पुणे: पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पुण्यातील एका उच्चभ्रू परिसरात घडला आहे. पुणे पोलिसांनी एक मोठं रॅकेट उद्ध्वस्त केलं आहे. या हळदीच्या पाकिटातून 'नशा' विकला जात असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी धाड टाकत मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
पुण्यातील उच्चभ्रू बाणेर भागात पोलिसांनी एक ड्रग रॅकेटचा भांडाफोड केला आहे. येथे हळदीच्या पाकिटाच्या आड गांजा विकला जात होता. या प्रकरणात बाणे पोलिसांनी दोन आरोपी अभिषेक बोरसे आणि अक्षय बोरसे या दोघांना अटक केली आहे. यांच्याकडून १६ किलो गांजा ताब्यात घेण्यात आला आहे.
पोलिसांकडून १६ किलो गांजा ताब्यात
या पाकिटांच्या तपासानंतर पोलिसही हैराण झाले. कारण या पाकिटावर हळद लिहिलं होतं, मात्र प्रत्यक्षात त्या पाकिटांमध्ये गांजा होता. सुरुवातीला पोलिसांनी घटनास्थळावरील तब्बल तीन किलो गांजा जप्त केला. चौकशीदरम्यान आरोपींनी पिंपरी-चिंचवड स्थित आपल्या घरात अमली पदार्थ जमा केल्याचं मान्य केलं आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी छापेमारी करीत १३ किलो गांजा जप्त केला. अशा प्रकारे एकूण १६ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
आरोपी एका खासगी कंपनीतील कर्मचारी
अटक केलेले दोन्ही आरोपी एका खासगी कंपनीत नोकरी करतात, अशा माहिती समोर आली आहे. तपासानुसार, हळदीच्या पाकिटाचा वापर करीत गांज्याची विक्री करीत होते. या प्रकरणात बाणेर पोलीस पुढील तपास करत आहेत.






