Saturday, March 14, 2026

सुरक्षित उत्पादने, आश्वस्त ग्राहक

सुरक्षित उत्पादने, आश्वस्त ग्राहक

ग्राहक दिन ; स्नेहल नाडकर्णी

माणसाचं समाधान वाढण्याऐवजी अपेक्षा वाढतात तेव्हा तो अधिक भौतिक सुखं मिळवण्याच्या मागे लागतो. अर्थात माणसाने असमाधानी राहण्यात कंपन्यांचा फायदाच असतो. कंपन्या सातत्याने जाहिरातबाजी करतात अन् सामान्य माणूस त्याला बळी पडतो. सुखाच्या मागे धावता धावता मानसिक असुरक्षितता, फसवणूक मात्र वाट्याला येते. तेव्हा ग्राहक हिताची पायमल्ली झाल्याची जाणीव माणसाला होते. अशा वेळी माणूस ग्राहक संरक्षण कायद्याचा आधार शोधतो.

अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी १५ मार्च १९६२ रोजी अमेरिकन काँग्रेसमध्ये ग्राहकांच्या हक्कांवर ऐतिहासिक भाषण केले आणि ग्राहक हक्कांना अधिकृत मान्यता देणारे ते पहिले जागतिक नेते ठरले. त्यानुसार जगभरात सर्वप्रथम अमेरिकेतील नागरिकांना ग्राहक हक्क लाभले. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन १९८३ मध्ये पहिला जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी १५ मार्च रोजी जगभरात जागतिक ग्राहक दिन साजरा केला जातो.

‘आंतरराष्ट्रीय ग्राहक संघटने’च्या (कन्झ्युमर इंटरनॅशनल) चळवळीमुळे १९८५ मध्ये संयुक्त राष्ट्राची ग्राहक संरक्षण मार्गदर्शक तत्त्वे अस्तित्वात आली. त्या आधारे २४ डिसेंबर १९८६ मध्ये भारतात ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत भारतीय ग्राहकांना पुढील ६ अधिकार देण्यात आले आहेत.

१. माहितीचा अधिकार प्रत्येक ग्राहकाला कोणत्याही उत्पादनाची किंवा सेवेची शुद्धता, किंमत आणि गुणवत्ता याबाबत माहिती विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे.

२. निवडीचा अधिकार ग्राहकाला आपल्या इच्छेनुसार कोणतीही वस्तू किंवा सेवा निवडण्याचा अधिकार आहे. दुकानदार कोणत्याही ग्राहकाला एखादे विशिष्ट उत्पादन घेण्यास भाग पाडू शकत नाही.

३. सुरक्षिततेचा अधिकार ग्राहकांना सुरक्षित उत्पादने आणि सेवा मिळणे, हा त्यांचा अधिकार आहे.

४. ग्राहक शिक्षणाचा अधिकार ग्राहकांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करण्यासाठी सरकारने वेळोवेळी ‘जागो ग्राहक जागो’ सारख्या उपयुक्त मोहिमा राबवाव्यात.

५. मत ऐकले जाण्याचा अधिकार जर कोणत्याही ग्राहकासोबत अन्याय झाला असेल तर ग्राहकाला त्याविरुद्ध आवाज उठवण्याचा पूर्ण अधिकार आहे.

६. निवारण मिळविण्याचा अधिकार

ग्राहक न्यायालयामध्ये आपली बाजू मांडून न्याय मिळविण्याचा अधिकार ग्राहकाला आहे. भारतात अधिक ग्राहकाभिमुख आणि विस्तारीत ग्राहक संरक्षण कायदा २०१९ लागू करण्यात आला आहे. ‘उत्पादन दायित्वा’चे प्रकरण समाविष्ट करून या कायद्यांतर्गत ग्राहकांना अधिक संरक्षण देण्यासाठी दोषपूर्ण उत्पादने किंवा सेवांमुळे ग्राहकांना होणारे नुकसान, वैयक्तिक दुखापत किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्यास उत्पादक, विक्रेते आणि सेवा प्रदाते भरपाई देण्यास जबाबदार असतात.

