नवी दिल्ली : पश्चिम बंगाल आणि आसामसह देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा आज म्हणजेच रविवार १५ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी चार वाजता पत्रकार परिषदेद्वारे होणार असल्याचे समजते. भारत निवडणूक आयोग दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार असल्याचे वृत्त आहे.
आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा आज म्हणजेच रविवार १५ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी चार वाजता पत्रकार परिषदेद्वारे होणार असल्याचे समजते.
आसाम विधानसभेचा कार्यकाळ २० मे रोजी, केरळचा २३ मे रोजी, तामिळनाडूचा १० मे रोजी, पश्चिम बंगालचा ७ मे रोजी आणि पुद्दुचेरीचा १५ जून रोजी संपत आहे. यामुळे पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुका ७ मे पूर्वीच घेतल्या जाण्याची दाट शक्यता आहे. निवडणूक जाहीर होताच संबंधित राज्यांमध्ये आचारसंहिता लागू होणार आहे.
आधीच्या विधानसभा निवडणुकांवेळी संबंधित राज्यांमध्ये काय झाले होते ?
- आसाम - १२६ जागांसाठी तीन टप्प्यात मतदान झाले. रालोआने ७५ जागा जिंकल्या आणि भाजपच्या नेतृत्वात सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली.
- पश्चिम बंगाल - २९४ जागांसाठी आठ टप्प्यात मतदान झाले. तृणमूल काँग्रेसने २१५ आणि भाजपने ७७ जागा जिंकल्या. ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्या.
- तामिळनाडू - २३४ विधानसभेच्या जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले. द्रमुकने १३३, अण्णाद्रमुकने ६६ आणि भाजपने ५ जागा जिंकल्या. द्रमुकचे एमके स्टॅलिन मुख्यमंत्री झाले.
- केरळ - १४० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले. एलडीएफने ९९ आणि यूडीएफने ४१ जागा जिंकल्या. सीपीआयचे पिनारायी विजयन सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले.
- पुद्दुचेरी - ३० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले. एनडीएने १६, तर यूपीएने ९ जागा जिंकल्या. एनडीएचा घटक पक्ष असलेल्या अखिल भारतीय एन.आर. काँग्रेसचे एन. रंगास्वामी मुख्यमंत्री झाले.
बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा २८ जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात मृत्यू (Death) झाला. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. यामुळे बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघ रिक्त झाले आहेत. या दोन मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा आज भारत निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतच होण्याची शक्यता आहे. निवडणूक जाहीर होताच संबंधित मतदारसंघांमध्ये आचारसंहिता लागू होणार आहे.






