Sunday, March 15, 2026

इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू जीवंत आहेत की... ?

इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू जीवंत आहेत की... ?

तेल अविव : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या मृत्यूचे वृत्त व्हायरल होत आहे. पण इस्रायल सरकारच्या प्रवक्त्याने हे वृत्त फेटाळले आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू जीवंत आणि सुखरुप आहेत असे प्रवक्त्याने सांगितले.

पश्चिम आशियात अमेरिका आणि इस्रायल यांनी संयुक्तपणे इराण विरोधात युद्ध पुकारले आहे. या युद्धाची सुरुवात २८ फेब्रुवारी २०२६ रोजी झाली. आज म्हणजेच रविवार १५ मार्च रोजी युद्धाने १६ व्या दिवसांत प्रवेश केला आहे. युद्धाला दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. पण अमेरिकेच्या अपेक्षेप्रमाणे इराण शरण आलेला नाही. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प ट्रुथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून सातत्याने इराणला मोठे दणके दिल्याचे सांगत आहेत. तर इराण अधूनमधून आखाती देशांतील पंचतारांकीत हॉटेल, बहुराष्ट्रीय बँकांची कार्यालये, आंतरराष्ट्रीय विमानतळ, अमेरिकेचे आखाती देशांतील तळ, अमेरिकेचे रडार स्टेशन आदी ठिकाणी हल्ले केल्याचे सांगत आहे. इराणची लढण्याची बरीचशी ताकद नष्ट केल्याचे ट्रम्प सांगत आहेत. पण अमेरिकेची अवघ्या १६ दिवसांत दोन लढाऊ विमानं आणि सहा हवेत इंधन भरणारी केसी १३५ स्ट्रॅटोटँकर अशी एकूण आठ विमानं पाडल्याचे इराण सांगत आहे.

इराण विरुद्ध आपलीच सरशी होत असल्याचे सांगणाऱ्या अमेरिकेने हळू हळू युद्धात मारल्या गेलेल्या स्वतःच्या सैनिकांची नावं जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे खरं काय आणि खोटं काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. या संभ्रम निर्माण करणाऱ्या वातावरणात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या मृत्यूचे वृत्त व्हायरल झाले. पण वृत्त व्हायरल झाल्यानंतर काही तासांनी इस्रायल सरकारच्या प्रवक्त्याने पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू जीवंत आणि सुखरुप असल्याचे सांगितले.

शुक्रवारी एक व्हिडीओ एक्स अर्थात ट्विटरवरून व्हायरल झाला होता. यात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू युद्धाविषयी पत्रकारांशी बोलताना दिसत होते. या भाषणात दिसत असलेल्या पंतप्रधान नेतन्याहू यांच्या हालचाली अतिशय मर्यादीत आहेत. हा व्हिडीओ एडिट केला आहे किंवा एआयच्या मदतीने तयार केला आहे, असे मत अनेकांनी सोशल मीडियाद्वारे व्यक्त करायला सुरुवात केली. व्हिडीओत बराच वेळ इस्रायलचे दोन ध्वज आणि मागील पडदा एकदम स्थिर असल्याचे सांगत सोशल मीडिया युझरनी तर्कवितर्क करायला सुरुवात केली होती. काही युझरनी तर नेतन्याहू यांच्या हाताला पाच बोटे असताना व्हिडीओत थोडा वेळ पंतप्रधानांच्या बोटाला सहा बोटे कशी दिसत आहेत असा प्रश्न उपस्थित करून व्हिडीओच्या सत्यतेविषयी शंका उपस्थित केली. यानंतरच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या मृत्यूचे वृत्त व्हायरल झाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा