Wednesday, March 18, 2026

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या आगीत एका कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला असून तीन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर इमारतीमध्ये एका कुटुंबातील नऊ जण अडकून पडले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, दिल्ली पोलिस आणि रुग्णवाहिकांच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जखमी झालेल्या तिघांना पालम येथील दिव्यप्रस्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनास्थळी तीन रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या, तर परिसर अरुंद आणि गर्दीचा असल्यामुळे इतर रुग्णवाहिका काही अंतरावर उभ्या ठेवण्यात आल्या. चार मजली इमारतीच्या एका भागात आग लागल्यानंतर धूर वेगाने संपूर्ण इमारतीत पसरला आणि कुटुंबातील सदस्य आतमध्येच अडकून पडले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचा आणि अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. सध्या आग लागण्याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिस आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. संपूर्ण घटनेची सविस्तर चौकशी झाल्यानंतरच आगीमागील कारण स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Comments
Add Comment