Friday, March 20, 2026

‘दहशतवादाचा नकाशा बदलला’; जागतिक दहशतवाद निर्देशांकात पाकिस्तान जगात अव्वल

‘दहशतवादाचा नकाशा बदलला’; जागतिक दहशतवाद निर्देशांकात पाकिस्तान जगात अव्वल

- जीटीआय अहवालातून समोर आले धक्कादायक आकडे

जागतिक दहशतवादाच्या चित्रात मोठा बदल होत असून पाकिस्तान आता जगातील सर्वाधिक दहशतवादग्रस्त देश ठरला आहे. इन्स्टिट्यूड फॉर इकोनॉमिक्स अँड पीस (Institute for Economics and Peace) च्या ग्लोबल टेररिझम इंडेक्स (GTI) २०२६ अहवालानुसार, यापूर्वी अव्वल असलेला पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासो हा देश दुसऱ्या क्रमांकावर घसरला असून नायजर तिसऱ्या स्थानावर आहे.

अहवालानुसार, २०२५ मध्ये पाकिस्तानमध्ये तब्बल १,०४५ दहशतवादी घटना घडल्या. या हल्ल्यांमध्ये १,१३९ जणांचा मृत्यू झाला, तर १,५९५ जण जखमी झाले. हा गेल्या दशकातील सर्वात गंभीर आकडा मानला जातो.

तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (Tehrik-i-Taliban Pakistan) (TTP) या संघटनेच्या हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली असून २०२५ मध्ये घटनांमध्ये २४ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. अफगाणिस्तानातील तळांचा वापर करून या संघटनेने सातत्याने हल्ले केल्याचे अहवालात नमूद आहे.

तसेच बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (Balochistan Liberation Army) च्या कारवायाही वाढल्या आहेत. क्वेटा जवळ ‘जाफर एक्सप्रेस’चे अपहरण ही त्यातील ठळक घटना ठरली, ज्यात शेकडो प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आले.

दरम्यान, भारत ६.४२८ गुणांसह जागतिक स्तरावर १३व्या क्रमांकावर असून २०२५ मध्ये दहशतवादी घटनांमध्ये ४३ टक्क्यांची घट नोंदवत परिस्थितीत सुधारणा दिसून आली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >