Tuesday, March 17, 2026

महापालिका शाळांमधील न्युट्रीबार वादात; मध्यान्ह भोजनात इस्कॉनच्या खिचडीची झाली मागणी

महापालिका शाळांमधील न्युट्रीबार वादात; मध्यान्ह भोजनात इस्कॉनच्या खिचडीची झाली मागणी

मुंबई: मुंबई महापालिका शाळांमधील मुलांना पोषक आहारांतर्गत देण्यात येणाऱ्या न्युट्रीबारच्या वाटपाबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून या न्युुट्रीबारचा वापराचा कालावधी संपल्यानंतरही त्याचे वाटप होत आहे, तसेच त्यामध्ये दगड आणि प्लास्टिक आढळून येत असल्यामुळे मुलांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.मात्र याबरोबरच मध्यान्ह भोजनाअंतर्गत देण्यात येणाऱ्या पोषक आहाराचा दर्जा खालावलेला असल्यामुळे इस्कॉनच्या माध्यमातून जास्तीत जास्त शाळांमध्ये खिचडी पुरवण्यात यावी अशी मागणीही महापालिका सभागृहात सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी केली आहे

मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये उबाठाचे नगरसेवक अंकित प्रभू यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे महापालिका शाळांमधील मुलांना देण्यात येणाऱ्या न्युट्रीबारच्या वाटपाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. हे न्युट्रीबार योग्य दर्जाचे नसून मुलांना यातून बाधा झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल करत त्यांनी ज्याठिकाणी याचे उत्पादन होते त्याठिकाणी भरारी पथकामार्फत तपासणी करण्यात यावी अशी मागणी केली. तसेच याची चौकशी करण्याची मागणी केली. याला काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी याचे उत्पादन भिवंडीमध्ये होत असल्याचे सांगत चौकशी करण्याची मागणी केली. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी कुलाब्यातील शाळेला भेट दिल्यानंतर तेथे आलेला अनुभव सांगता तेथील वाटपात खिचडीचा दर्जा योग्य नसल्याचे सांगितले. तसेच न्युट्रीबारची तारीखही कालबाहय झालेली होती असे सांगितले. तर भाजपच्या स्वप्ना म्हात्रे यांनी जर महापालिका शाळांमध्ये यापूर्वी इस्कॉनची खिचडी पुरवली जात होती, ती आता का बंद झाली असा सवाल करत अधिकाधिक इस्कॉनची खिचडीची पुरवली जावी अशी मागणी केली.

उबाठाच्या विशाखा राऊत यांनी जी उत्तर विभाग कार्यालयात महापालिकेची प्रयोगशाळा असून तिथे प्रत्येक न्युट्रीबारचे नमुने तपासूनच त्याचा दर्जा योग्य आहे किंवा नाही त्यानुसार मुलांना वितरीत करावे असे सांगितले. तर शिवसेनेच्या तृष्णा विश्वासराव यांनी यापूर्वी महापालिका शाळांमध्ये बिस्कीटे आणि दूध दिले जायचे. पण पोषण आहाराचा दर्जा चांगला नसल्यामुळे इस्कॉनची खिचडी पुरवली तर मुलांना खऱ्या अर्थाने चांगल्या दर्जाचा आहार मिळेल असे सांगितले. श्रध्दा जाधव यांनी मागील चार वर्षांत प्रशासनाने काय वाट लावली ते ठिक आहे, पण आता तरी ते खपवून घेवू नका असे सांगत मध्यान्ह्य भोजनामध्ये पोषण मुल्ये आहेत का हेही तपासले जावे अशी सूचना केली. यावेळी झालेल्या चर्चेत वर्षा टेंबवलकर, प्रकाश दरेकर, डॉ सईदा खान आदींनी भाग घेतला. अखेर पिठासीन अधिकारी म्हणून महापौरांच्या अनुपस्थितीमध्ये उपमहापौर संजय घाडी यांनी हा हरकतीचा मुद्दा राखून ठेवला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >