Friday, March 20, 2026

भोंदू बाबा प्रकरणात दोषींवर कारवाई होणारच !

भोंदू बाबा प्रकरणात दोषींवर कारवाई होणारच !

मुंबई : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या प्रतिमेला डाग लावण्याचे काम झाले. “वाझे काय लादेन आहे का...” हे वाक्य कोणाच्या तोंडचे आहे हे संजय राऊत विसरले असले तरी महाराष्ट्र विसरलेला नाही. मविआ सरकारच्या कार्यकाळात प्रसिद्ध उद्योगपतीच्या घराच्या बाहेर बॉम्ब ठेवण्याची हिंमत पोलिसांना झाली होती, गिरीश महाजनांना अटक करण्याची योजना आखली गेली होती. आता गुन्हेगारांना पाठीशी घालणारे सरकार नसल्यामुळे खरात बाबा प्रकरणी सर्व दोषींवर कठोर कारवाई होईल, याची संजय राऊतांनी खात्री बाळगावी, अशी खोचक टिप्पणी भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यलयात झालेल्या पत्रकार परिषदेत बन बोलत होते. यावेळी बन म्हणाले की, फडणवीस मंत्रीमंडळातील मंत्र्यांवर बिनबुडाचे आरोप करण्याचा अधिकार राऊतांना नाही. एखाद्या मंत्र्याचे त्या भोंदू बाबा सोबत फोटो आहेत म्हणून लगेच तो मंत्री दोषी ठरतो असे नाही. कसून तपास केला जाईल आणि दोषींवर निश्चितपणे कारवाई होईल.

अपुऱ्या आणि अर्धवट माहितीच्या आधारे राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर टीका करू नये असे सुनावत श्री. बन म्हणाले की, संपूर्ण माहिती राज ठाकरे यांनी करून घ्यावी. केवळ कर्ज किती आहे हे न बघता त्या कर्जाच्या तुलनेमध्ये आपली अर्थव्यवस्था तिपटीने मोठी झाली आहे हे ही बघावे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था साडेसोळा लाख कोटी इतकी होती मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वात गेल्या दहा वर्षात अर्थव्यवस्थेत तिपटीने वाढ होत तब्बल ५४ लाख कोटींवर पोहोचली आहे. आता २०२९ पर्यंत ‘ट्रिलियन डॉलर’ अर्थव्यवस्थेचे लक्ष्य डोळ्यासमेर ठेवून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार काम करत आहे. सर्वाधिक विदेशी गुंतवणूक आज महाराष्ट्रात होत आहे याचे स्मरण राज ठाकरे यांना करून देत, बन यांनी राज्याच्या या विकास यात्रेमध्ये राज ठाकरे यांचेही स्वागत आहे असा टोला लगावला.

राज्यातील मेट्रो आणि इतर पायाभूत सुविधाविकासाचा फायदा सर्वांनाच होत असतो. पायाभूत सुविधा कोणत्याही एका भाषिक गटासाठी नसतात, तर सर्व नागरिकांसाठी असतात याचा विसर राज ठाकरे यांना पडला आहे म्हणूनच यामध्येही भाषिक मुद्दा आणून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे अशी टीका बन यांनी केली. राज यांनी आधी कोस्टल रोड आणि पुणे मेट्रोवर टीका केली होती, पण प्रत्यक्षात पुणे मेट्रोला मोठा प्रतिसाद मिळत असून ती भरगच्च धावते आहे. त्याचप्रमाणे कोस्टल रोडमुळे मुंबईत प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचला आहे. बिनबुडाची टीका न करता वास्तव पाहण्याची गरज असून राज ठाकरे यांनी स्वतः मेट्रोने प्रवास करून जनतेचा अनुभव समजून घ्यावा, अशी खोचक विनंती ही त्यांनी केली.

बन यांनी सांगितले की, खरात प्रकरणाची पाळेमुळे उखडून काढण्यासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस गृहखात्याने जी मोहीम राबवली त्याबद्दल संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. राऊतांना हे उशिराने का होईना सुचलेले शहाणपण आहे. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर राऊतांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडल्याचे दिसत आहे, म्हणूनच राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक केले असावे असा टोमणा बन यांनी लगावला. खरात फाईल्स असो अथवा पाटकर फाईल्स असोत, कोणाचे कितीही राजकीय लागेबांधे असले तरी दोषींवर कठोर कारवाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात केली जाईल असेही त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment