Saturday, March 21, 2026

मॉर्निंग वॉक बेतला जीवावर

मॉर्निंग वॉक बेतला जीवावर

क्राइम : अॅड. रिया करंजकर

सकाळचं चालणं हे तब्येतीसाठी चांगलं असतं हे खुद्द डॉक्टर सांगतात आणि लोकही सुदृढ राहण्यासाठी पहाटेच फेरफटका मारायला बाहेर पडतात. यामध्ये वयस्कर लोकांची संख्या जास्त असते कारण नोकरीतून रिटायर झालेले असतात. तेवढाच विरंगुळा आणि ओळखीच्या लोकांशी गप्पा मारता येतील म्हणून हे लोक पहाटेच फेरफटका मारण्यासाठी जवळच्याच गार्डनमध्ये जातात.

सुरेखा या बँकेतून अकाउंटंट म्हणून रिटायर झाल्या होत्या. काही दिवस गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की, आपल्याकडे आता वेळच वेळ आहे. नोकरीला असताना सकाळी जी धावपळ व्हायची ती आता थांबलेली आहे. तेव्हा हा मोकळा वेळ कसा घालवायचा असा विचार करत असताना सुरेखा यांनी ठरवलं की, आपण पहाटे फेरफटका मारायला जायचं. त्याच्यामुळे पायही मोकळे होतील आणि तब्येतही चांगली राहील. शिवाय काही नवीन ‌व्यक्तींसोबत ओळखही होईल.

ठरविल्याप्रमाणे त्या फिरण्यासाठी बाहेर पडल्या. त्यांनी जाताना स्वतः सोबत एक छोटी साईड बॅग घेतली होती. थोडं अंतर चालून गेल्यावर एका ठिकाणी मागून कोणीतरी आपली बॅग हिसकावत असल्याचं त्यांना जाणवलं म्हणून त्यांनी मागे येऊन बघितलं तर स्कुटीवर दोन मुलगे होते. त्या दोघांनी हेमलेट घातलेलं होतं त्यामुळे त्यांचे चेहरे दिसत नव्हते. एक पुढे बसलेला होता, त्याच्या हातात गाडी होती आणि मागचा जो मुलगा होता तो बॅग हिसकावत होता. त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी जोरात आपली बॅग पकडली आणि या झटापटीमध्ये मागे बसलेल्या मुलाने गाडीवरून उतरून सुरेखा यांना जोरात धक्का दिला. त्या धक्क्यात सुरेखा या जमिनीवर पडल्या आणि सुरेखांच्या हातातली बॅग घेऊन ती मुलं गाडीवरून पळाली.

पहाटेची वेळ असल्यामुळे रस्त्याला कोणीच नव्हते. फक्त दोन-तीन जण सुरेखासारखेच चालण्यासाठी आले होते. त्यांनी तत्काळ पोलीस स्टेशनला ही माहिती दिली आणि मुख्य म्हणजे सुरेखाची बॅग गेली होती, त्यात पाच ते सहा हजार रुपये होते आणि त्यांचा मोबाईलही त्याच्यातच होता. शिवाय सुरेखाच्या डोक्याला लागल्यामुळे त्यांना आपल्या घरी ही माहिती देताना अडचण येऊ लागली. पोलिसांनी तत्काळ तिथे आल्यानंतर त्यांना दवाखान्यात अॅडमिट केले आणि त्यांच्या कुटुंबाला कळवले.

पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे चेक केल्यानंतर त्यांना गाडीचा नंबर दिसला आणि त्या गाडीच्या नंबरच्या पुराव्यानिशी त्यांनी एका तरुणाला ताब्यात घेतले. त्यांनी आम्ही सकाळी सकाळी फिरायला निघालेलो होतो आणि आमच्या सोबत काही मित्र होते, ते पुढे होते असं त्यांनी सांगितलं, म्हणून पुन्हा सीसीटीव्ही चेक केल्यानंतर पुढे उभे असलेल्या गाड्यांवरचे नंबर बघून त्या मित्रांना ताब्यात घेऊन त्यांना साक्षीदार करण्यात आलं आणि त्या साक्षीदार मित्रांनी मागे कसला तरी आवाज झाला म्हणून आम्ही मागे बघितलं तर हे दोघे मित्र त्या बाईची बॅग हिसकावत होते, हे आम्हाला दिसलं. आम्ही घाबरलो आणि तिथून पळालो अशी जबानी त्यांनी दिली. जो गाडी चालवत होता तो पोलिसांच्या ताब्यात आला होता आणि जो सुरेखाची बॅग हिसकावत होता आणि ज्यांनी सुरेखाला पाडलं होतं तो मात्र अजूनही पोलिसांच्या ताब्यात सापडला नव्हता. त्यामुळे ज्याने गाडी चालवली होती, अजूनही तुरुंगातच होता त्याला जामीन मिळत नव्हता कारण त्याचा मित्र अजूनही पोलिसांच्या ताब्यात नव्हता आणि हिसकावून घेतलेली रक्कम आणि मोबाईल अजून मिळालेला होता.

या साखळी चोर किंवा गाडीवरून चोरी करणाऱ्यांचं लक्ष हे पहाटे फेरफटका मारणारे लोक जास्त असतात. कारण ही लोकं एक तर सेवानिवृत्त झालेली असतात आणि वयोवृद्ध झाल्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती जरा कमी झालेली असते. त्यामुळे अशा चोरांशी ते झटापटी करू शकत नाही आणि महिला म्हटल्यावर काही नाही. काहीतरी दागिने त्यांच्याकडे मिळणारच असं त्यांचं लक्ष असतं आणि सुरेखा सेवानिवृत्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच फेरफटका मारायला गेला आणि त्यांना पहिल्या दिवशीच हा चोराचा फटका मिळाला. आता आपला मोबाईल आणि बॅगेत असलेल्या रकमेसाठी त्यांना पोलीस स्टेशनला येरझारा घालाव्या लागत आहेत आणि एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात मिळाल्यामुळे आता हे सर्व प्रकरण कोर्टात गेलेलं आहे. तेव्हा वयोवृद्ध व्यक्तींनी फेरफटका मारायला जाताना सोबत अजूनही दोन-तीन मित्र-मैत्रिणींना घ्यावे ज्यामुळे रस्त्यावरील चोरांचा धोका जाणवणार नाही.(सत्यघटनेवर आधारित)

Comments
Add Comment