Sunday, March 22, 2026

Indian Navy : भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात केली जाणार समाविष्ट

Indian Navy : भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात केली जाणार समाविष्ट

भारताच्या सागरी सार्वभौमत्वाच्या क्षेत्रातील निर्णायक क्षण, असे वर्णन करता येईल, अशा शानदार समारंभात, भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका, तारागिरी (एफ ४१) येत्या ३ एप्रिल २०२६ रोजी, नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट केली जाणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली विशाखापट्टणम इथे हा सोहळा होणार असून, भारतीय नौदलाला, सर्व दृष्टीने आत्मनिर्भर बनवण्यासाठीच्या प्रवासातला हा एक महत्वाचा टप्पा असेल.

प्रकल्प 17 A श्रेणीतील, चौथी युद्धनौका असलेली ‘तारागिरी’, केवळ एक नौका नाही, तर भारताच्या ‘मेक इन इंडिया’ या दृढनिश्चयाचे, आणि भारतीय जहाजबांधणी केंद्राच्या अद्ययावत स्वदेशी अभियांत्रिकी कौशल्याचे ६,६७०टन वजनाचे ते एक मूर्तिमंत प्रतीक आहे.

मुंबईच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स इथे तयार करण्यात आलेली ही युद्धनौका, या श्रेणीतल्या आधीच्या नौकांच्या संरचनेपेक्षा कितीतरी अत्याधुनिक, सरस असून, पुढच्या पिढीतले तंत्रज्ञान त्यात आहे. आकाराने छोटी, आणि लक्षणीयरित्या, छोटे रडार क्रॉस सेक्शन असलेल्या या युद्धनौकेची प्राणघातक स्टेल्थ क्षमता आहे. याच्या बांधणीत, ७५ टक्क्यांपर्यंत, स्वदेशी तंत्रज्ञान असून, देशांतर्गत औद्योगिक व्यवस्थेत झालेल्या विकासाचे चित्रही या बांधणीतून ठळकपणे अधोरेखित होते. देशभरातील २०० पेक्षा अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, सरकारच्या आत्मनिर्भर अभियानात आपले योगदान देत, अशा स्वदेशी बनावटीत हातभार लावत आहेत, ज्यातून, हजारो रोजगारही निर्माण होत आहेत.

डिझेल किंवा गॅस अशा दोन्ही इंधनावर चालणाऱ्या (CODOG) प्रॉपल्शन प्लांट’ने प्रणित, तारागिरी युद्धनौका, ‘उच्च जलद गती- समुद्रात तग धरण्याची उच्च क्षमता’ असलेली आहे. तिला बहुविध आणि बहु आयामी सागरी कारवाया करण्यास सक्षम बनवण्यात आले आहे. या नौकेवर, जागतिक दर्जाची, सुपरसॉनिक जमिनीवरून-जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे, मध्यम पल्ल्याची जमिनीवरुन हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि विशेष, पाणबुडी-रोधी युद्ध क्षेपणास्त्रे अशी शस्त्रे तैनात आहेत.

या सर्व प्रणाली अत्याधुनिक प्रतिकार व्यवस्थापन प्रणाली (कॉम्बॅट मॅनेजमेंट सिस्टिम) द्वारे एकत्रित करण्यात आलेल्या आहेत, ज्यामुळे जहाजावरील जवान, कोणतेही धोके अथवा हल्ल्यांचा तत्काळ अचूक प्रतिकार करु शकतील.समुद्रातील एक शिकारी जहाज, एवढीच तारागिरीची मर्यादित भूमिका नसेल, तर राजकीय मुत्सद्देगिरीच्या वेळी, तसेच मानवी संकटांच्या काळातही मदत करण्यास ती सुसज्ज आहे. तिची लवचिक कार्यक्षमता, तीव्र अशा युद्धासाठी सज्ज असण्यासोबतच, आपत्ती निवारण आणि इतर मानवी संकटात मदतीसाठी एक आदर्श युद्धनौका म्हणून उपयुक्त ठरणारी आहे.

भारतीय नौदल एक सामरीक, सुसंघटित, विश्वासार्ह आणि आत्मनिर्भर शक्ती म्हणून सातत्याने विकसित होत आहे. विकसित आणि समृद्ध भारतासाठी स्वदेशी बनावटीच्या, भारतीयांनीच संचलित केलेल्या युद्धनौकांच्या मदतीने हे नौदल आपल्या सागरी सीमांचे संरक्षण करत आहे.भारतीय नौदलाच्या उदयास येणाऱ्या सागरी शक्तीचे प्रतीक आणि आपल्या सागरी सीमांची संरक्षक म्हणून, तारागिरी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी सज्ज आहे.

Comments
Add Comment