स्पंदन; अश्विनी शिंदे - भोईर
भारतीय माणूस म्हणजे उत्सवप्रिय. सणांमध्ये...उत्सवांमध्ये रमणारा. आज आपल्या सणवार साजरे करण्याच्या पद्धती कालानुरूप बदलत असल्या तरी या सणांच्या निर्मितीमागे असणाऱ्या सांस्कृतिक, सामाजिक व निसर्गाशी जोडलेल्या संदर्भांचा सूक्ष्मपणे विचार केला की जाणवते, हे सण म्हणजे माणसाच्या जगण्याचे सृष्टीचक्राचे अद्भुत... नयनरम्य सोहळेच! मानवी भावभावनांचा एक उद्गार म्हणजेच आपले सण!
भारतीय सणाचं व सृष्टीचं आपल्याला एक अनोखं नात दिसतं. आता हेच पाहा ना, चैत्राची चाहूल लागली की प्रत्येक माहेरवाशिणीच्या मनात चैत्रगौर रुणझुणू लागते.
चैत्रगौर म्हणजे चैत्र मासात केली जाणारी पार्वतीची पूजा. पार्वती म्हणजे सृजनाचे शक्तिकेंद्र... नवनिर्मितीचे प्रतीक. या चैत्र गौरीचे नि निसर्गाचे आपल्याला नाते दिसते. चैत्र महिना म्हणजे वसंताच्या आगमनाचा. सर्व ऋतूंचा राजा असणाऱ्या या वसंत ऋतूला भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये ‘कुसुमाकर’असे म्हटले आहे. त्याचे कारणही तसेच आहे. वसंतात निष्पर्ण झाडांना पालवी फुटू लागते. विविधरंगी फुलांची जणू रंगपंचमीच आपल्याला वसंतात पाहायला मिळते. शिशिराची पानगळ संपून सृजनाचे कोंंब वसंताच्या आगमनाने चैत्र महिन्यात फुटू लागतात आणि म्हणूनच चैत्र मास म्हणजे सृष्टीच्या नवचैतन्याचा... सृजनाचा देखणा सोहळाच वाटतो. सृजनाचं प्रतीक म्हणूनच की काय सृजनशक्तीची... आदिमायेची पार्वतीची पूजा बांधणारं चैत्रमासातलं हे चैत्रगौर!
चैत्रगौरीचं नातं सृष्टीच्या चक्राशी आहे तसंच ते स्त्रीच्या भावभावनांशीही आहे. आजच्या काळात फार कमी घरांमध्ये चैत्रगौर साजरी केली जात असेल. पण पूर्वी माहेरवाशिणीला चार दिवस विसावण्यासाठी... माहेरी आणण्यासाठीच की जणू काय चैत्रगौर या सणाची रुजवात झाली असावी, असे वाटते. चैत्रातली ही गौर म्हणजे माहेरी आलेली पार्वती. या सणाच्या निमित्ताने विवाहित स्त्रिया लग्नानंतर असलेल्या जबाबदाऱ्यांचे ओझे जणू सासरच्या पायरीवर ठेवून पुन्हा एकदा आपले लाड पुरवून घ्यायला... चार क्षण विसावायला जणू एक मुग्ध बालाच होऊन आपल्या माहेरी येतात. या सणाला माहेरवाशिणीला मायेने माहेरी आणतात. तिला गोडधोड खाऊ घालतात. तिचं कोडकौतुक करतात. सणांच्या मुळाशी असलेले हे गर्भितार्थ जेव्हा आपल्याला उलगडतात तेव्हा या सणांचा गोडवा आपल्याला अधिकच जाणवू लागतो.
आता ही चैत्रगौर विराजमानही कुठे होते, तर झोपाळ्यावर. झोपाळा म्हटलं की आपल्याला आठवतं ते आपलं बालपण. कसलीच चिंता नाही. काळजी नाही. जबाबदारी नाही. निश्चिंत असणारे बालपणीचे ते दिवस. बालपणी झोपाळ्याशी जडलेलं नातं ती पौगंडावस्थेत येईपर्यंत अलवारपणे जोडलेलं असतं. कुमारवयातील झोपाळ्यावर झुलणारी कुमारिका ‘दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे’ या गीतातील शब्दांप्रमाणे आपलं बालपण मागे टाकून स्वतःच्या नाजूक, अलवार भावनांमध्ये कधी गुरफटायला लागते कळतच नाही.
या वयातला झोका म्हणजे तिच्या मुग्धतेची... अलवारतेची स्पंदनंच! जबाबदारीचे भान येईपर्यंत झोपाळ्याप्रमाणे लयीत झुलणारं... स्त्रीचं हे मुग्ध मन! माहेरवाशीण गौराईही जणू मुग्धा होऊन चैत्रात माहेरी आल्यावर परत एकदा आपल्या बालपणापासूनच्या सगळ्या आठवणींतच जगते. तसेच ती आता माहेरी आली आहे त्यामुळे आता निवांत आहे. निश्चिंत आहे हीच भावना कुठेतरी गौराईच्या झोपाळ्यातून व्यक्त होते.
चैत्रगौराचं एक वैशिष्ट्य म्हणजे चैत्रगौरातलं चैत्रांगण. आता आपल्याला अंगणच नाही. पण पूर्वी अंगणामध्ये चैत्रांगण साकारलं जायचं. या आदिमायेची... शक्तीची जाणीव करून देणारी शंख, चक्र व गदा ही शस्त्रे; हत्ती, कासव, नाग, गरुड ही वाहने चैत्रांगणातून काढली जात. त्याचबरोबर ओम्, स्वस्तिक, आंबा, श्रीफळ, उंबर, पिंपळ यांच्या रांगोळ्या म्हणजे चैत्रांगण. राधा-कृष्ण, तुळस यांचाही चैत्रांगणात समावेश असे.
चैत्रांगणाला असलेले सांस्कृतिक, पौराणिक संदर्भ यांचे तपशिलात जाऊन विश्लेषण करायचे म्हटले, तर एक वेगळाच लेख लिहावा लागेल, इतकी प्रतिकात्मकता या चैत्रांगणात आहे. या ऋतूत मिळणारी फळे व या ऋतूमानातील आहारानुसार गौरीला नैवेद्य अर्पण केला जातो. कैरी घालून वाटलेली हरभऱ्याची डाळ, कैरीचे पन्हे, बत्तासे, टरबूज, कलिंगड, भिजवलेले हरभरे असा नैवेद्य देवीला अर्पण करतात.
चैत्रगौरातला सगळ्यात हृद्य प्रसंग म्हणजे चैत्र गौरीचे विसर्जन. माहेरी आलेली माहेरवाशीण सासरी परतताना भरल्या डोळ्यांनी... जड अंतकरणाने... नि जड पावलांनी आपला परतीचा प्रवास सुरू करते. डोक्यावर गौराईला घेऊन गाणी म्हणत पाणवठ्यावर या गौराईला निरोप दिला जातो.
गौराईला निरोप देऊन परतताना... आपल्यासोबत आणली जाते पाणवठ्यावरची वाळू . ही वाळू भरल्या डोळ्यांनी घरभर शिंपली जाते. वाळूचे शिंपण म्हणजेच या माहेरवाशीण गौराईच्या हृद्य आठवणी. या वाळूचा कण नि कण भारलेला असतो माहेरवाशिणीच्या सुख दुःखाने. चार दिवस माहेरी येऊन चिमणीप्रमाणे चिवचिवणारी ही माहेरवाशीण पुन्हा एकदा जबाबदारीची कावडं आपल्या खांद्यावर घेण्यासाठी माहेराहून नवी ऊर्जा घेऊन आपल्या सासरी परतते... नि माहेरी ठेवून जाते. वाळूच्या कणाकणात साठलेलं तिचं लोभसं, लडिवाळ, प्रेमाने भारलेलं अस्तित्व!
ashwinibhoir23@gmail.com






