Wednesday, March 18, 2026

सहली आडून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट भाजपने उधळला

सहली आडून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट भाजपने उधळला
मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने अत्यंत घाईघाईत स्थायी समिती मंजुरीसाठी सादर केलाहोता. मागील स्थायी समितीमध्ये प्रशासनाने हा प्रस्ताव राखून ठेवला होता. मात्र, बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत प्रशासनाने स्वत:च हा प्रस्ताव मागे घेतल्यामुळे आता महापालिका शाळांमधील मुलांची सहल नवीन शैक्षणिक वर्षांतच होणार आहे. विशेष म्हणजे सध्या परिक्षा सुरु असल्यामुळे केवळ ३१ मार्च रोजी यासाठी निधी संपवण्यासाठी या सहलीचा घाट घातला गेला असल्यामुळे शिक्षण विभागाचे वाभाडे काढल्यानंतर प्रशासनालाच हा प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की आली. त्यामुळे भाजपने हा डाव एकप्रकारे उधळवून लावत कोणतेही नियबाह्य कामकाज केले जाणार नाही हे दाखवून दिले आहे. मुंबई महापालिका स्थायी समितीच्या मागील सभेच्या आदल्या दिवशी महापालिका शाळांमधील इयत्ता ४थी व ७वीच्या मुलांची सहल भायखळा राणीबाग आणि बोरीवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अर्थात नॅशनल पार्कमध्ये आयोजित करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. तब्बल ६६०० मुलांची ०९ ते २७ मार्च दरम्यान ही सहल आयोजित श्रीयांश एंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली होती. यासाठी सुमारे साडेचार कोटी रुपये खर्च करण्यात येणार होता. याबाबत मागील सभेमध्ये हा प्रस्ताव आला असता सभागृहनेते गणेश खणकर यांनी हरकत घेत हा प्रस्ताव राखून ठेवण्याची सूचना केली होती. तसेच शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांच्याह डॉ सईदा खान, यशवंत किल्लेदार. अश्रफ आझमी, जमीर कुरेशी यांनी आक्षेप नोंदवल्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी हा प्रस्ताव राखून ठेवला होता. मात्र, हा सहलीचा घाट मुलांच्या मनोरंजनासाठी नव्हेतर कंत्राटदाराचे खिसे भरण्यासाठीच असल्याचे स्पष्ट आरोप झाल्यानंतर आणि ३१ मार्चपूर्वी याचा प्रस्ताव मंजूर न केल्यास यासाठीचा निधी वाया जावू शकतो याच भीतीने आणल्याचेही बोलले गेले होते. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव बुधवारी झालेल्या सभेपुढे पुन्हा येताच यावर चर्चा करण्यापूर्वी प्रशासनाच्यावतीने अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांनी हा प्रस्ताव स्वत:हून मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे अखेर हा प्रस्ताव मागे घेण्यात आल्यामुळे महापालिका शालेय मुलांची सहल आता नवीन शैक्षणिक वर्षांतच जाण्याची दाट चिन्हे आहे.

कुठल्या ठिकाणी किती मुले जाणार होती सहलीला

  भायखळा राणीबाग : इयत्ता ४थी, एकूण मुले ३६,७२० सहलीसाठी येणारा खर्च : २ कोटी ३१ लाख ३३ हजार ६०० संजय गांधी राष्ट्रीय उद्यान,बोरीवली : इयत्ता ७वी, २९,०६४ व माध्यमिक ८४६ सहलीसाठी येणारा खर्च : २ कोटी ०९ लाख ३७ हजार रुपये
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >