मुंबई : मुंबई मेट्रोने प्रवाशांसाठी डिजिटल सुविधांमध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. आता मेट्रोचे तिकीट थेट Uber ॲपच्या माध्यमातून बुक करता येणार असून या सेवेमुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सोपा आणि वेगात होणार आहे.
या आधी मेट्रो प्रवासी तिकीट बुकिंगसाठी यात्री, नवी, ईएमटी, टॅम्पॉक यासारख्या अपवर तिकीट बुकिंग सेवा उपलब्ध होत्या या नव्या सुविधेत ONDC प्लॅटफॉर्मचे इंटिग्रेशन करण्यात आले असून आता Uber चीही भर होणार आहे. त्याद्वारे उबर वापरणाऱ्या प्रवाशांना मेट्रो तिकीट सहज उपलब्ध होणार आहे. शिवाय तिकिटांवर काही प्रमाणात सवलतीही मिळणार आहेत.
यापूर्वी Uber ॲपवरून केवळ वर्सोवा-घाटकोपर या मेट्रो मार्गासाठी तिकीट बुकिंगची सुविधा होती. मात्र आता ही सेवा विस्तारून मेट्रो २A दहिसर पूर्व ते डी एन नगर तर मेट्रो ७ दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या मार्गांवर धावणाऱ्या मेट्रो मार्गांना हि सुविधा लागू करण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल ७० टक्के प्रवाश्यांचा प्रवास हा सुखकर होणार आहे
सध्या मुंबई मेट्रोमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवासी डिजिटल पद्धतीने तिकीट काढण्यास प्राधान्य देत आहेत. विविध ॲप्स आणि कार्ड्सद्वारे तिकीट बुकिंग होत असताना Uber हा पर्याय उपलब्ध झाल्याने प्रवाशांना आणखी एक सोय होणार आहे.
या उपक्रमामुळे मेट्रो प्रवास आणि त्यानंतरचा प्रवासही एकाच ॲपवर नियोजित करता येणार आहे. मेट्रो स्टेशनपर्यंत किंवा पुढील गंतव्यस्थानासाठी कॅब किंवा रिक्षा बुक करण्याची सुविधा देखील यामध्ये जोडली गेली आहे.याशिवाय मेट्रो प्रवाशांसाठी बेस्ट बस सेवा, पादचारी पूल आणि स्थानकांजवल पार्किंगची सुविधा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या उबरद्वारे तिकीट फक्त मेट्रो १, मेट्रो २A आणि मेट्रो ७ साठी उपलब्ध आहे. पण लवकरच ही सेवा मेट्रो लाइन ९ आणि मेट्रो २Bवर सुद्धा सुरू करण्यात येणार आहे.