मुंबई: मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठी आता कंपन्याच पुढे येत नसल्यामुळे यातील गाळाची सफाई करायची असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, सर्व प्रकारची अटी शिथिल करूनही याबाबतच्या निविदेला कंत्राटदारांचा प्रतिसाद न लाभल्याने कमी अवधीमध्ये नवीन कंत्राटदारांची निवड करून काम करणे अशक्य ठरणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाला आता मिठी नदीच्या सफाईसाठी यापूर्वी निवड केलेल्या कंत्राटदारांच्या पाया पडण्याची वेळ येणार असल्याचे दिसून येत आहे. मात्र, हे काम पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या मार्फत जेसीबी,पोकलेन, पंटलून तसेच डंपर भाडेतत्वावर घेवून या सफाईचे काम करून घेणे शक्य आहे. परंतु पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अभियंत्यांकडून आपल्या खांद्यावर घेण्याची इच्छा दिसत नाही.त्यामुळे विभागामार्फत हे काम करणे शक्य असूनही केवळ अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे महापालिकेला जुन्या कंत्राटदारांच्या पाया पडण्याची वेळ येण्याची चिन्हे दिसत आहे.
रुंदीकरण तसेच खोलीकरण करून मिठी नदीला पुनर्रुज्जीवन देण्यासाठी आतापर्यंत सुमारे २ हजार कोटींहून अधिक खर्च करण्यात आले आहेत. तरीही दरवर्षी मिठी नदीतील गाळ सफाईवर सरासरी ९० कोटी रुपये खर्च केले जात असून या गाळ सफाईच्या कामातील अनियमिततेबाबत एसआयटीच्या माध्यमातून चौकशी सुरु करण्यात आली. या अंतर्गत आर्थिक गुन्हे विभागाने आतापर्यंत मिठी नदीतील गाळाची सफाई करणाऱ्या सर्व कंत्राटदार कंपन्यांची नावे मागवली होती. मिठी नदीतील गाळ तिन भागांमध्ये विभागून त्यानुसार स्वतंत्र तिन कंत्राटदारांनी नेमणूक केली होती. परंतु त्यातील दोन कंपनींविरोध एफआयआर दाखल झाला तर एका कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आल्यामुळे प्रशासनाने दोन वर्षांकरता निवड केलेल्या कंपनीचे कंत्राट रद्द करून पुढील एक वर्षांकरता नव्याने निविदा मागवली होती.
महापालिका प्रशासनाने यापूर्वी मागवलेल्या निविदेमध्ये नदीतून गाळ काढण्यासाठी १०५ फुट लांब बूम आणि दीड क्युबिक मीटर क्षमतेचे बकेट असणारे पोकलेन मशीन तैनात करण्याची अट घातली होती. परंतु याच कामासाठी चौकशी झाल्याने नव्याने मागवलेल्या निविदेमध्ये या अटी काढून टाकून एक वर्षांत काढण्यात येणाऱ्या १ लाख १० हजार क्युबिक गाळ काढण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. परंतु शेवटच्या तारखेपर्यंत कोणीही पुढे आला नसून आता याची मुदत वाढवण्यात आली आहे.
यापूर्वी नेमलेल्या तिन्ही कंपन्यांनी पावसाळ्यापूर्वी काढण्यात येणाऱ्या ८० टक्के गाळापैंकी ८० ते ९० टक्के गाळ काढल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात होता. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी काढण्यात आलेल्या गाळाचे पैस महापालिकेने न दिल्यामुळे या कंपन्या पुन्हा यामध्ये तसेच नवीन कंपन्या मिठी नदीच्या कामांमध्ये सहभागी व्हायला घाबरत आहे. कोणत्याही जुन्या आणि नवीन कंपनीला मिठी नदीच्या सफाई कामात स्वारस्य नसून कुणीही पुढे येत नसल्याचेही स्थायी समितीच्या बैठकी काँग्रेस नगरसेवक अश्रफ आझमी यांनी सांगितले होते.
त्यामुळे मिठी नदीच्या सफाई कामावरून महापालिकेचा पर्जन्य जलवाहिनी विभाग पेचात सापडला असून कुणीही पुढे न आल्यास खात्यामार्फत या सफाईचे काम हाती घ्यावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, खात्याच्या कोणत्याही अभियंत्यांना आपल्या डोक्यावर हा भार घ्यायचा नसल्यामुळे ते यासाठी कंत्राट कंपनीची निवड करण्यासाठीच प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे.
कंत्राट कंपन्या या मिठीच्या सफाईसाठी भाडेतत्वावर जेसीबी, पोकलेन,पंटलून तसेच डंपर घेतात. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची स्पेशालिटी नसते. त्यामुळे महापालिकेच्यावतीने अशाप्रकारे जेसीबी, पोकलेनसह डंपर भाडेतत्वावर घेवून महापालिकेच्या नियमानुसार त्यांच्या प्रत्येक पाळीच्या दरानुसार दर दिल्यास कुणीही ही वाहने उपलब्ध करून देवू शकतात. त्यामुळेच मिठी नदीच्या कामांमधील ९ दुय्यम अभियंत्यांनी यासाठी लागणाऱ्या वाहनांची संख्या आणि त्यावरील खर्च यांचा अंदाजपत्रकही तयार केले होते,अशी माहिती मिळत आहे. मात्र, कंत्राट कंपनीला काम दिल्यानंतर कुठे तरी बसून आदेश देत ही कामे करून घेणाऱ्या या दुय्यम अभियंत्यांना खात्यामार्फत हे काम केल्यास स्वत:च ही सर्व वाहने मागवून, त्यानुसार गाळ भरुन घेतानाच त्यावर देखरेख ठेवण्यामुळे अतिरिक्त कामांची व्याप्ती वाढेल. त्यामुळे याच कारणांसाठी नकारार्थी शेरा मारुन संबंधित विभागाने पुढे पाठवला. यासाठी निविदा मागवून कंत्राटदारांची नेमणूक करणेच योग्य ठरेल असेही यात नमुद करून वरिष्ठांना कळवले असल्याची माहिती मिळत आहे. परंतु त्यानुसार निविदा मागवूनही प्रतिसाद न मिळाल्यामुळे आता महापालिका प्रशासनाने खात्यामार्फत भाडेतत्वावर मनुष्यबळ तसेच यांत्रिक सुविधा उपलब्ध करून ही सफाई करून घेण्याची वेळ येणार आहे. मात्र,खात्यातील अभियंत्यांच्या मानसिकतेमुळे याला विलंब होत आहे. त्यामुळे प्रशासन आता निविदेला मुदतवाढ देत काही दिवस वाया घालवतात की खात्यामार्फत ही सफाई करून घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.






