Saturday, March 21, 2026

सुषमा अंधारे यांच्या 'त्या' आरोपांवर रुपाली चाकणकर यांचं स्पष्टीकरण; "मी असं काहीही..."

सुषमा अंधारे यांच्या 'त्या' आरोपांवर रुपाली चाकणकर यांचं स्पष्टीकरण;

मुंबई : नाशिकमधील अंकशास्त्रज्ञ अशोक खरात प्रकरणामुळे सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. याचाच परिणाम म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्या नंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपांचे खंडन केले आहे.

नेमकं प्रकरण काय ?

स्वयंघोषित कॅप्टन आणि अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याला विवाहित महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपांप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. तपासादरम्यान त्याच्याकडून काही व्हिडीओ सापडल्याची माहिती समोर आली. दरम्यान, राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांच्या आणि अशोक खरात यांच्या काही व्हायरल फोटो आणि व्हिडीओमुळे राज्यातील राजकारण तापलं. आरोप आणि प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली.

अशातच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी चाकणकर यांनी अमावास्येच्या दिवशी स्वतःच्या हाताची अनामिका कापल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपांमुळे राजकीय वातावरणातही अनेक प्रतिक्रिया उमटल्या.

रुपाली चाकणकरांचे स्पष्टीकरण :

या सगळ्या आरोपानंतर अखेर चाकणकरांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. त्यांनी सर्व आरोप खोडून काढले आहेत. आपण असं आपलं बोट कापलं नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. व्हायरल झालेले फोटो दाखवत त्या म्हणाल्या, "हा फोटो आहे १२ सप्टेंबरचा, याच्या पुढची एक तारीख खोडली आणि त्यावर दोन सप्टेंबर दाखवलं. २ सप्टेंबरला अमावस्या- पोर्णिमा काहीतरी होती, पण यात चुकीचं दाखवलं. तुम्ही आजही माझं सोशल मीडिया अकाऊंट चेक केलं तर हे फोटो आहे तसेच आहेत. ते फोटो २ सप्टेंबरचे नाहीत, १२ सप्टेंबरचे आहेत."

"दोन सप्टेंबरला आम्ही अजित दादांच्या दौऱ्यात होतो, हा माझा २ सप्टेंबरचा फोटो आहे, दोन सप्टेंबरचा हा फोटो पाहिल्यानंतर कुठंही माझ्या हाताला जखम नाही, हा दुसरा फोटो ४ सप्टेंबरचा आहे. मी माझ्या भागातील काही अधिकाऱ्यांशी बोलत आहे. रस्त्याची पाहणी करत आहे, यात माझ्या हाताला कुठेही जखम नाही. हा तिसरा ५ सप्टेंबरचा फोटो आहे, माझ्या हाताला कुठेही जखम नाही, त्यामुळे तो कुठला दिवस होता, काय विधी होता, आपल्याला काही माहीत नाही," असंही चाकणकर म्हणाल्या.

चाकणकर यांनी या प्रकरणात बदनामीकारक आणि चुकीची माहिती पसरवणाऱ्यांविरोधात कायदेशीर पावले उचलण्याचा इशारा दिला आहे. तसेच मूळ प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई व्हावी, अशीही मागणी केली आहे.

Comments
Add Comment