डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी दलितांना पाण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी केलेल्या या सत्याग्रहाला सामाजिक समतेच्या लढ्याचा पाया मानले जाते. राज्य सरकारतर्फे विकास आराखड्यांच्या घोषणांमुळे या ऐतिहासिक स्थळाला नव्याने उजाळा मिळत आहे.
कोकण विभागातील रायगड जिल्ह्यातील महाडमधील ऐतिहासिक अशा चवदार तळ्याचा सत्याग्रह २० मार्च १९२७ रोजी थोर प्रज्ञावंत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांना पाण्याचा हक्क मिळण्यासाठी केला. या ऐतिहासिक घटनेच्या शतक महोत्सवाला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. या ऐतिहासिक दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता रायगड पोलीस दलातर्फे २१ पोलिसांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना चवदार तळ्याच्या प्रांगणामध्ये मानवंदना देण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट, फलोत्पादन, रोजगार हमी, खार जमीन विकास मंत्री भरतशेट गोगावले, विविध शासकीय अधिकारी आणि बाबासाहेबांची लेकरे उपस्थित होती. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे व अन्य मान्यवर उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री यांनी प्रथम बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर महाडच्या ऐतिहासिक भूमीवर असलेल्या भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. या पुतळ्याच्या खाली “हा संगर केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे” असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोर २० मार्च ही तारीख झेंडूंच्या फुलांनी सजवलेली होती, तर बाजूने झेंडूंच्या फुलांच्या माळा करून लावल्या होत्या. त्यामुळे बाबासाहेबांचा पुतळा अधिक आकर्षित दिसत होता. चवदार तळ्याच्या बाजूच्या काठावर झेंडूंच्या फुलांच्या माळा करून लावल्या होत्या. बाजूने मंडप उभारले होते. स्मारक फुलांनी सजवले होते. उपस्थित आंबेडकरी अनुयायांना बसण्यासाठी व्यवस्था केली होती, तर चवदार तळ्याच्या बाजूने आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आलेली होती. त्यामुळे चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या बाबासाहेबांच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला. प्रत्येक आंबेडकरी अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करीत होता. त्या परिसरात आंबेडकरी साहित्याची पुस्तके सवलतीच्या दरात विक्रीस ठेवण्यास आलेली होती. अनेक आंबेडकरी नेत्यांच्या सभा परिसरात सुरू होत्या. त्यात गायन पार्टीचा कार्यक्रम जोरात चालू होता. अनेक आंबेडकरी कार्यकर्ते बाबासाहेबांची गाणी ऐकण्यात गुंग होते. भीम सैनिकांच्या प्रचंड गर्दीने पूर्ण परिसर फुलून गेला होता. कडक उन्हाची तमा न मानता आंबेडकरी अनुयायी बाबासाहेबांच्या नावाच्या घोषणा देऊन बाबासाहेबांचा जय जयकार करत होते. आज जे आपण माणूस म्हणून जगतो आहोत त्याचे एकमेव कारण म्हणजे बाबासाहेब होय, याची पूर्ण कल्पना त्यांना आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी उपस्थित आंबेडकरी अनुयांना मार्गदर्शन करताना त्यांनी या ऐतिहासिक भूमीत जीर्णोद्धाराचा संकल्प केला आहे.
या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी देशातील कानाकोपऱ्यांतून लाखो आंबेडकरी अनुयायी महाड चवदार तळ्यावर येऊन शतक महोत्सवी वर्षाचे साक्षीदार झाले आहेत. म्हणजे काल ऐतिहासिक भूमीवर भीम सैनिकांचा महासागर लोटला होता. राज्यातील अनके संस्था एकत्र येऊन या ऐतिहासिक घटनेची एक आठवण म्हणून विविध कार्यक्रम वर्षभर आयोजित करीत आहेत. काही संस्थांनी त्या ठिकाणी जाऊन शतक महोत्सवी वर्षानिमित्ताने महाड क्रांतिदिन महोत्सवाचे आयोजन केले.
आपल्या राज्याच्या अर्थसंकल्पात राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याच्या अर्थमंत्री पदाचा कार्यभार सांभाळणारे देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त पायाभूत सोयीसुविधांचा विकास आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे ६ मार्च २०२६ रोजी घोषित केले. तसेच महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून महाड चवदार तळ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी २५ कोटी रुपये निधींची तरतूद करण्यात आली आहे, तर महाराष्ट्र सरकारच्यावतीने या ऐतिहासिक स्थळाला ‘सामाजिक समतेचे प्रतीक’ म्हणून चवदार तळ्याचे सुशोभीकरण, जलशुद्धीकरण आणि पर्यटन सुविधा पुरविण्यासाठी शतक महोत्सवी वर्षानिमिताने ५५.८० कोटी रुपये विकास आराखडा तयार करण्यात येऊन तो राबविण्यात येणार आहे. तसेच लाखो आंबेडकरी अनुयायी चवदार तळे सत्याग्रहाच्या निमित्ताने येत असल्यामुळे त्यांची निवास व्यवस्था, आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था, स्वच्छता व्यवस्थापन स्थानिक प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. महाडमधील चवदार तळ्यावर पिण्याच्या पाण्याचा सत्याग्रह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी करून चवदार तळे दलितांना पिण्याच्या पाण्यासाठी खुले करून दिले. आपल्या देशातील सामाजिक समतेचा हा पहिला सत्याग्रह आहे. त्यामुळे महाडचे चवदार तळे म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिक क्रांतीचा ऐतिहासिक ठेवा आहे. आज जरी चवदार तळे सत्याग्रह महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाने जगप्रसिद्ध झाले तरी महाड चवदार तळ्यातील ओंजळभर पाण्याने खरा इतिहास घडविला आहे. तेव्हा महाडच्या चवदार तळ्यावर ऐतिहासिक सत्याग्रह झाला त्या घटनेचे शतक महोत्सवी वर्ष साजरे करण्यात सुरुवात जरी झाली तरी खरे शतक ओंजळभर पाण्याचे समजून घेतले पाहिजे. त्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागला होता. तरच महाड चवदार तळ्याचे शतक महोत्सव वर्ष साजरे केल्याचे फलित होईल.
रवींद्र तांबे