सुरक्षित उत्पादनांसाठी, बाजारपेठेतील गैरव्यवहार आणि ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी जागतिक आणि स्थानिक पातळीवरून काय केले पाहिजे याचे मार्गदर्शन करण्यासाठी ‘कन्झ्युमर इंटरनॅशनल’ ही ग्राहक शिखर संघटना काम करत असते. या संघटनेचे जवळपास १०० देश आणि २०० ग्राहक संघटना सभासद आहेत. ही संघटना ग्राहक हितरक्षणार्थ वेगवेगळे विषय विचारात घेऊन प्रत्येक वर्षाची विशिष्ट संकल्पना जाहीर करते. यामुळे ग्राहकांचे लक्ष महत्त्वाच्या मुद्द्यांकडे जाऊन त्यांच्यात जागरूकता निर्माण होते. जागतिक डिजिटल बाजारपेठेत, ग्राहकांचा विश्वास आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारी उत्पादन सुरक्षा ही वेगाने निर्माण होणारी एक गंभीर समस्या आहे. यावर्षी १५ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या जागतिक ग्राहक दिनानिमित्त ‘Safe products Confident Consumer’ किंवा ‘सुरक्षित उत्पादने, आश्वस्त ग्राहक’ ही थीम जाहीर करण्यात आली आहे. सामान्य ग्राहक अनेकदा त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत अनभिद्य असतात. त्यांचा आवाज दडपला जाऊ नये यादृष्टीने हा दिवस महत्त्वाचा ठरतो.आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ जाहिरात करून ग्राहक टिकवता येत नाही, तर व्यवसायवृद्धीच्या दृष्टीने उत्पादनाचा दर्जा आणि सुरक्षितता सर्वोच्च असणे उत्पादकाची नैतिक जबाबदारी आहे. अन्नापासून ते औषधांपर्यंत आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून ते डिजीटल उत्पादनांपर्यंत हजारो उत्पादने तसेच बँक, विमा इत्यादी विविध सेवा बाजारपेठेत उपलब्ध आहेत. त्या उत्पादनात व सेवेत जेवढी पारदर्शकता आणि सुरक्षितता असेल, तेवढा ग्राहक अधिक आश्वस्त राहील.

ग्राहकांची सुरक्षितता विविध प्रकारची असते. अन्नपदार्थ भेसळमुक्त आणि पोषक असणे यासाठी भारतीय अन्नसुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) अन्नाच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवते. तसेच भारतीय मानक ब्युरो (BIS)द्वारे पडताळणी करून संबंधित उत्पादने ‘ISI’, ‘CRS’, ‘Hallmark’ने प्रमाणित केली जातात. म्हणूनच खाद्यपदार्थांवर ‘FSSAI’ किंवा ‘Agmark’, औद्योगिक व इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर ‘ISI’ किंवा ‘CRS’ मार्क, सोन्यावर ‘Hallmark’ असणे म्हणजे उत्पादनांच्या गुणवत्तेची आणि सुरक्षिततेची हमी.

वापरकर्त्याच्या गोपनीयतेचे आणि डेटाचे रक्षण करणे. गोळा केलेला कोणता डेटा कसा वापरला जातो, याची स्पष्ट माहिती ‘नियम व अटी’मध्ये असणे. वापरकर्त्याची संवेदनशील माहिती स्टोअर करताना आणि पाठवताना ती एनक्रिप्टेड असणे. सायबर धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी सॉफ्टवेअर सतत अपडेट करणे. फसवणूक झाल्यास चॅटबॉटद्वारे तत्काळ डिजिटल प्रतिसाद व स्थानिक भाषेत हेल्पलाईन उपलब्ध असणे म्हणजे वापरकर्त्याच्या दृष्टीने ते ‘सुरक्षित डिजिटल उत्पादन’ ठरू शकते. ह्याची जाणीव असणे ग्राहक हिताय ठरते.

उत्पादकांनी सुरक्षिततेची कास धरल्यास आणि ग्राहकांनी जागरूकतेचा वसा घेतल्यास एक सुदृढ समाज घडू शकतो. थोडक्यात, “सुरक्षित उत्पादन, ग्राहकाची शान; ग्राहक हक्कांचा ठेवा मान!” mgpshikshan@gmail.com

Comments
Add Comment