोंची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोथरूड परिसरात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाने सोशल मीडियावर इलेक्ट्रिक शेगडीची जाहिरात पाहिली होती. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे हा पर्याय पाहून त्यांनी ती खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
जाहिरातीत दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर संबंधित व्यक्तींनी ऑनलाइन पेमेंट करण्यास सांगितले. विश्वास बसावा यासाठी विविध कारणे देत त्यांनी तक्रारदाराकडून बँक खात्याची माहिती मिळवली.
यानंतर गुन्हेगारांनी त्या माहितीचा गैरवापर करत तक्रारदाराच्या खात्यातून सुमारे ३ लाख १० हजार रुपये दुसऱ्या खात्यात वळवले. काही वेळानंतर पैसे काढल्याचे लक्षात आल्यानंतर त्या ज्येष्ठ नागरिकाने पोलिसांकडे धाव घेतली.
या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी अनोळखी जाहिरातींवर विश्वास ठेवताना काळजी घेणे, तसेच कोणालाही बँक किंवा वैयक्तिक माहिती न देण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.






