Thursday, March 19, 2026

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा होता. इराणकडून भारताला रुपयांमध्ये तेल मिळते, जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरही त्या देशाने भारताला पाठिंबा दिला होता; मात्र अडचणीच्या काळात भारताने स्पष्ट भूमिका घेतली नाही, याचे परिणाम भविष्यात भोगावे लागतील" असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी व्यक्त केले.

दादर येथील शिवाजी पार्क मैदानात आयोजित मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. राज ठाकरे म्हणाले, देशात नेमके काय सुरू आहे याचीच लोकांना जाणीव राहिलेली नाही. समाज माध्यमांमध्ये आणि करमणुकीत लोकांना गुंतवून ठेवले जात आहे. 'मी काय बोलतो यापेक्षा तुम्ही त्यातून काय घेतात हे महत्त्वाचे आहे,' असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना सोशल मीडियाच्या प्रभावातून बाहेर पडण्याचे आवाहन केले.

निवडणुका येत-जात राहतात. मात्र आपण महाराष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी उभे आहोत, असे स्पष्ट करत ठाकरे यांनी 'महाराष्ट्राचे हरवलेले वैभव परत मिळवण्यासाठी सत्ता आपल्या हाती घेणारच,' असा निर्धार यावेळी व्यक्त केला. राज्याच्या आर्थिक स्थितीवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रावर सध्या सुमारे ११ लाख कोटींचे कर्ज आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना हे कर्ज सुमारे २ लाख कोटी होते; त्यानंतर सत्तांतर झाले आणि आजची स्थिती समोर आहे. शहरांतील वाहतूक कोंडी, खराब रस्ते आणि नागरी सुविधांची ढासळलेली अवस्था कधी सुधारणार सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारू नयेत म्हणून समाजाला मोबाइल आणि करमणुकीत गुंतवले जाते. माध्यमांनाही दबावाखाली ठेवले जाते,” असा आरोप देखील राज ठाकरे यांनी केला.

‘महाराष्ट्र नेक्स्ट’ वेबसाइटचे लोकार्पण

महाराष्ट्राच्या विकासासाठी नागरिकांच्या कल्पना आणि सूचनांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ ही नवी वेबसाइट सुरू करत असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी यावेळी केली. सरकारवर पूर्णपणे अवलंबून राहून चालणार नाही; महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रत्येकाने पुढे यायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.

एकेकाळी संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्राकडे असायचे. मात्र आज महाराष्ट्र काय देतोय, हा प्रश्न निर्माण झाला आहे. क्रिकेटसारख्या क्षेत्रातही मुंबईचे प्रतिनिधित्व कमी होत आहे. आपण कुठे कमी पडतोय, याचा विचारच होत नाही. महाराष्ट्र कसा घडवायचा याचा विचार आपणच करायला हवा. सरकार आपल्या डोक्यावर बसले आहे आणि आपल्याला काही देणे-घेणे उरलेले नाही, अशी स्थिती झाली आहे.

२००६ साली जाहीर केलेल्या ‘ब्लूप्रिंट’च्या संदर्भाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, काळानुसार राज्यात मोठे बदल झाले आहेत. वर्तमानपत्रांत अनेक चांगले लेख आणि कल्पना येतात; मात्र त्यांना योग्य व्यासपीठ मिळत नाही. अनेकांकडे योजना आहेत, पण ऐकणारे कोणी नाही।. याच पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ हा मंच उभारण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वेबसाइटवर नागरिकांनी आपले विचार मांडावेत. ‘जय महाराष्ट्र’सारख्या घोषणांना नव्हे, तर ठोस कल्पनांना येथे स्थान असेल, असे त्यांनी नमूद केले.

ही वेबसाइट नागरिक आणि सरकार यांच्यातील दुवा म्हणून काम करेल, असे सांगत ठाकरे म्हणाले, “तुम्ही सुचवलेली योग्य कामे सरकारकडून करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. तसेच, सूचना देणाऱ्या नागरिकांची गोपनीयता राखली जाईल आणि त्यांच्या नाव-नंबरची माहिती उघड केली जाणार नाही", अशी हमीही त्यांनी दिली.

कर्जमाफी करूनही शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत

राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सांगितले की, तीन वेळा कर्जमाफी होऊनही परिस्थितीत बदल झालेला नाही. ग्रामीण भागातील तरुण शेती सोडून शहरांकडे वळत आहेत; मात्र शहरांचीही अवस्था बिकट असल्याचे त्यांनी नमूद केले. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार दरवर्षी ४ हजार ५०० ते ५ हजार मुले बेपत्ता होतात. तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे, ड्रग्सचा प्रसार वाढत आहे, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >