मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती अध्यक्षपदी मीनल तुर्डे, उपाध्यक्षपदी रिटा मकवाना यांची तर विधी समितीच्या अध्यक्षपदी दीक्षा कारकर, उपाध्यक्षपदी अनिष मकवानी यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती आणि विधी समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठीची निवडणूक सोमवारी १६ मार्च २०२६ रोजी महानगरपालिका मुख्यालयात पार पडली.
महिला व बालकल्याण समिती आणि विधी समितीच्या अध्यक्ष तसेच उप अध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष पदासाठी शिवसेना पक्षाच्या मीनल संजय तुर्डे यांचे एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. तसेच उपाध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या रिटा भरत मकवाना यांचे एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
विधी समितीच्या अध्यक्ष पदासाठी शिवसेना पक्षाच्या दीक्षा हर्षद कारकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. तसेच उपाध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाचे अनिष मकवानी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी महिला व बालकल्याण समिती आणि विधी समितीचे सदस्य उपस्थित होते.
महिला व बालकल्याण समिती आणि विधी समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून अनुक्रमे महापौर रितू तावडे, उप महापौर संजय घाडी यांनी कामकाज पाहिले. यावेळी उप आयुक्त (सामन्य प्रशासन) किशोर गांधी, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर आणि महानगरपालिका सचिव मंजिरी देशपांडे आदी उपस्थित होते.






