Saturday, March 21, 2026

पुस्तक चोरी

पुस्तक चोरी

कथा : रमेश तांबे

सकाळी ११ वाजता शाळा भरली आणि शाळेत एकच बोंब झाली. चोरी झाली, चोरी झाली. चोरीची ही वार्ता साऱ्या शाळेत पोहोचली. सगळ्याच मुलांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव दिसत होते. चोरी आणि शाळेत! मुलं कुजबूजत म्हणाली, “चोरदेखील वेडाच दिसतोय. शाळेत काय मिळणार चोरायला! खडू, वर्गात विसरलेले पेन, पेन्सिल, पट्ट्या आणि खोडरबर!” पण शाळेच्या आवारात पोलिसांच्या गाड्या येऊन थडकल्या. तशी मुले हसण्याची बंद झाली आणि शाळेत काहीतरी मोठे घडले आहे याची त्यांना खात्री पटली.

थोड्याच वेळात शिक्षक आपापल्या वर्गात पोहोचले आणि शाळेत काय घडले ते सांगू लागले. तेव्हा कुठे मुलांना कळले की शाळेत चोरी झाली. ती ही की शाळेच्या ग्रंथालयातील जवळपास तीनशे-चारशे पुस्तके गायब झाली. पुस्तकांची चोरी हा प्रकार कोणाच्याही पचनी पडला नव्हता. पोलिसांच्या चेहऱ्यावर देखील एक वेगळेच स्मित दिसत होते. ग्रंथालयात शाळेला मिळालेले पुरस्कार, आकर्षक मानचिन्हे होती. मोठमोठे धार्मिक ग्रंथ होते. पण चोराने त्यांना हात लावला नव्हता. कारण फक्त बालविभागातीलच सगळी पुस्तकं गायब झाली होती. त्यामुळे पोलीसदेखील बुचकळ्यात पडले होते. फक्त छोट्या मुलांची पुस्तके! परी- राक्षसाच्या गोष्टी, बिरबलाच्या गोष्टी, तेनालीरामन अशी जवळपास साडेतीनशे ते चारशे पुस्तके चोरीला गेलेली होती.

पोलीस अधिकारी विचार करू लागले. मोठे चोर, मोठी चोरी करतात. शिवाय त्यांना पुस्तके चोरून काहीच मिळणार नव्हते. त्यामुळे चोर हा शाळेतलाच कुणीतरी असावा असा तर्क पोलिसांनी लावून त्या दिशेने आपले काम सुरू केले. आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये पोलीस गेले. काही वाचनालये, ग्रंथालये त्यांनी पालथी घातली, पण पुस्तकांचा पत्ता नव्हता. एका मागून एक दिवस जाऊ लागला. पण पुस्तके कोणी चोरली याचा शोध लागत नव्हता. तसं चोरीला गेलेली पुस्तके शोधणे सोपे होते. कारण प्रत्येक पुस्तकावर शाळेचास्टॅम्प होता. पण तरीही सुगावा लागत नव्हता.

एके दिवशी मुख्याध्यापकांच्या कार्यालयात सर्व शिक्षकांची बैठक सुरू होती. तितक्यात सहावी-सातवीतली दोन मुलं तिथं आली आणि ती म्हणाली, “सर, आम्हीच ती पुस्तकं न सांगता नेली.” मुख्याध्यापक खाडकन खुर्चीतून उठून उभे राहिले. अन् ओरडलेच, “काय तुम्ही चोरी केलीत. अन् तीही पुस्तकांची! पण का?” मुलं म्हणाली, “माफ करा सर, आमचे चुकलेच, आधीच तुम्हाला सारे काही सांगायला हवे होते. पण नाही सांगितले. आता तुम्ही द्याल ती शिक्षा आम्हाला मान्य आहे.” मुलांचं बोलणं ऐकून सर जरा शांत झाले. मग मुले सांगू लागली, “आम्ही आमच्या काकांसोबत पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी वस्तीवर नेहमी जातो. तिथल्या मुलांना वाचण्यासाठी काहीच नसते. आपल्या ग्रंथालयात भरपूर पुस्तकं असली तरी ती फारशी वाचली जात नाही हे आम्हाला माहीत होतं. आम्ही ग्रंथालयाची नोंद वही तपासली तेव्हा समजलं की, गेल्या वर्षभरात आपल्या बालविभागातील एकही पुस्तक मुलांनी वाचल्याची नोंद नाही. मग अशी कपाटात पुस्तकं ठेवून काय उपयोग! म्हणून ती पुस्तकं आम्ही त्या वाचणाऱ्या मुलांना वाटली.”

मुलांचे विचार ऐकून मुख्याध्यापक विचारात पडले. मग सर मुलांच्या जवळ गेले अन् त्यांच्या पाठीवर हात फिरवत म्हणाले, “बाळांनो तुम्ही त्या आदिवासी मुलांना पुस्तकं दिलीत हे काम चांगलं केलं. पण शाळेतली पुस्तक न सांगताना नेणं, चोरून नेणं हा मात्र गुन्हा आहे. असं परत कधी करायचं नाही.” मग मुख्याध्यापक म्हणाले, “आता आपण सर्वजण एक निर्णय घेऊया, की त्या आदिवासी पाड्यातल्या मुलांच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत आपण करायची. सर्व शिक्षकवर्गानेही लगेचच हो असे म्हणत आपला होकार दिला. मुख्याध्यापकांचा निर्णय ऐकून मुलांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि त्यांचा चेहरा आनंदाने उजळून निघाला.

Comments
Add Comment