अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी सिनेमाची चाहते अनेक दिवसांपासून वाटत पाहत आहेत. मात्र, आता त्यांच्यासाठी खुशबर आहे. लवकरच रितेशचा 'राजा शिवाजी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून रितेशच्या चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. या सिनेमाचा फर्स्ट लुक टीझर रिलीज झाला असून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील हा सिनेमा येत्या १ मे २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.
लवकरच प्रेक्षकांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनप्रवास एका भव्य सिनेमॅटिक अनुभवाच्या रूपात पाहता येणार आहे. रितेश देशमुख यांचे दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका साकारलेल्या 'राजा शिवाजी' या सिनेमाचा फर्स्ट लुक टीझरला सध्या चित्रपटगृहात प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
या सिनेमासाठी निर्मात्यांनी फार वेगळा निर्णय घेतला असून या चित्रपटाची भव्यता प्रेक्षकांना केवळ मोठ्या पडद्यावरच अनुभवता यावी म्हणून हा टीझर डिजिटल प्लॅटफॉर्मऐवजी थेट 'धुरंधर: द रिव्हेंज' या सिनेमाबरोबर थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे आता हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.
अभिनेता रितेश देशमुखने या सिनेमासाठी विशेष मेहनत घेतली असून, तो स्वतः महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच, या कथेला अजय-अतुल यांचं संगीत अधिक प्रभावी बनवणार आहे.
प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संतोष सिवन यांनी हा ऐतिहासिक क्षण कॅमेऱ्यात कैद केला असून ज्योती देशपांडे आणि जेनेलिया देशमुख यांनी मुंबई फिल्म कंपनीच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती केली आहे.






