Saturday, March 14, 2026

नात्यातील सौंदर्य

नात्यातील सौंदर्य

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे 

नात्याचं आयुष्यातील महत्त्व अनन्यसाधारण. मानलं तर खूप काही. मानलं नाही तर काहीच नाही. नात्यांची बँक अशी साठवण आहे की, ज्यात जीवाभावाची माणसं समाविष्ट होतात. नाती म्हणजे केवळ रक्ताचीच नाहीत, तर मनाचीही मानलेली. ही खोलवर काळजात, हृदयात असतात. ती मनापासून जपलेली. नात्यांना कोणत्याही नावाची, लेबलची लिपी नसते. गरज नसते. मनात वसते, भासते ते असते नाते. खूप काही देऊन जाते. भावभावनांना श्रीमंती देते. काही नाही दिले तरी चालेल पण आपुलकी, आपलेपणा, अपारमाया, जिव्हाळा देते. जीवापाड जीव लावणे म्हणजे नातं. खरी परीक्षा नात्यांची ती असते जेव्हा अडचणीच्या वेळी कोणी आपल्या पाठीशी उ‌भं राहतं. सांत्वनासाठी कोणी तर दुःखात कोण येतं की केवळ मतलबासाठीच येतात. त्यावरून स्वार्थ नि:स्वार्थ. कठीण प्रसंगच असतो तो.

समर्थ रामदास म्हणतात, ‘कठीण समय येता कोण कामास येतो?’ खरेच आहे. प्रसंगाला सामोरे जातो ना तेव्हा नात्यांची खरी परीक्षा किंवा कसोटी असते. ही माणसाला श्रीमंत बनवत असते. जिव्हाळा, आपुलकी देते. रोज बोलणं होत नाही... चालेल! रोज भेटणं होत नाही... चालेल! पण एक अशी खात्री असावी, विश्वास असावा की नात्याची गॅरंटी असावी. आपला माणूस आपल्याला सोडून कुठे जाणार नाही. ती एक खात्री. शब्दाचे मोल स्वरात किंवा सुरात कळले पाहिजे. एकमेकांना जपले पाहिजे, ओळखले पाहिजे, एकमेकांचे झाले पाहिजे. आदरभाव, सन्मान, काळजी, प्रेम यांना नात्यात जागा असते. द्वेष, मत्सर, कपट यांना कधीच नात्यात जागा नसते. शब्दाला किंमत दिली जाते. शब्द हातावर ओंजळीमध्ये घेतले, झेलले जातात, अाशा तिथेच पूर्ण होतात. नाती टिकावीत म्हणून संवादाचा गोडवा असावा. प्रेमळ साथ असावी. अडचणीच्या वेळेस सोबत असावी. संवेदनशीलता असावी.

जो माणूस संवेदना किंवा भावनाशून्य असतो तो माणूस कसला? एखादा जीवाभावाचे नातं टिकवायचं तर तिथे मायेचा ओलावा असला पाहिजे! हे एक हक्काचं, विश्वासाचं प्रतीक असलं पाहिजे आणि ती मनाला खात्री असली पाहिजे. समजूत घालण्यापेक्षा एकमेकांना समजून घेणं जास्त चांगलं. स्वतःपेक्षा जेव्हा व्यक्ती दुसऱ्या प्रेम करते तेव्हा त्या व्यक्तीच्या अपेक्षाही नि:स्वार्थ असतात. प्रत्येकाने गुणदोषासहित आपल्या माणसाला, प्रियजनांना आयुष्यभरासाठी स्वीकारावे आणि जपावे. मग ते नातं कोणतंही असो. नातं हे विश्वासावरच फुलतं, सजतं, डोलतं आणि बहरतं.

काही नाती बाजारू, व्यवहारी असतात. वेगळी असतात, खोटी स्वार्थाने बरबटलेली. निखळ मैत्री, निर्मळ मन, निरपेक्ष साथ ही भावभावनांची असावी. शरीराचे आकर्षण म्हणजे प्रेम नसतं. ते तर नातं कधीच होऊ शकत नाही. प्रेमाच्या नावावर नात्यात मनाचे बांध फुटतात. एखाद्या प्रेमात विरह झालेल्या तरुण-तरुणीला विचारा मनाची अवस्था काय होत असते. ते आहे आकर्षण! विरोधाभास!! लबाडीने केलेली कोणतीच गोष्ट आयुष्यात कधीच पुरत नाही. त्याला डाग लागतो. अविस्मरणीय पण खऱ्या प्रेमाला कसलाच पुरावा, पैसा, प्रलोभन्यांची गरज नसते. आकर्षण, चैन, हव्यास याने बरबटलेली नाती बेगडी असतात. सहज तुटतात. संवाद संपला तर वाद सुरू होतो.

मी पणा, अहंकार सारे बाजूला सारून समोरच्याचा मनाचा प्रेमाचा विचार आणि स्वीकार करावा. यासाठी समोरच्याने देखील संवेदनशील सौजन्य जपावे. आठवण झाली की, हक्काने झटकन बोलता यावी अशी मोकळीक नात्यात असते. नातं जपावं. मन जपावं. लोक म्हणतात नातं टिकवायला हिम्मत लागते पण माझ्या मते नातं टिकवायला हिम्मत नाही समोरच्याच्या मनात आपली किंमत लागते. कधी कधी होतं काय आपण चंदन असूनही समोरचा आपल्याला लाकूड समजून बसतो. खऱ्या हिऱ्याची किंमत ती व्यक्ती हातातून निसटल्याशिवाय कळत नसते. आयुष्यात ज्याने गमावलेय त्याला विचारा नात्याची किंमत आणि मनाची अवस्था.

जीवापाड जीव लावणारा माणूस हरवणाऱ्याला विचारा! त्या प्रामाणिक प्रेमाला जुमानणारी माणसं सुद्धा असतात जगात. रंगलेल्या गालांचे मुके घेणारी दुनिया बेलगाम आहे. आभासी झगमगीत आहे. येथे खऱ्यांना, भल्यांना प्रत्यय आला की सबक मिळतो. भावनांशी खेळणारी माणसे हृदय तोडून जातात. त्यांना धडा मिळाल्याशिवाय कळत नाही. आपलं कोण आणि परक कोण? मग ती उदासीनता, बैचेनी, खिन्नता आणि उजाडलेलं जग यामुळे जगण्यातील सुंदरता नष्ट होते. यावर अनुभवास मिळते ती नात्यातील सुंदरता! जाग वेळीच येणं गरजेचं असतं. मग ती झोपेतून असो वा जागेपणी. असो. खरं खोटं तपासून बघा. पारखून बघा. चकाकतं ते सोनं नसतंच ते खोटंही असू शकतं. खऱ्या बावनकशी सोन्याची निवड, तो खरेपणा भाग्यात असायला लागतो. नात्याला मोजमाप नाही पण माफ करणं असतं. नात्यात गोत्र नाही पण पात्रता असावी. हा खरेपण ज्याला कळला तो खरा जिंकला. नात्याकडे व्यवहार म्हणून पाहू नका. तरच नातं चमकेल आणि चेहराही! त्याचबरोबर आयुष्यही उजळेल आणि जीवनही. नातं म्हणजे आयुष्याचा उत्सव! नातं म्हणजे निभावलं तर जिवंतपणे स्वर्ग; नाहीतर जिवंतपणे मरणयातना! नातं हे दोन्ही बाजूने मनाने विश्वासाने जिंकायचे असतं.यातच आयुष्याचा उत्सव साजरा करता येतो. जीवनही सजतं हीच खरी नात्याची सुंदरता.

Comments
Add Comment