मुंबई: मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत फेरीवाले आणि पदपथांवर करण्यात आलेल्या वाढीव बांधकामांवर कारवाई होत आहे. त्यानुसार भेंडीबाजार, डोंगरी,मस्जिद बंदर, मोहम्मद अली रोड, जे जे रुग्णालय परिसरातही मोठ्याप्रमाणात कारवाईला सुरुवात झाली होती. मात्र,मुस्लिम समाजाच्या धार्मिक सणामुळे काही प्रमाणात संथ झालेली ही कारवाई आता रमझान ईदनंतर अधिक तीव्र केली जाणार आहे. येत्या मंगळवारपासून या भागातील कारवाई पुन्हा एकदा तीव्र करून अनधिकृत बांधकामांसह फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांना पळता भूई कमी करून सोडले जाणार आहे.
मुंबईतील फेरीवाल्यांसह अनधिकृत तसेच वाढीव बांधकामांविरोधातील कारवाईचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर अनेक विभागांच्या सहायक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली याबाबतची मोहीम तीव्र करण्यात आली. मात्र, यातील सर्वांत लक्षवेधी कारवाई ठरली ती बी विभागाची. विशेष म्हणजे या मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये मोठ्याप्रमाणात अनधिकृत तसेच वाढीव कामे झालेली आहेत.तसेच फेरीवाल्यांनीही मिळेल ते रस्ते,पदपथ अडवून नागरिकांचे चालणेही कठिण करून सोडले आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली बी विभागाचे सहायक आयुक्त योगेश देसाई यांनी कशाचीही भिडभाड न बाळगता अत्यंत निडरपणे याठिकाणी कारवाईचा सपाटा लावला. सलग आठ ते दहा दिवस कारवाई करून इब्राहिम मोहम्मद अली रोड वरील नारायण धुरू स्ट्रीट, मांडवी, सरदार वल्लभ भाई पटेल रोड, इब्राहिम मोहम्मद मर्चंड रोड, संत तुकाराम रोड, युसूफ मेहरली रोड, लोकमान्य टिळक रस्ता आदी मार्गावरील आणि चौकांमधील रस्ते अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करतानाच वाढीव बांधकामे तसेच रस्ता अडवून ठेवलेले अनधिकृत स्टॉल्स हटवले. एवढेच नाहीतर त्यानंतर परिसरही स्वच्छ केला. रमजान पूर्वी हा परिसर एकदम स्वच्छ बनवण्यात आला. पण त्यानंतर धार्मिक सणाच्या काळात या समाजाच्या नागरिकांना त्रास होवू नये म्हणून काही प्रमाणात कारवाई संथ केली होती, परंतु आता शनिवारी रमजान ईद झाल्यानंतर आता पुढील आठवड्यापासून ही कारवाई पुन्हा एकदा मोठ्याप्रमाणात हाती घेण्यात येणार आहे. स्थानिक नागरिकांच्या धार्मिक भावना लक्षात येवू ही कारवाई तुर्तास संथ केली होती, परंतु आता सण झाल्यामुळे ही कारवाई हाती घेण्यात येणा असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत बी विभागाचे सहायक आयुक्त योगेश देसाई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मागील काही दिवसांमध्ये ही कारवाई संथ झाल्याचे दिसून आले असले तरी पुढील आठवड्यात ही कारवाई तीव्र केली जाईल,असे म्हटले आहे.






