मुंबई : नक्षलग्रस्त भागातील मौल्यवान सागवान लाकडाची तस्करी करणार्या संघटित टोळ्यांना राजकीय पाठबळ मिळत आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी विधानसभेत केला. त्यावर वनमंत्री गणेश नाईक यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी मतदारसंघात तस्करांना पकडणार्या वनविभागाच्या प्रामाणिक अधिकार्यांना एका स्थानिक नेत्याकडून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली जाते आणि तस्करांना सोडवण्यासाठी दबाव टाकला जातो, असा आरोप वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात केला. याला उत्तर देतांना वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, ज्या अधिकार्यांनी राजकीय दबावाखाली येऊन तस्करांना सोडून दिले, त्यांची सखोल चौकशी करून त्यांना कठोर शासन केले जाईल.
या घटनेतील परिसरातील ‘सीसीटीव्ही’ फुटेज आणि संशयितांचे ‘सीडीआर’ पडताळून या संपूर्ण रॅकेटचा शोध घेतला जाईल. जर या तस्करीमागे एखादी टोळी किंवा गुंडांच्या फौजा असतील, तर त्यांचा कायमचा बंदोबस्त करून हे रॅकेट पूर्णपणे उद्ध्वस्त केले जाईल, असेही वनमंत्र्यांनी सांगितले.






