तेहरान: मध्यपूर्वेतील तणाव आता टोकाला पोहोचला असून बुधवारी इस्रायलने इराणमधील जगातील सर्वात मोठ्या 'साऊथ पार्स' गॅस फील्डवर भीषण हवाई हल्ला केला. या हल्ल्यामुळे खवळलेल्या इराणने आखाती देशांमधील तेल आणि वायू केंद्रांना लक्ष्य करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. इराणच्या या कारवाईत कतारमधील महत्त्वाच्या गॅस फिल्डचं मोठे नुकसान झाले असून सौदी अरेबियावरही क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. इराण आणि कतारमधील गॅस फिल्डवर हल्ले झाल्याने जगभरातील गॅस पुरवठ्यावर याचा परिणाम होण्याची भीती आहे.
कतारमध्ये हाहाकार, एलएनजी प्लांटला लक्ष्य
कतारची सरकारी ऊर्जा कंपनी 'कतार एनर्जी'ने दिलेल्या माहितीनुसार, रास लफान इंडस्ट्रियल सिटीमधील त्यांच्या मुख्य गॅस सुविधेवर इराणने हल्ला केला. या शहरात जगातील सर्वात मोठी LNG ( Liquefied Natural Gas) उत्पादन सुविधा आहे. कतारच्या गृह मंत्रालयाने रास लफानमध्ये भीषण आग लागल्याची पुष्टी केली आहे. सुदैवाने, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले असले तरी, मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे.
कतारची इराणवर मोठी कारवाई, दूतावास रिकामी करण्याचे आदेश
या हल्ल्यानंतर कतार आणि इराणमधील राजनैतिक संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. कतारने इराणच्या दूतावासातील लष्करी आणि सुरक्षा साहित्यासह सर्व कर्मचाऱ्यांना २४ तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. इराणने कतारवर ५ बॅलिस्टिक मिसाइल्स डागल्याचा आरोप कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. इराणला 'पर्सोना नॉन ग्रांटा' घोषित करून कतारने कठोर पाऊल उचलले आहे.
सौदी अरेबियात ४ क्षेपणास्त्रे पाडली, रियाधमध्ये घबराट
दुसरीकडे, इराणने सौदी अरेबियाची राजधानी रियाधलाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. सौदी संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, तेल केंद्रांच्या दिशेने येणारी चार बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्यात आली. मात्र, या क्षेपणास्त्रांचे अवशेष शहराच्या विविध भागात पडल्याने ४ नागरिक जखमी झाले आहेत.
इस्रायलनं लावलेल्या आगीत आखाती देश होरपळले
इस्रायलच्या वायुसेनेने इराणमधील गॅस प्रोसेसिंग प्लांटवर केलेल्या हल्ल्यामुळे कतार आणि सौदीतील गॅस फिल्ड, ऑईल रिफायनरीवर हल्ले झाल्याचे सांगण्यात येते. इराणच्या तस्नीम न्यूज एजन्सीनुसार, इस्रायलने इराणच्या पेट्रोकेमिकल्स कॉम्प्लेक्सला लक्ष्य केले होते. त्यानंतर इराणने सौदी, यूएई आणि कतारला इशारा दिला होता की, पुढील काही तासांत या देशांमधील आस्थापनांवर हल्ले केले जातील. या घडामोडींमुळे जागतिक बाजारपेठेत तेल आणि वायूच्या किमतींवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Breaking News
क़तर ने रास लफ़्फ़ान इंडस्ट्रियल सिटी में आग लगने की पुष्टि की… रास लफ़्फ़ान पोर्ट में दुनिया की सबसे बड़ी LNG एक्सपोर्ट फ़ैसिलिटी हैpic.twitter.com/8TxUBOjlzY — Umashankar Singh उमाशंकर सिंह (@umashankarsingh) March 18, 2026






