Saturday, March 21, 2026

‘ये जंग क्यों है?’

‘ये जंग क्यों है?’

नॉस्टॅल्जिया; श्रीनिवास बेलसरे

ताजमहाल’(१९६३) ही तशी प्रेमकथा, पण साहिर लुधियानवी नावाच्या चिंतनशील कवीने १९६३ साली आलेल्या या चित्रपटात एक कमाल करून ठेवली. प्रेमकथेवरच्या सिनेमासाठी त्यांनी चक्क युद्धावरच एक जबरदस्त गाणे लिहून दिले. ते इतर गाण्यांइतके वाजले नसेल, लोकप्रियही झाले नसेल, पण साहिरची खरी गुणवत्ता आणि मानसिकता याच गाण्याने रसिकांसमोर ठेवली. एक तत्त्वचिंतक आणि विचारवंत कवी असे त्याचे रूप हे गाणे स्पष्ट करते. तसे ताजमहालचे ‘जो वादा किया वो निभाना पडेगा..’ हे रफीसाहेब आणि लतादीदींनी गायलेले अजरामर गाणे वार्षिक बिनाकात पहिल्या क्रमांकावर वाजले, ‘सरताज गीत’ बनले तर ‘पाव छु लेने दो, फुलोंको इनायत होगी’ या रोमँटिक द्वंदगीताला लोकप्रियतेत २३ व्या आणि ‘जुर्मे उल्फतपे हमे लोग सजा देते हैं’ला त्यावर्षी ३० वा क्रमांक मिळाला. त्यामुळे ‘ताजमहाल’ लक्षात राहिला तो रोशन यांच्या कर्णमधुर संगीतासाठी आणि साहिर साहेबांच्या भावुक अर्थपूर्ण गाण्यांमुळे. सिनेमाने २ फिल्मफेयर पुरस्कार पटकावले. सर्वोत्तम गीतकार म्हणून साहिर आणि सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून रोशन साहेब. लतादीदींचेही नामांकन ‘सर्वोत्तम गायिका’ म्हणून झाले होते.

निर्माते होते ए. के. नडीयादवाला, दिग्दर्शक एम. सादिक आणि डौलदार राजेशाही संवादलेखन होते तबिश सुलतानपुरी यांचे. लेखक कमर जलालाबादी आणि प्रमुख भूमिकेत होते प्रदीपकुमार (राजकुमार खुर्रम, अर्थात शहाजहान), बीना राय (अर्जुमंद बानो म्हणजेच मुमताज), रहमान (जहांगीर), जीवन (शहजादा शहरयार), वीणा (नूरजहा उर्फ मेहरुनिस्सा), जबीन जलील, (लाडली बानो) आणि हेलन. बादशाहा जहांगीरचा मुलगा शहजादा खुर्रम उर्फ शहाजहानची आग्र्याच्या ‘मीना बझार’मध्ये मुमताजशी नजरानजर होते आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. मात्र जहांगीराची पत्नी नूरजहाला त्याचे लग्न लाडलीशी व्हावे असे वाटत असते. नूरजहां मुमताजच्या प्रेमात अडथळे आणण्यासाठी कारस्थाने करते. शहाजहाला मुद्दाम युद्धावर पाठवते. शेवटी युद्धात जखमी झालेल्या आपल्या मुलाची तिने केलेली सेवा आणि तिचे प्रेम बघून जहांगीर दोघांचे लग्न लावून देतो अशी ही कथा. साहिरजींनी युद्धाच्या एकंदरच व्यर्थतेवर लिहिलेले हे गाणे म्हणजे एका निरागस प्रेमिकेने ईश्वराकडे केलेली कळकळीची प्रार्थना आहे. आज जगभर पेटलेली महाभयंकर युद्धे, सगळीकडे पसरलेला परस्पर द्वेष आणि हिंसा पाहता हे गाणे या सर्वांवरचे एका कवीचे सखोल चिंतन ठरते. सहिष्णू भारतीय मानसिकतेशी एकरूप झालेले असूनही हे गाणे तितकेसे लोकप्रिय झाले नाही, कारण त्यात वापरलेली उर्दू. अनेक अवघड शब्दांचा अर्थ समजणे जड गेल्याने साहिरच्या इतक्या अनमोल रचनेचे महत्त्व रसिकांच्या लक्षातच आले नसावे. लढाईवर जबरदस्तीने पाठवले गेलेल्या शहाजहानसाठी मुमताज प्रार्थना करते असे दृश्य होते. साहीरने पहिल्याच ओळीत एक वेगळा विचार मांडला होता. शब्द होते -

“ख़ुदा-ए-बर्तर तेरी ज़मींपर, ज़मींकी ख़ातिर ये जंग क्यूँ है? हर एक फ़त्ह-ओ-ज़फ़रके दामनपे, ख़ून-ए-इंसानका रंग क्यूँ है?”

सर्वशक्तिमान परमेश्वरा, हे जग, ही पृथ्वी तुझीच ना? मग या जमिनीवर जमिनीसाठी युद्धे का होतात? (इथे साहिरवर बायबलमधील एका वचनाचा संस्कार दिसून येतो. ‘लेवीय’ या भागातले २५व्या अध्यायातील वचन सांगते ‘सर्व भूमी ईश्वराची आहे, तिच्यावर मर्यादित काळासाठी वावरणारा माणूस हा केवळ एक प्रवासी आहे.’ असेच कुराणातील सुरा निसाच्या आयत १३१ मध्ये सांगितले आहे. आणि खरेच नाही का? कालपर्यंत इराणचे सर्वेसर्वा असलेले खामेनीई आज कुठे आहेत? सर्व जगाची भूमी जिंकल्याचा दावा करणारा सिकंदर, हिटलर, अनेक देश पादाक्रांत करत भारतावर चालून आलेले मोगल बादशहा कुठे आहेत? सगळे प्रवासी ‘निजधामालाच’ निघून गेले ना?

पुढे मुमताज खुदाला विचारते ‘जमीन तुझी, आम्हीही तुझीच लेकरे मग मालकीहक्काचा प्रश्न का यावा? दुसऱ्याची जमीन हडपण्यासाठी निर्घृण खून करण्याची, निष्पाप रक्त वाहवण्याची प्रथा का पडली? इतरांचे जीव घेऊन आपला विजय साजरा करण्याची परंपरा का पडली रे, परमेश्वरा?

“ज़मीं भी तेरी है हम भी तेरे’ ये मिलकियतका सवाल क्या है? ये क़त्ल-ओ-ख़ूँका रिवाज क्यूँ है? ये रस्म-ए-जंग-ओ-जिदाल क्या है?” मुमताज, अर्थात साहिर साहेबांच्या कल्पनेतली मुमताज विचारते, ‘परमेश्वरा, ज्यांना जगातल्या सगळ्याच गोष्टी हव्या आहेत त्यांची मने मात्र इतकी संकुचित का असतात?

‘जिन्हें तलब है जहानभरकी, उन्हींका दिल इतना तंग क्यूँ है? ख़ुदा-ए-बर्तर तेरी ज़मींपर, ज़मींकी ख़ातिर ये जंग क्यूँ है?’

युद्ध अटळ आहे हे लक्षात आल्यावर चिंताग्रस्त मुमताज देवाला विनवणी करते, ‘देवा निदान गरीब आया-बहिणींना तरी सुरक्षित ठेव. त्यांची अब्रू राख, त्यांना शांतीने जगू दे. ज्या योद्ध्यांना तू ताकदवान बनवलेस त्यांच्या हृदयात निदान विवेकाचा प्रकाश पाड.

‘ग़रीब माओं शरीफ़ बहनोंको, अम्न-ओ-इज़्ज़तकी ज़िंदगी दे. जिन्हें अता की है तूने ताक़त, उन्हें हिदायतकी रौशनी दे.’

पण परमेश्वरा, तू जन्माला घातलेल्या य:कश्चित मानवाच्या मनात इतका गर्व कशाला, त्याच्या मनावर मीपणाचा एवढा गंज का चढतो? त्याला सत्य का दिसत नाही?

‘सरोंमें किब्र-ओ-ग़ुरूर क्यूँ है, दिलोंके शीशे ये रंग क्यूँ है? ख़ुदा-ए-बर्तर तेरी ज़मींपर, ज़मींकी ख़ातिर ये जंग क्यूँ है?’

दक्षिणेतले प्रदेश जिंकायला गेलेल्या प्रियकरासाठी प्रार्थना करताना मुमताज म्हणते, ‘देवा, हे लोक तर स्वत:हून मृत्यूला भेटायला निघाले आहेत. तरी तू त्यांना परत येण्याची मुभा ठेव. त्यांच्यासाठी सुरक्षित परतण्याचा मार्ग खुला ठेव. मानवी मनातल्या प्रेमभावनेची बाग अशी उजाड करू नकोस. प्रेमासारख्या नाजूक गोष्टीला तूच सहारा दे.’

तिला पुन्हा समाजात रूढ असलेली एक गोष्ट खटकते. परमेश्वराला ती विचारते, ‘या सुंदर जगात प्रेमाचा उत्सव करायचा सोडून माणसे नेहमी आपल्याच वेगवेगळ्या शस्त्रात्रांनी आपल्याच प्रजातीचा संहार करून मिळवलेला विजय का साजरा करतात?

‘कज़ाके रस्तेपे जानेवालोंको, बचके आनेकी राह देना, दिलोंके गुलशन उजड़ न जाए, मुहब्बतोंको पनाह देना, जहाँमें जश्न-ए-वफ़ाके बदले, ये जश्न-ए-तीर-ओ-तफ़ंग क्यों है?

आजचे जगभराचे भयंकर चित्र पाहून पुन्हा लक्षात येते कवी किती व्यापक आणि मूलभूत विचार देत असतात आणि समाज ते किती हट्टीपणे नाकारत असतो. कदाचित म्हणूनच जर्मन तत्त्वज्ञ जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल यांनी म्हटले होते, ‘अनुभव आणि इतिहास आपल्याला इतकेच शिकवतो की कोणतेच सरकार आणि देश इतिहासापासून काहीही शिकलेले नाहीत.’

Comments
Add Comment