Saturday, March 21, 2026

वरळी बीडीडीतील ८४५ घरांचे एप्रिल महिन्यात वितरण

वरळी बीडीडीतील ८४५ घरांचे  एप्रिल महिन्यात वितरण

मुंबई : म्हाडामार्फत मुंबईतील नायगाव, वरळी आणि ना.म.जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्यात येत आहे. यातील नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील ८६४ पुनर्वसन घरांचे वितरण नुकतेच करण्यात आले. आता वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पअंतर्गत ८४५ घरांचे बांधकाम पूर्ण झाले असून, महिनाभरात म्हणजेच एप्रिलमध्ये या घरांचा ताबा देण्याचे नियोजन म्हाडाने केले आहे. वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पअंतर्गत ५५६ पुनर्वसन घरांचा ताबा यापूर्वीच देण्यात आला आहे.

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प अंतर्गत एप्रिलमध्ये ८४३, मे मध्ये ५७४, जुलैमध्ये २७१ अशा एकूण २२४६ सदनिका या वर्षअखेरीस वितरित करण्याचे नियोजन आहे. नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात मे-२०२६ मध्ये ५३७ पुनर्वसन सदनिका वितरित करण्याचे तर परळ येथील ५४७ पुनर्वसन सदनिका जून - २०२६, तर ऑक्टोबर

- डिसेंबर २०२६ मध्ये ३४२ सदनिकांचे वितरण प्रस्तावित आहे.

डिसेंबर २०२६ पर्यंत म्हाडातर्फे तीनही प्रकल्पांतील ४८८८ पुनर्वसन सदनिकांचा ताबा देण्याचे नियोजन आहे. डिसेंबर २०२७ पर्यंत तीनही बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ६२४६ पुनर्वसन सदनिकांचा ताबा देण्याचे नियोजन आहे. तिनही बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील १५,५९३ पुनर्वसन सदनिकांची उभारणी पूर्ण करून सदनिकांचा ताबा डिसेंबर २०२९ पर्यंत देण्याचे नियोजन आहे. तसेच वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात ४ हजार ८९३, नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात १ हजार ७४, ना.म.जोशी मार्ग पुनर्विकास प्रकल्पात १ हजार ५८२ अशा एकूण ७ हजार ५५० पुनर्वसन सदनिका बांधण्याचे काम प्रगतिपथावर आहे. तीनही बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात ९ हजार ८१५ पुनर्वसन सदनिकांचे बांधकाम प्रगतिपथावर असून, एकूण ६३ टक्के काम झाले आहे. पुनर्विकास प्रकल्पात ऑक्टोबर २०२६ मध्ये उर्वरित ५७७८ पुनर्वसन सदनिकांच्या बांधकामाला सुरुवात करण्याचे नियोजन आहे.

Comments
Add Comment