नैवेद्य

जीवनगंध : पूनम राणे


“नववर्षाचा जल्लोष मनी
बाळ जन्मला चैत्र गुणी
स्वागत करू गुढी उभारूनी
कोकिळही गातो गोड गाणी”


सकाळपासून पाटील आजोबा वरील काव्यपंक्ती गुणगुणत होते. कारणही तसेच होते. नववर्षाचा प्रारंभ आणि वसंत ऋतूचे आगमन यांचा एकत्रित जल्लोष करणारा मनामनात विवेक जागृतीचा आणि वर्षभरात येणाऱ्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच आजचा दिवस गुढीपाडव्याचा होता.


आदल्या दिवशी सारी तयारी अमोलने केली होती. रेशमी वस्त्र, तांब्याचा कलश, वेळूची काठी, साखरेच्या गाठीची माळ, कडुलिंबाचे डहाळे, पुष्पहार, अशी देवपूजेची सगळी तयारी करून ठेवण्यात आली होती.


आजोबांनी आपल्या लग्न झालेल्या लेकीला गुढीला नमस्कार करण्यासाठी घरी बोलावले होते. त्यांच्या मुलीसोबत त्यांचा नातू रेहान आलेला होता. तो इयत्ता चौथीत शिकत होता.


वेळूच्या काठीला आंघोळ घालून वेळूची काठी छान कपड्याने पुसण्यात आली होती. तांब्याच्या तांब्याला कडुलिंबाचा पाला, हार साखरेची गाठ, केशरी रंगाचे वस्त्र, आंब्याचा टाळा एकत्र करून गुढी पाटावर गच्चीत उभारली गेली होती. गूळ, ओवा, हिंग यांचा प्रसाद दाखवण्यात आला होता. विशेष म्हणजे आज गुढीपाडवा असल्याने स्वयंपाकही उत्तम करण्यात आला होता. श्रीखंड पुरी, पुरणपोळी, बटाटा भाजी, पनीर, पालेभाजी असा जेवणाचा बेत आखला होता. घरभर पक्वानांचा घमघमाट सुटला होता.


रेहान आपल्या आईसोबत मामाच्या घरी आला होता. तो आजोबांना प्रश्न विचारत होता, “आजोबा, आजोबा, ही वेळूची काठी कशासाठी?” आजोबा म्हणाले, “अरे रेहान, गुढीला वापरलेली वेळूची काठी वंशवृद्धीचे प्रतीक आहे, तर गुढीवर उलटा ठेवलेला तांब्याचा कलश डिश अँटिनाचे काम करून वातावरणातील प्रजापतीच्या लहरी खेचून घेऊन त्या किरणांचा स्पर्श जमिनीला होतो आणि शेतीची उत्पादन क्षमता वाढण्याचे कार्य करतो. कडुलिंबाच्या पानांचा उपयोग धान्याला कीड लागू नये म्हणून करतात. त्याप्रमाणे रक्तवर्धक जिरे, हिंग, मीठ, गूळ, ओवा, कडूलिंब यांचे सेवन केल्याने आजार नाहीसे होतात. आपल्या सणांच्या मागे मोठे वैज्ञानिक तत्त्व दडलेले आहे.” “तुला ते, भगवे वस्त्र दिसते ना, त्यातून आपण वैराग्य, समर्पण शौर्य, राष्ट्रभक्ती, सेवा, मानवता त्याचबरोबर आत्मविश्वास, पराक्रम, स्वाभिमान जागवण्याचा प्रयत्न करायचा असतो. कडुलिंबाचा पाला आणि साखरेची गाठ आपल्याला सुचवत असते की, कोणतेही कार्य सहजासहजी साध्य होत नाही. अनेक वेळा कटू-गोड प्रसंगांना सामोरे गेल्याशिवाय यशाचे शिखर सर करता येत नाही आणि मग एकदा का ध्येय गाठले की, झेंडूच्या फुलांची माळ अर्थात यशाची माळ आपल्या गळ्यात पडते. असा छानसा संदेश गुढी आपल्याला देते. रेहान आजोबांचे बोलणे मन लावून ऐकत होता.


आपण गुढीला ब्रह्मध्वज इंद्रध्वज, विजयध्वज, सद्भावना ध्वज म्हणून सुद्धा ओळखतो आणि बरं का, या दिवसाला संकल्प दिन, सदिच्छा दिन म्हणून सुद्धा ओळखले जाते. या दिवशी चांगला संकल्प करायचा असतो. या दिवशी श्रीरामांचे अयोध्येत आगमन झाले आणि शालिवाहन शकाची सुरुवात झाली. त्याची आठवण म्हणून आपण गुढीपाडवा
साजरा करतो.


आजोबा म्हणाले, “अरे आता नैवेद्य दाखवायची वेळ झाली.” चला आपण नैवेद्य दाखवू आणि मग जेवण उरकून घेऊ.” आजोबांनी अमोलला स्वयंपाक झाल्यानंतर प्रथम नैवेद्य थोडासा बाहेर पितरांच्या नावाने तसेच अग्नीला, तुळशीला आणि देवांना दाखवायला सांगितला.


अमोलने प्रथम बाहेर पितरांच्या नावाने थोडासा नैवेद्य ठेवला आणि आपला भाचा रेहान याला म्हणाला, “चल माझ्यासोबत हा पाण्याचा तांब्या घेऊन ये.” अमोल पुढे आणि रेहान मागे असं करत त्यांनी घरातील देव्हाऱ्यातील देवांना गायत्री मंत्र म्हणून नैवेद्य दाखवला. यानंतर त्याने अग्नीला, गुढीला नैवेद्य दाखवला आणि नंतर तो गॅलरीत ज्या ठिकाणी तुळस ठेवली होती त्या ठिकाणी तुळशीला नैवेद्य दाखवायला आला. तुळशीसमोर नैवेद्य ठेवून नैवेद्याला पाणी सोडलं. इतक्यात रेहान म्हणाला, “अहो मामा, तुळस काही अन्न खाणार आहे का?” अहो, मामा तुळशीला पाणी घालावं.” यावर घरातील सर्वजण हसले आणि आजोबा म्हणाले, “अरे, रेहान, तुळस ही वनस्पती आहे. आपण तिला लक्ष्मीच्या नावाने पुजतो. आपल्याला ऑक्सिजन मिळतो. तुळस अन्न खात नाही. धरतीतून हे अन्न उगवतं तिचे ऋण व्यक्त करण्यासाठी केवळ वासाच्या रूपाने ती अन्नग्रहण करत असते. अशी आपल्या भारतीय लोकांची श्रद्धा आणि समज आहे. म्हणून आपण तिला नैवेद्य दाखवत असतो. तुझंही बरोबर आहे. तुळशीला पाणी घालायचं असतं. म्हणून तर तुझी आई, तुझी मामी सकाळी अांघोळ झाल्यानंतर तुळशीला पाणी घालतात.


मामा मात्र रेहानने विचारलेल्या प्रश्नाने विचारात पडला होता. रेहानचं म्हणणंही चुकीचं नव्हतं; परंतु आधुनिक युगात आपल्याला विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालता आली पाहिजे. तरच आधुनिक पिढी सण-उत्सवांचे जतन करेल.

Comments
Add Comment

मायेचं चैत्रगौर

स्पंदन; अश्विनी शिंदे - भोईर भारतीय माणूस म्हणजे उत्सवप्रिय. सणांमध्ये...उत्सवांमध्ये रमणारा. आज आपल्या सणवार

मनभावन चैत्रगुढी

स्मृतीगंध; लता गुठे मुंबईसारख्या महानगरात सिमेंटच्या जंगलात राहताना कधी ऋतू बदलतो समजतही नाही; परंतु ग्रामीण

भारताची भविष्योन्मुख वाटचाल

विशेष; प्रा. सुखदेव बखळे गेल्या काही दशकांमध्ये देशातील वीजमागणी झपाट्याने वाढत आहे. पण जीवाश्म इंधनांवर

दीर्घकालीन युद्धाची सावली

विश्वभ्रमण; प्रा. जयसिंग यादव इराण-अमेरिकेतील संघर्ष केवळ शस्त्रांचा किंवा सामर्थ्याचा नाही, तर राजकारण,

जागतिक जल दिन

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे पाणी हेच जीवन. थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात ना अगदी तसं ते साठवलं पाहिजे. आपल्या मुलभूत

मॉर्निंग वॉक बेतला जीवावर

क्राइम : अॅड. रिया करंजकर सकाळचं चालणं हे तब्येतीसाठी चांगलं असतं हे खुद्द डॉक्टर सांगतात आणि लोकही सुदृढ