स्मृतीगंध; लता गुठे
मुंबईसारख्या महानगरात सिमेंटच्या जंगलात राहताना कधी ऋतू बदलतो समजतही नाही; परंतु ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ऋतूची वैशिष्ट्ये जाणवतात. हिवाळा, उन्हाळा, पावसाळा त्या ऋतूचे वेगळेपण आणि त्याप्रमाणे निसर्गात होणारे बदल हे सर्व अनुभवताना एक चैतन्याचा अनुभव मनाला भुरळ घालतो. चैत्राची चाहूल लागते ती चैत्र पालवीणे. झाडाची जुनी पालवी गळून त्या जागेवर नवीन कोवळी विविध रंगी पालवी अंकुरते आणि काही दिवसांतच सुखद अनुभव यायला लागतो. अनेक झाडांना फुलोरा आलेला असतो. आंब्याचा फुलोरा सर्व परिसर सुगंधित करतो. त्या सुगंधाने कोकीळ मंत्रमुग्ध होऊन गाऊ लागतो. आज खिडकीतून बाहेर पाहताना झाडाला फुटलेल्या नवीन पालवीने लक्ष आकर्षित केलं. आंब्याचा मोहोर समोर दिसत होता; परंतु सुगंध मात्र मनापर्यंत पोहोचलाच नाही. गुढीपाडव्याचा दिवस मनात रेंगाळत होता. आळस झटकून गुढी उभारण्याचा विचार करू लागले. लहानपणी गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी शाळेमध्ये गुरुजी गुढीपाडव्याची समृद्ध, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा याविषयी माहिती अशा काही पद्धतीने सांगायचे की आम्ही सर्व त्यामध्ये रमून जायचो. “बरं का मुलांनो...” या वाक्याने ते सुरुवात करायचे. पुराण कथेनुसार या दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली, त्यामुळे हा दिवस ‘सृष्टीनिर्मितीचा आरंभ’ मानला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे, याच दिवशी राम रावणावर विजय मिळवून अयोध्येत परत आले. लोकांनी विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी गुढ्या उभारल्या. त्यामुळे गुढीपाडवा हा ‘सत्याचा असत्यावर विजय’ दर्शवणारा सण आहे आणि तिसरी गोष्ट शालिवाहन राजाने शत्रूंवर विजय मिळवून ‘शालिवाहन शक’ सुरू केलं तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. त्यामुळे हा दिवस विजय, शौर्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक मानला जातो. समजलं का? आपण गुढीपाडवा का साजरा करतो? आम्ही माना हलवायचो. हे सर्व आता आठवलं की वाटतं किती सुंदर होतं ते बालपण. याबरोबरच मला आठवली ती लहानपणी अनुभवलेली चैत्रातील सकाळ. सकाळी झोपेतून उठून अंगणात गेलं की मन प्रसन्न व्हायचं. थंडगार वाऱ्याची झुळूक परिसरातील सर्व सुगंध घेऊन अंगाभोवती घुटमळायची. चैत्रातले नवचैतन्य अनुभवताना वाटते, चैत्र म्हणजे नुसता ऋतू बदल नाही, तर नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी आहे. प्रत्येक झाडाचं सौंदर्य जणू सांगत असतं-जुनं सोडून द्या. माझ्या पिकलेल्या पानासारखं आणि नवीन गोष्टींना आत्मसात करा. ते काढून टाकून हिरव्या स्वप्नांची पालवी आत्मसात करा.
मराठी नववर्षाचा पहिला दिवस साजरा करतो गुढी उभारून. घराघरांत उभारली जाणारी गुढी म्हणजे केवळ एक परंपरा नाही, तर ती विजयाचं प्रतीक आहे. लहानपणी गुढीची तयारी आदल्या दिवशीपासूनच सुरू व्हायची. आमच्या गावी एरंडाची उंच काठी गुढीसाठी वापरतात. ती आदल्या दिवशीच आणली जायची. आजी घरातील पितांबर आणि तांब्याचा लोटा काढून ठेवायची. लाल रंगाचा प्युअर जरी-काठ असलेला रेशमाचा पितांबर गुढीला बांधला जायचा. त्यावर साखरेची गाठी आणि लिंबाचा ढगळा बांधून ती गुढी चौकामध्ये तुळशी वृंदावनाच्या बाजूला बांधली जायची. गूळ आणि कडुलिंबाचा तौर एकत्र करून त्याचा प्रसाद सर्वांना वाटला जायचा. आरोग्यासाठी चांगला असतो म्हणून वाकडं तोंड करून खात असू.
गुढीपाडव्याच्या सकाळी सर्वांच्या घराबाहेर उभारलेली गुढी, दाराला लावलेले तोरण आणि अंगणातली रंगोळी हे सर्व पाहून मन प्रसन्न व्हायचे. कडूलिंब-गुळाचा गंध कडुलिंबाच्या कडूपणात आणि गुळाच्या गोडीत दडलेला अर्थ असा असावा. माणसाचे जीवन हे कडू आणि गोड अनुभवांनी समृद्ध होते. निसर्ग जसा स्वतः नव्यानं सर्व गोष्टींचा आनंदाने स्वीकार करतो. जुन्या वर्षातली पानगळ झटकून नवीन पालवी सुखाने अंगावर फुलवतो तसंच काहीसं आपणही आपल्या मनातील थकवा, निराशा झटकून नव्या आशा-आकांक्षांनी सुख शांती समृद्धीसाठी एकमेकांना शुभेच्छा देतो. चैत्रमास म्हणजे निसर्गाचं प्रत्यक्षात अवतरलेलं स्वप्न. त्या स्वप्नांना अभिमानाने वंदन करणारी गुढी. माणसांच्या स्वप्नांना आकाशात झेप घेण्याची उर्मी, प्रेरणा जागवणारा शुभशकुन. चैत्रमासातला गुढीपाडवा या दोघांच्या संगमातून तयार होतो-एक सुंदर, प्रसन्न आणि आशावादी जीवनाचा आरंभ.
निसर्गाच्या या हिरव्यागार कुशीत, गुढीच्या उंचावलेल्या गुढीकडे पाहून अभिमानाने जगण्याची नवी उमेद मनात जागृत होते.






