नवी दिल्ली : कोलकाता विमानतळ येथे अमेरिकन नागरिकाला तर लखनऊ विमानतळ आणि दिल्ली विमानतळ येथे प्रत्येकी तीन युक्रेनियन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. या सात विदेशी नागरिकांविरोधात एनआयएने कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. अटक केलेल्या सात विदेशी नागरिकांविरोधात यूएपीए कलम १८ आणि इतर संबंधित कलमांखाली कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
आरोपी वैध व्हिसावर भारतात आले होते. मात्र, त्यांनी आवश्यक ‘प्रतिबंधित क्षेत्र परवाना’ न घेता मिझोराम येथे प्रवेश केला. त्यानंतर ते म्यानमार मध्ये गेले, जिथे त्यांनी भारतविरोधी वांशिक सशस्त्र गटांशी संपर्क साधल्याचे एनआयएच्या हाती असल्याचे समजते. युरोपमधून ड्रोनच्या अनेक खेपा मिझोराममध्ये पोहोचवल्याचाही संशय तपासात व्यक्त करण्यात आला आहे.
अटक केलेल्या संशयितांना दिल्लीत आणून शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. मॅजिस्ट्रेटने अर्थात न्यायदंडाधिकाऱ्याने त्यांना तीन दिवसांची कोठडी सुनावली होती. त्यानंतर सोमवारी पुन्हा सुनावणी होऊन २७ मार्चपर्यंत कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
पटियाला हाऊस न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रशांत शर्मा यांनी आदेशात नमूद केले की, “पुरावे गोळा करणे, गुन्हेगारी कट उघडकीस आणणे, सह-आरोपींची ओळख पटवणे आणि मोबाईल डेटाचे विश्लेषण करणे यासाठी आरोपींना पोलीस कोठडीत ठेवणे आवश्यक आहे.”
आरोपी युरोपमधून ड्रोनचा मोठा साठा भारतामार्गे म्यानमारमध्ये बेकायदेशीरपणे पाठवत होते. हे ड्रोन वांशिक सशस्त्र गटांच्या वापरासाठी होते, जे काही प्रतिबंधित भारतीय बंडखोर संघटनांना शस्त्रे, प्रशिक्षण आणि इतर मदत पुरवत होते; असा आरोप एनआयएने केला आहे. या प्रकरणात एनआयएतर्फे विशेष सरकारी वकील राहुल त्यागी, सरकारी वकील अनिल डबास तसेच वकील जतीन आणि अमित रोहिला यांनी बाजू मांडली. आरोपींनी रचलेल्या कटाचा संपूर्ण तपास करण्यासाठी अधिक कोठडीची गरज असल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले.






