Tuesday, March 17, 2026

पाकिस्तानने केला अफगाणिस्तानवर एअरस्ट्राईक; ४०० लोकांचा मृत्यू २५० हून अधिक जखमी; राशिद खानकडून संताप व्यक्त

पाकिस्तानने केला अफगाणिस्तानवर एअरस्ट्राईक; ४०० लोकांचा मृत्यू २५० हून अधिक जखमी;  राशिद खानकडून संताप व्यक्त

नवी दिल्ली : अफगाणिस्तानमधील काबूलवर पाकिस्तानी हवाई दलाने एअरस्ट्राईक केला आहे. पाकिस्तानकडून रहिवाशी परिसर आणि रुग्णालयांना लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तानी हवाई दलाने रुग्णालय आमि रहिवाशी भागांवर बॉम्बचा वर्षाव केला. यामध्ये आतापर्यंत जवळपास ४०० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

पाकिस्तानी लष्कराने काबूलमधील पाच वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बहल्ला केला. यामध्ये ४०० लोकांचा मृत्यू झाला असून २५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. काबूलमध्ये सध्या बचावकार्य जोरात सुरू असून, निवासी भाग आणि रुग्णालयाच्या ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचे आणि जिवंत वाचलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. पाकिस्तानी हवाई दलाने वापरलेल्या अत्यंत शक्तिशाली स्फोटकांमुळे, संरक्षण मंत्रालय आणि GDI मुख्यालयाजवळील संपूर्ण आकाश आगीच्या ज्वाळांनी व्यापून गेले होते. तसेच राष्ट्रपती भवनालगतच्या निवासी भागांतूनही आगीचे प्रचंड लोळ उठत होते.

हामिद करझाई यांचा तीव्र निषेध

अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हमिद करझाई यांनी काबुलमधील निवासी भागांवर आणि लष्करी नसलेल्या लक्ष्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला. करझाई यांनी नमूद केले की, या हल्ल्यांमुळे नागरी वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. त्यांनी पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वाला असा इशारा दिला की, अशा प्रकारचे हल्ले सुरू ठेवल्याने पाकिस्तानला आपली उद्दिष्टे साध्य करता येणार नाहीत; उलट, परिस्थिती अधिकच बिघडेल आणि त्याचे परिणाम अंतिमतः पाकिस्तानलाच भोगावे लागतील.तसेच जर पाकिस्तानला खरोखरच स्वतःच्या हिताचे रक्षण करायचे असेल आणि प्रादेशिक स्थिरता सुनिश्चित करायची असेल, तर त्यांनी आपल्या धोरणांचा पुनर्विचार केला पाहिजे. तसेच, त्यांनी अफगाणिस्तानसोबत संवाद आणि सहकार्याचा मार्ग स्वीकारला पाहिजे, असंही करझाई यांनी सांगितले.

राशिद खानही संतापला

पाकिस्तानने केकेल्या हवाई हल्ल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू राशिद खानने संताप व्यक्त केला आहे. काबूलमध्ये पाकिस्तानी हवाई हल्ल्यांमुळे झालेल्या नागरिकांच्या मृत्यूच्या बातम्यांमुळे मला खूप दुःख झाले आहे. जाणूनबुजून किंवा चुकून, नागरिकांची घरे, शैक्षणिक सुविधा किंवा वैद्यकीय पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे हा गुन्हा आहे. विशेषतः रमजानच्या पवित्र महिन्यात मानवी जीवनाची केलेली अवहेलना ही वेदनादायक आणि चिंताजनक आहे. यामुळे केवळ फूट आणि द्वेष निर्माण होईल. मी संयुक्त राष्ट्र आणि इतर मानवाधिकार संस्थांना या हल्ल्याची सखोल चौकशी करण्याचे आणि गुन्हेगारांना जबाबदार धरण्याचे आवाहन करतो. या कठीण काळात मी माझ्या अफगाण लोकांसोबत उभा आहे, अशी पोस्ट राशिद खानने केली आहे.

Comments
Add Comment