महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरे
एकदा महर्षी व्यासांना त्यांच्या सर्व शिष्यांनी प्रश्न केला की हे भगवान, या जगात सर्व पुण्यमध्ये श्रेष्ठ पुण्य कोणते? तसेच सर्व धर्मात उत्कृष्ट धर्म कोणता आहे, की ज्यामुळे मनुष्य अक्षय स्वर्गात राहण्याचे सुख भोगू शकतो. तसेच असे एखादे व्रत सांगा जे मृत्यू लोकात राहणाऱ्या सर्व प्रकारच्या लोकांना तसेच लहान व थोरापर्यंत कोणालाही करता येईल.
महर्षी व्यास म्हणाले, मी तुम्हाला पाच कर्मरूपी महायज्ञ सांगतो. त्यापैकी कोणीही कोणत्याही एकाचे श्रवण व पालन केल्यास मनुष्याला दिव्य लोकांची प्राप्ती होते. हे पाच कर्म रूपी यज्ञ म्हणजे आपल्या माता-पित्याची भक्तिभावे पूजा, पतीची पूजा, प्राणिमात्रावर प्रेम करणे, मित्रांशी द्रोह न करणे आणि भगवान विष्णूंची निष्काम भक्ती हे आहेत. हे पाच यज्ञ सर्व लोक विना कष्ट करू शकतात. सर्व धर्मात या गोष्टींना मान्यता आहे. हे पाळल्यास त्याचे जे फळ मिळते ते अन्य कशानेही मिळत नाही.
माता-पित्याची सेवा केल्याने शेकडो यज्ञ केल्यानेही जे पूण्य प्राप्त होत नाही, त्यापेक्षाही जास्त पूण्य मिळते म्हणून माता-पित्यांची सेवा आदराने व भक्तिभावाने करावी.
पिता साक्षात धर्माचे स्वरूप आहे. पिताच स्वर्ग आहे, म्हणून पित्याची पूजा व सेवा केल्याने धर्म व स्वर्गीय सुखे प्राप्त होतात. त्याची सेवा करून त्यांना संतुष्ट ठेवणे, हीच मोठी तपश्चर्या आहे. माता-पित्यांना सेवेने संतुष्ट ठेवणाऱ्याला दररोजच्या गंगा स्नानाचे पुण्य लाभते.
वडील देवता समान असतात व आईमध्ये सर्व तिर्थे समाविष्ट असतात, म्हणून माता-पितांना प्रदक्षिणा करणाऱ्या पुरुषाला सप्त द्विपाच्या सर्व भुमंडळाची प्रदक्षिणा केल्याचे पुण्य लाभते. माता-पित्याचे पाय धुऊन ते पाणी तीर्थ म्हणून प्राशन केल्याने शेकडो जन्माची पापे नष्ट होतात. आई-वडिलांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार केल्यावर कपाळाला चिकटणारे धूलीकण तुमच्या पवित्रतेची ग्वाही देतात. ज्यांचे गुडघे, डोके व हात आई-वडिलांना नमस्कार करण्यासाठी जमिनीवर टेकतात, त्यांना अक्षय स्वर्ग प्राप्त होतो.
उलट माता-पित्याची आज्ञा पालन न करणारा व त्यांनी सांगितलेल्या गोष्टीचा तिरस्कार करणारा नरकात जातो. माता-पित्याचे पूजन न करता जो भजन करतो तो कृमीरूपाने कल्पापर्यंत नरकात राहतो. आपल्या वृद्ध रोगी तसेच उदरनिर्वाहाचे साधन नसलेल्या, अंध व कानाने ऐकून न येणाऱ्या, माता-पित्यांना जो सोडून देतो तो रौरव नरकात जातो.
वृद्धपणी मातापित्याचे पालन-पोषण न करणाऱ्यांचा पुढचा जन्म चांडाळाच्या घरी होतो व तो नीच कर्म करून यातना भोगतो. अशा माणसाच्या सर्व पुण्याचा नाश होतो. माता-पित्याची पूजा न करता केवळ देव-देवतांची पूजा व तीर्थार्टने केल्याने पुण्यची प्राप्ती होत नाही. तो एखाद्या कीटकाप्रमाणे जमिनीवर राहतो. त्यामुळे माता-पित्यांचे पूजन व सेवा यांचा महिमा फार मोठा आहे. त्यामुळे अतुलनीय पुण्य प्राप्त होते, असे पद्म पुराणात सांगितलेले आहे.