Monday, March 16, 2026

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, गॅस बुकींगनंतर ९६ तासांत सिलेंडर घरपोच होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे एजन्सींना आदेश

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, गॅस बुकींगनंतर ९६ तासांत सिलेंडर घरपोच होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे एजन्सींना आदेश

पुणे: मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढी पाडव्याचा सण अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना गॅस टंचाईमुळे व्यवसायिक हतबल झाले आहेत. तर, घरगुती गॅसचीही टंचाई जाणवत असल्याने नागरिकांनी, ग्राहकांनी गॅस एजन्सीबाहेर रांगाच रांगा लावल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्यातील गॅस टंचाईवर सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलं असून घरगुती गॅस सिलेंडरची कुठेही कमतरता नाही, असे सांगण्यात आलंय. आता, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाची घोषणा केली असून नागरिकांनी गॅस बुकींग केल्यानंतर ९६ तासांत म्हणजेच ४ दिवसांत त्यांना गॅस घरपोच मिळणार असल्याचे जितेंद्र डुडी यांनी म्हटलंय.

सरकारकडून व्यावसायिक गॅस पुरवठा बंद करण्यात आल्याने हॉटेल व्यवसायिक, खाणावळी, मेस आणि इतरही किचन उद्योगाला मोठा फटका बसला असून घरगुती गॅसचेही दर वाढविण्यात आले आहेत. अशातच, गुढी पाडव्याचा सण जवळ येऊन ठेपल्याने सध्या बाजारात गर्दी असून गॅस टंचाईमुळे नागरिक त्रस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. गॅस एजन्सीबाहेर रांगाच रांगा दिसून येतात. त्याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

पुण्यातील गॅस टंचाई संदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली असून गॅस सिलेंडर बुकींग केल्यानंतर 96 तासात पुणेकरांना घरपोच गॅस मिळणार आहेत. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाला व गॅस एजन्सींना दिले आहेत. मात्र, ग्राहकांकडून डिलिव्हरी कोड सांगितल्याशिवाय सिलेंडर दिला जाणार नाही. घरगुती गॅस सिलेंडरच्या वितरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नवीन नियम लागू करण्यात आला आहे. त्यानुसार, आता पुणेकरांना ९६ तासात घरपोच सिलेंडर मिळणार आहे. त्यामुळे, गॅस टंचाईत पुणेकरांना काहीस दिलासा मिळाला आहे.

पुणे जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरचे वितरण सुरळीत आणि सुरक्षित पद्धतीने व्हावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पोलिस विभागाला महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गॅस सिलिंडर वितरणावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी वेळोवेळी लक्ष ठेवावे. गॅस एजन्सी आणि गोदामांवर अनावश्यक गर्दी होऊ नये यासाठी संबंधित पोलिस स्टेशनने नियमित पाहणी करावी. गॅस एजन्सीकडून सिलिंडर वितरणासाठी पोलिस मदत मागितल्यास नियमानुसार मदत पुरवावी. तसेच, वितरणात अडथळा आणणे किंवा हस्तक्षेप झाल्यास संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी महोदयांनी दिल्या आहेत.

गुढी पाडव्यासाठीच्या साखरेच्या हारात दरवाढ

दरम्यान,यंदाच्या गुढी पाडवा सणावर गॅस टंचाईचे सावट पाहायला मिळत असून गॅस टंचाईमुळे यंदा गुढीपाडव्याच्या दिवशी लागणाऱ्या साखरेच्या माळांची किंमत ४० टक्क्यांनी वाढली आहे. मात्र, आखाती देशांतील युद्धामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्याने लाकूड व डिझेल भट्ट्यांवर काम करावे लागत आहे. उत्पादन खर्च वाढल्याने साखर गाठींच्या हारांच्या किंमतीत सुमारे ४० टक्के वाढ झाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >