Tuesday, March 17, 2026

Cyber ​​Fraud in Gas Booking : सावधान! गॅस बुकिंगच्या नावाखाली होतोय सायबर फ्रॉड; काही मिनिटांत खात्यातून लाखो रुपयांचा गंडा

Cyber ​​Fraud in Gas Booking : सावधान! गॅस बुकिंगच्या नावाखाली होतोय सायबर फ्रॉड; काही मिनिटांत खात्यातून लाखो रुपयांचा गंडा

मुंबई : गॅस सिलेंडरच्या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेत गॅस बुकिंगच्या नावाखाली ऑनलाइन फसवणुकीच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. सायबर गुन्हेगार नागरिकांच्या बँक खात्यांवर डोळा ठेवून विविध क्लृप्त्या वापरत असल्याचे अनेक प्रकरणांतून उघड झाले आहे. फोन कॉल, बनावट वेबसाइट, सोशल मीडियावरील संदेश तसेच व्हॉट्सअॅप लिंकच्या माध्यमातून गॅस बुकिंग किंवा सबसिडी अपडेट करण्याचे आमिष दाखवले जात आहे.

सायबर चोरटे स्वतःला गॅस एजन्सीचे कर्मचारी असल्याचे भासवून ग्राहकांशी संपर्क साधतात. “तुमची गॅस सबसिडी अपडेट करायची आहे”, “बुकिंग कन्फर्म करा” किंवा “गॅस कनेक्शन बंद होईल” अशा कारणांनी नागरिकांना घाईत माहिती देण्यास भाग पाडले जाते. त्यानंतर मोबाईलवर लिंक पाठवली जाते किंवा अॅप डाउनलोड करण्यास सांगितले जाते. ही लिंक किंवा अॅप बनावट असून त्यावर वैयक्तिक व बँक तपशील भरताच सायबर गुन्हेगार खात्यावर ताबा मिळवतात.

यानंतर काही मिनिटांतच बँक खात्यातून हजारो ते लाखो रुपयांची रक्कम काढली जात असल्याच्या घटना वाढल्या आहेत. अनेकांना पैसे कापल्यानंतरच फसवणुकीची जाणीव होते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि डिजिटल व्यवहारांबाबत कमी माहिती असलेले लोक या जाळ्यात अधिक अडकत आहेत.

सायबर तज्ज्ञांच्या मते, गुन्हेगार लोकांच्या भीतीचा आणि सद्य परिस्थितीचा फायदा घेतात. “सबसिडी थांबेल” किंवा “कनेक्शन बंद होईल” अशा धमक्या देऊन नागरिकांना तत्काळ कृती करण्यास भाग पाडले जाते. मात्र बँक किंवा गॅस एजन्सी कधीही फोनवरून ओटीपी किंवा बँक तपशील मागत नाही, हे लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

सायबर पोलिसांनी नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गॅस बुकिंगसाठी नेहमी अधिकृत अॅप, वेबसाइट किंवा एजन्सीचा अधिकृत संपर्क क्रमांक वापरावा. अज्ञात कॉल, संशयास्पद लिंक किंवा अनोळखी संदेशांवर विश्वास ठेवू नये. कोणालाही ओटीपी, एटीएम तपशील, सीव्हीव्ही किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड देऊ नये.

तसेच कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी तिची खातरजमा करणे आवश्यक आहे. अनेकदा बनावट वेबसाइट अधिकृत संकेतस्थळासारखी दिसते, त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता वाढते. आर्थिक व्यवहार करताना नेहमी अधिकृत आणि सुरक्षित माध्यमांचा वापर करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा