स्वयंप्रतिमा

गोष्ट लहान, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर


मनुष्याच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे त्याची स्वयंप्रतिमा. स्वयंप्रतिमा म्हणजे व्यक्तीने स्वतःबद्दल मनात तयार केलेले चित्र. आपण कसे आहोत, आपल्यात कोणत्या क्षमता आहेत, आपण काय करू शकतो किंवा करू शकत नाही. याबद्दलची आपली जी धारणा असते, तीच आपली आत्मप्रतिमा (स्वयंप्रतिमा) असते.


एखाद्या व्यक्तीची प्रगती, आत्मविश्वास आणि यश हे मोठ्या प्रमाणावर त्याच्या आत्मप्रतिमेवर अवलंबून असते. जर एखाद्या व्यक्तीची स्वतःबद्दलची भावना सकारात्मक असेल, तर तो कोणत्याही अडचणीला धैर्याने सामोरे जातो. उलट स्वतःबद्दल नकारात्मक विचार असतील, तर माणूस आपल्या क्षमतांचा उपयोगच करू शकत नाही.
आत्मप्रतिमा कशी घडते?


आत्मप्रतिमा एका दिवसात तयार होत नाही. ती अनेक गोष्टींमुळे तयार होत असते. बालपणीचे संस्कार, पालक, शिक्षक आणि समाजाकडून मिळणारे प्रोत्साहन,
यश आणि अपयशाचे अनुभव, स्वतःबद्दल केलेले विचार आणि आत्मसंवाद, जर लहानपणापासून मुलांना प्रोत्साहन, विश्वास आणि प्रेम मिळाले, तर त्यांची आत्मप्रतिमा
मजबूत होते.



सकारात्मक आत्मप्रतिमेचे महत्त्व


सकारात्मक आत्मप्रतिमा असलेली व्यक्ती आत्मविश्वासाने निर्णय घेते, अपयशातून शिकते, नवीन गोष्टी करण्याची तयारी ठेवते, इतरांशी आदराने वागते, समाजात आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून उभी राहते , अशा व्यक्तीला यश मिळवण्यासाठी बाहेरील परिस्थितीपेक्षा स्वतःवरील विश्वास अधिक मदत करतो.



आत्मप्रतिमा सुधारण्यासाठी काय करावे?


आत्मप्रतिमा सुधारण्यासाठी काही गोष्टींचा अवलंब करणे आवश्यक आहे -
१. स्वतःच्या गुणांची जाणीव ठेवावी.
२. नकारात्मक विचारांऐवजी सकारात्मक विचार करावेत.
३. छोट्या यशाचेही कौतुक करावे.
४. सतत शिकण्याची आणि स्वतःला सुधारण्याची वृत्ती ठेवावी.
५. स्वतःची तुलना इतरांशी न करता स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे.


स्वयंप्रतिमा म्हणजे आपल्या आयुष्याचा पाया आहे. जशी आत्मप्रतिमा तशी व्यक्तीची वाटचाल. म्हणून प्रत्येकाने स्वतःकडे सकारात्मक दृष्टीने
पाहणे आणि स्वतःवर विश्वास ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.


“ज्याची आत्मप्रतिमा मजबूत असते, त्याच्यासाठी अशक्यही शक्य होते.”
शाळा, महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षण दिले जाते. वेगवेगळे विषय शिकविले जातात. जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण देणे गरजेचे आहे. आपल्यामध्ये गुणांची वृद्धी व्हावी, बेरीज व्हावी व दोषांची वजाबाकी व्हावी. आपले जीवन यशस्वी होण्यासाठी आत्मप्रतिमा चांगली असली पाहिजे.


आपल्या आवडी-निवडी, क्षमता, अभियोग्यता, अभिव्यक्ती यांच्या आधारे स्वतःची योग्यता-अयोग्यता तपासून मनात स्वतःचे एक मानसिक चित्र तयार होते त्यालाच स्वयंप्रतिमा किंवा आत्मप्रतिमा असे म्हणतात. आपले व्यक्तिमत्त्व कसे आहे याचा शोध स्वयंप्रतिमेत घेता येतो. आपण कसे आहोत व कसे असायला पाहिजे यामधील अंतर हे वास्तव स्वयंप्रतिमा व आदर्श स्वयंप्रतिमा यामधील अंतराइतके असते. यामधील अंतर कमी करण्याइतपत जर विकास घडला तरच ध्येयापर्यंत पोहोचता येते व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतात.


जर आपल्याला स्वतःबद्दल विश्वास वाटत असेल, आपल्याबद्दल खात्री वाटत असेल, जगाच्या पाठीवरील सर्व प्रकारची सुखाची साधने उपभोगण्याची पात्रता आपल्यात आहे असे वाटत असेल तरच आपली स्वयंप्रतिमा सकारात्मक असते. आपल्यातील याच प्रकारची स्पंदने बाहेर पडतात. ती विश्वातील याच प्रकारची स्पंदने आपल्याकडे आकर्षितात व आपल्या वाट्याला सर्वप्रकारची सुखाची साधने प्राप्त होतात. आपली स्वयंप्रतिमा नकारात्मक असेल, विश्वातील चांगल्या गोष्टींचा उपभोग घ्यायला आपण पात्र नाही असे वाटत असेल, तर खालावलेली परिस्थिती आपल्या वाट्याला येते म्हणून रामदास स्वामी म्हणतात,


“मना त्वाचि रे पूर्व संचित केले।
तयासारखे भोगणे प्राप्त झाले ।”


आपण गरीब असलो, ग्रामीण भागातील असलो, बाह्य व्यक्तिमत्त्व फारसे आकर्षक नसले तरी आपली मानसिकता सकारात्मक असली पाहिजे. ऐष आरामाचे जीवन आपल्यासाठी नाही. आमच्या नशिबी कुठले सुख, भाग्य आमच्या वाट्याला येणार नाही, उच्चस्तरीय गोष्टी आपल्याला जमणार नाहीत. आपला प्रभाव इतरांवर पडणार नाही या विचारांमुळे स्वयंप्रतिमा दूषित होते. या प्रकारची वैचारिक स्पंदने बाहेर पडतात व त्याच प्रकारची परिस्थिती आपल्या वाट्याला येते.


स्वयंप्रतिमा जितकी स्वच्छ, सुस्पष्ट व निकोप असेल तेवढ्या प्रमाणात विकास प्रक्रियांची सुसंगती घडून आणता येते. नवीन अनुभवांचे संस्कार प्रभावीपणे करता येतात.
आत्मप्रतिमा बदलली, तर संपूर्ण व्यक्तिमत्त्वात बदल होऊ शकतो. बालपणीच्या संस्काराचा आत्मप्रतिमा तयार होण्यात सिंहाचा वाटा असतो. ज्यांना बालपणात खूप भीती दाखविली जाते त्या व्यक्ती भित्र्या बनतात. रागीट व्यक्ती वातावरण बिघडवितात.


लोक ऊणे-दुणे काढतात, चिकित्सक सारखी चौकशी करत असतात. प्रेमळ लोक अंत:करणाला पाझर फोडतात. आत्मप्रतिमेवर उमटणारे ठसे स्वभाववैशिष्ट्ये बनतात.
आपल्या आयुष्याची किंमत कुमारवयात कळणे आवश्यक आहे. या वयातच आत्मप्रतिमा बदलल्यास आयुष्याचे मोल वाढते. यासाठी मनाच्या विशिष्ट अवस्थेत जाऊन (अल्फा अवस्था) अंतर्मनाला सूचना देता येतात. माझ्यामध्ये दररोज आत्मविश्वास वाढत आहे. प्रत्येक बाबतीत प्रत्येक दिवशी मी जास्तीत जास्त चांगला होत आहे. जगामधील सर्व सुखाची साधने उपभोगण्यास मी पात्र आहे. मी जगप्रवास करणार आहे. माझ्या आयुष्यात मला सुख-शांती व समाधान मिळणार आहे. मी जनसेवा करणार आहे. मी भरपूर कष्ट व मेहनत करणार आहे. अशा सूचना अंतर्मनाला देऊन आत्मप्रतिमा बदलता येते.


आपल्या देशातील सर्व मुला-मुलींच्या आत्मप्रतिमा निकोप ठेवणे, आत्मप्रतिमा विस्कळीत असल्यास अंतर्मनाला सूचना देऊन त्यामध्ये इच्छित बदल घडविणे या दृष्टीने प्रयत्न केल्यास व्यक्तिमत्त्वात बदल होऊन ते मनुष्यबळ देशाला उपयोगी पडेल व देशाचा विकास होईल.

Comments
Add Comment

समस्या...?

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ सोशल मीडियावर एक बातमी वाचली. त्या बातमीतील घटना खूप अस्वस्थ करून गेली. त्या

मला शिकायचंय...

कथा : रमेश तांबे सुरज एक शाळकरी मुलगा होता. हातात पिशवी नाही की खिशात पैसे नाहीत. बाबांच्या टोचून बोलण्याचा त्याला

वाचनाचे महत्त्व?

कथा : प्रा. देवबा पाटील उद्या सीता व नीताची मावशी तिच्या गावाला जाणार होती. म्हणून त्या थोड्याशा नाराजच होत्या.

बाई माणूस म्हणून जगताना...!

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ आज ‘जागतिक महिला दिन’ आहे. हा दिवस जगभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे साजरा

स्वत:ची ओळख, स्वत:ची ताकद - आजची स्त्री, उद्याचा भारत!

गोष्ट लहान, अर्थ महान : शिल्पा अष्टमकर आजची स्त्री म्हणजे केवळ घराची जबाबदारी सांभाळणारी व्यक्ती नसून, ती शिक्षण,

हुशारी

कथा : रमेश तांबे शिक्षणाचा अधिकार या नियमाखाली शहरातल्या मोठमोठ्या इंटरनॅशनल शाळांमध्ये काही जागा गरीब