समस्या...?

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ


सोशल मीडियावर एक बातमी वाचली. त्या बातमीतील घटना खूप अस्वस्थ करून गेली. त्या घटनेचा सारांश देते. साधारण चाळिशीचे जोडपे. दिसायला खूप सुंदर. अगदी चार-पाच वर्षे एकमेकांना जाणून घेऊन प्रेमविवाह केलेले!


एके दिवशी एक घटना घडली आणि त्या दुर्दैवी घटनेची नोंद सीसीटीव्हीने घेतलेली होती. रात्री १२ च्या सुमारास हे चाळिशीचे जोडपे बराच वेळ रेल्वे क्रॉसिंग गेटजवळ उभे होते. त्यांना दूरवरून एक एक्स्प्रेस गाडी येताना दिसली आणि ते शांतपणे एकमेकांचा हात घट्ट हातात धरून रेल्वे रुळावर जाऊन उभे राहिले. याच सीसीटीव्हीने त्यांच्या शरीराच्या कुठे आणि कशा ठिकऱ्या उडाल्या याचीही व्यवस्थित नोंद घेतली. त्यानंतर जेव्हा या दोघांनी केलेल्या आत्महत्येचा तपास केला गेला तेव्हा लक्षात आले की, त्यांना मूलबाळ होत नसल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. बाकी बातमीत त्या दोघांची नावे, ते कोणत्या गेटजवळ उभे होते, कोणत्या गाडीने त्यांना उडवले वगैरे माहिती आहेच, जी या लेखात देणे मला जरूरी वाटली नाही.


माणसाचा मृत्यू कदाचित मला कमी अस्वस्थ करतो; परंतु ‘आत्महत्या’ ही गोष्ट मला खरंच खूप जास्त अस्वस्थ करते. ‘मूलबाळ न होणे’ ही समस्या आहे का? किंवा अगदी ठरवून काही जोडपी ‘मूलबाळ होऊ देत नाहीत’ हीसुद्धा समस्या आहे का? जगात अगणित समस्या आहेत. त्या सर्व समस्यांपेक्षा आपली समस्या कमी महत्त्वाची आहे, असे का मानले जात नाही? असा का विचार केला जात नाही?


आजच्या काळात असंख्य अनाथाश्रम आहेत तिथून एखादे मूल दत्तक घेऊन त्यांनी वाढवले असते, तर चालले नसते का? एका जीवाला कुटुंब मिळालं असतं आणि एका कुटुंबाला कदाचित जीवदान...!


जेव्हा कोणता तरी टोकाचा निर्णय घ्यायचा असतो आणि ती गोष्ट आपल्याला ती चुकीची की बरोबर, हे जाणून घेण्यासाठी कदाचित घरात वयस्कर माणसे नसतील, कदाचित नातेवाईक आणि शेजारीपाजारी सुद्धा जवळचे वाटत नसतील तरीसुद्धा अनेक मानसोपचार तज्ज्ञ आहेत, त्यांच्याकडे हे का जात नाहीत?


अत्यंत सुदृढ, उच्चशिक्षित, समाजात नावलौकिक असणारी, आर्थिक सुबत्ता असणारी माणसेसुद्धा मानसिक रुग्ण होतात याचे वाईट वाटते. आपण एखाद्या समस्येला तोंड देऊ शकत नाही, त्याचा आपल्याला त्रास होतोय हे सुरुवातीला तरी आपल्याला कळत असते तेव्हाच स्वतःहून मानसोपचार तज्ज्ञाकडे जाण्याची गरज असते. आजकाल मनाला उपचार होऊ शकेल अशी अतिशय उत्तम औषधोपचार पद्धती असल्याचे अनुभव डॉक्टरांकडून आणि ज्यांनी अशा तऱ्हेचे उपचार घेतले आहेत त्यांच्याकडूनही ऐकले आहेत.


दात दुखायला लागल्यावर आपण दंतवैद्याकडे जातो, ताप आल्यावर आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जातो, हात तुटल्यावर हाड वैद्यांकडे जातो आणि तो जोडून घेतो तसे सहजपणे मानसिक समस्या निर्माण झाल्यावर आपण मानसोपचार तज्ज्ञाकडे का जात नाही? तिथे जाणे कमीपणाचे वाटते का? किंवा डॉक्टर काही औषध, गोळ्या देईल; परंतु आपली समस्या काही मिटवू शकणार नाही असे त्यांना वाटते का? काही कळत नाही. अशा दुर्दैवी घटना घडून गेल्यानंतर त्याच्या बातम्या मिळतात.


असो. माझ्या ओळखीच्या एका कुटुंबाने एक मुलगी दत्तक घेतली आणि तिला शिकवून त्यांनी डॉक्टर केले. तिला त्यांनी दत्तक घेतले तेव्हा ती दीड वर्षांची होती पण ती जेव्हा पाचवीत गेली तेव्हा त्या दांपत्याने तिला समोर बसवून तू आमची ‘दत्तक’ मुलगी आहेस हे समजावून सांगितले. इतकेच नव्हे तर तिला त्या अनाथाश्रमात घेऊन गेले जिथून त्यांनी तिला दत्तक घेतले होते. तीन-चार तास त्या अनाथाश्रमात घालवल्यावर तिला स्वतःचे कुटुंब असल्याचे महत्त्व लक्षात आले. तिच्या आई-वडिलांचे प्रेम लक्षात आले. इथपर्यंतची ही घटना सामान्य आहे पण त्या पुढची घटना मात्र आपल्याला विचार करायला लावणारी आहे. मुलगी पंचवीस वर्षांची झाली आणि तिच्या आई-वडिलांना या मुलीच्या लग्नाचे वेध लागले; परंतु मुलीने आई-वडिलांना अशी अट घातली की, जो मुलगा माझ्याशी लग्न करेल तो लग्नानंतर लगेचच अनाथ बालकाचे पालकत्व स्वीकारण्याची जबाबदारी माझ्या सोबतीने आनंदाने उचलेल त्याच्याशीच मी लग्न करणार!


या लेखाच्या शेवटी जाता जाता मला हेही सांगायला आवडेल की, समाजात चांगल्या विचारांची माणसे खूप असतात. तिला योग्य जोडीदार मिळाला आणि आज ती दोन मुलांची आई आहे आणि त्यातील एक मूल हे दत्तक आहे!


pratibha.saraph@ gmail.com

Comments
Add Comment

स्वयंप्रतिमा

गोष्ट लहान, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर मनुष्याच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे

मला शिकायचंय...

कथा : रमेश तांबे सुरज एक शाळकरी मुलगा होता. हातात पिशवी नाही की खिशात पैसे नाहीत. बाबांच्या टोचून बोलण्याचा त्याला

वाचनाचे महत्त्व?

कथा : प्रा. देवबा पाटील उद्या सीता व नीताची मावशी तिच्या गावाला जाणार होती. म्हणून त्या थोड्याशा नाराजच होत्या.

बाई माणूस म्हणून जगताना...!

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ आज ‘जागतिक महिला दिन’ आहे. हा दिवस जगभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे साजरा

स्वत:ची ओळख, स्वत:ची ताकद - आजची स्त्री, उद्याचा भारत!

गोष्ट लहान, अर्थ महान : शिल्पा अष्टमकर आजची स्त्री म्हणजे केवळ घराची जबाबदारी सांभाळणारी व्यक्ती नसून, ती शिक्षण,

हुशारी

कथा : रमेश तांबे शिक्षणाचा अधिकार या नियमाखाली शहरातल्या मोठमोठ्या इंटरनॅशनल शाळांमध्ये काही जागा गरीब