Monday, March 16, 2026

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, भाजपची १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, भाजपची १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शुभेंदू अधिकारी यांना नंदीग्राम आणि भवानीपूर येथून उमेदवारी देण्यात आली आहे. परितोष दास यांना अलिद्वारपूर येथून तिकीट देण्यात आले आहे. भारत निवडणूक आयोगाने रविवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन पश्चिम बंगालसह देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. हा कार्यक्रम जाहीर करून एक दिवस पण झाला नाही तोच भाजपची १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. यावरून भाजपच्या पश्चिम बंगालसाठीच्या तयारीचा अंदाज येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यंदा पश्चिम बंगालमध्ये विधानसभेसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात २३ एप्रिल आणि दुसऱ्या टप्प्यात २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी ४ मे २०२६ रोजी होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. मुख्य सचिव नंदिनी चक्रवर्ती गृह सचिव जगदीश मीणा, डीजीपी पियुष पांडे यांची तडकाफडकी बदली झाली आहे. निवडणूक आयोगाने सिद्धनाथ गुप्ता यांची राज्याचे नवे डीजीपी म्हणून नियुक्ती केली. अजय कुमार नंदा (आयपीएस-१९९६) यांची कोलकाता पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. नटराजन रमेश बाबू (आयपीएस-१९९१) यांची सुधारात्मक सेवा विभागाचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. अजय मुकुंद रानडे (आयपीएस-१९९५) यांची माहितीचे अतिरिक्त महासंचालक आणि पोलिस प्रमुख (कायदा आणि सुव्यवस्था) म्हणून नियुक्ती करण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पश्चिम बंगालमधील निवडणूक हिंसाचारमुक्त आणि शांततेत होईल असा विश्वास व्यक्त केला. यानंतर पुढील काही तासांतच मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमध्ये पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक अर्थात डीजीपी आणि कोलकाता पोलीस आयुक्त यांचा समावेश आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा