गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला...

विशेष; मीनाक्षी वैद्य


हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला येणारा हा नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. अनेक औचित्य असणारा हा सण दारात उभा आहे. हल्ली अशा प्रसंगी आनंदाचे शिखर गाठताना ग्राहक व्यवसायवाढीसाठी आखल्या जाणाऱ्या धोरणाच्या शृंखलेत असा अडकतो की, पुढे हप्ते फेडणे कठीण होते. सण जोशात साजरा व्हावा, पण सणांबरोबर रूढ होऊ लागलेले जोरदार खरेदीसारखे नवे प्रघात काळजीपूर्वक अंगीकारण्याची गरज जाणवते.


आपण भारतीय प्रत्येक सणाचे फार धुमधडाक्यात स्वागत करतो. भारतीयांना सण साजरे करायला फार आवडतात. सणासुदीला काय काय करायचे, याचे इमले सगळेजण सणाआधीच बांधायला सुरुवात करतात. हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला येणारा हा नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण जल्लोषात साजरा केला जातो. दारासमोर बांबू उभारल्यानंतर घरचा गृहस्थ त्या बांबूला रेशमी वस्त्र गुंडाळतो. त्याला आंब्याचे तोरण, कडुलिंबाची डहाळी, साखरेची गाठी आणि फुलांचा हार घालून त्यावर चांदीचा, तांब्याचा किंवा स्टेनलेस स्टीलचा तांब्या पालथा घालून त्या थांब्यावर कुंकवाने स्वस्तिक काढतो. गुढी उभारण्यापूर्वी गृहिणी जागा स्वच्छ करून रांगोळी काढते. भारतातील कोणत्याही प्रांतात गेलो तरी मंगल प्रसंगी गृहिणीने घरासमोर रांगोळी काढणे आणि पारंपरिक पद्धतीने गृहस्थ आणि गृहिणीने वेशभूषा करणे ही परंपरा आपल्याला दिसून येते. गुढी उभारल्यानंतर कडुलिंबाची पाने आणि गूळ यांचा नैवेद्य दाखवला जातो. गुढीसमोर याच पदार्थांचा नैवेद्य का दाखवायचा, यावर विचार केल्यावर लक्षात आलं की, आपल्या पूर्वजांनी किती दूरदृष्टी ठेवून हा नैवेद्य ठेवला. चैत्र महिना ऋतूबदलाचा असतो. या बदलामुळे शरीरात काही बिघाड होऊन त्रास होऊ नये म्हणून कडुलिंबाची पानं आणि गूळ यांचं सेवन करायला सांगितलं आहे. माणूस अतिशय शंकेखोर स्वभावाचा असतो. प्रत्येक गोष्टीत शंका व्यक्त करण्याची त्याला सवय असते. ही सवय आपल्या पूर्वजांच्या लक्षात आली म्हणूनच त्यांनी गुढीसमोर नैवेद्य म्हणून कडुलिंबाची पानं आणि गूळ ठेवण्याची परंपरा सुरू केली.


नैवेद्य म्हटलं की माणूस सेवन करण्यास नकार देत नाही. नैवेद्य त्याच्याही नकळत ऋतुबदलाने होणाऱ्या त्रासापासून वाचवतो. कडुलिंबाची पानं खाल्याने आरोग्य उत्तम राहतं. शरीरातील क्षार बाहेर फेकले जातात. गुळामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढते. गुढीपाडवा महाराष्ट्राबाहेरही साजरा केला जातो. त्याचे नाव आणि सण साजरा करण्याची पद्धत वेगळी आहे. काश्मीरमधील हिंदू समाज हा दिवस ‌‘नवरेह‌’ म्हणून साजरा करतो. हा दिवस काश्मिरी पंचांगानुसार नववर्षाचा प्रारंभ असतो. चैत्र महिन्यात काश्मीरमध्ये निसर्गरम्य वातावरण निर्माण झालेले असते. वसंत ऋतू काश्मीरमध्ये अगदी हळुवारपणे पाऊल ठेवतो आणि सगळीकडे उत्साहाचा, फुलांचा, सुखद हवामानाचा वर्षाव होतो. त्यामुळे ‌‘नवरेह‌’ हा निसर्गाशी संवाद साधणारा आणि आत्मपरीक्षणाचा दिवस मानला जातो. येथे गुढी उभारण्याची परंपरा नसली तरी प्रतिकात्मक विधींमधून नववर्षाचा अर्थ अधोरेखित केला जातो. नवरेहच्या पूर्वसंध्येला घरातील ज्येष्ठ स्त्री किंवा कुटुंबप्रमुख एका ताटात तांदूळ, नाणी, पंचांग, देवप्रतिमा, दही, फुले, पुस्तक किंवा लेखणी अशा वस्तू ठेवतात. पहाटे कुटुंबातील सदस्य सर्वप्रथम त्या ताटातील वस्तू पाहतात. या प्रतिकांमधून वर्षभरातील समृद्धी, ज्ञान, अन्नधान्य आणि आर्थिक स्थैर्याची अपेक्षा व्यक्त केल्या जाते. काश्मीरमध्येही तिथले लोक पारंपरिक पद्धतीने वेशभूषा परिधान करून या दिवसाचे स्वागत करतात. तेथे या दिवशी मंदिर दर्शन केले जाते, मंदिरात विशेष प्रार्थना केली जाते तसेच पारंपरिक भोजनाची तयारी केली जाते.


चैत्र महिना अलगद येताच उत्तर भारतात नवरात्राची सुरुवात होते. या दिवशी ‌‘घटस्थापना‌’ केली जाते. घरात किंवा मंदिरात पवित्र कलश स्थापित करून देवीची उपासना आरंभ केली जाते. नवरात्रीतील नऊ दिवस उपवास केला जातो. या नऊ दिवसांमध्ये भजन-कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. त्यामुळे उत्तर भारतात एक भारावलेलं वातावरण तयार होतं. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस शक्तीच्या उपासनेचा आणि आध्यात्मिक शुद्धीचा प्रारंभ मानला जातो. उत्तर भारतात महाराष्ट्राप्रमाणे गुढी किंवा ध्वज उभारण्याची परंपरा नाही. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सामूहिक पूजा आणि मंदिरांमधील विशेष कार्यक्रमांमधून नववर्षाचे स्वागत केले जाते. काही ठिकाणी मेळावे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. उत्तर भारतात या वेळी गोड प्रसाद, पुरी-भाजी किंवा काला चना यासारखे पदार्थ नैवेद्य म्हणून दिले जातात. चैत्र हा रब्बी पिकांच्या कापणीचा काळ असतो. गहू, हरभरा आणि इतर पिकांचे उत्पादन शेतात तयार होते. त्यामुळे ग्रामीण समाजासाठी हा आनंदाचा क्षण असतो. निसर्गातील नवपालवी आणि फुलांचा बहर नववर्षाच्या आशावादाशी जोडला जातो. भारतीय कालगणना निसर्गचक्राशी निगडित असल्याचे आपल्याला या सणांमधून दिसून येते. हा सण नेमका कधीपासून सुरू झाला असेल याचा मागोवा घेतला, तर सर्वप्रथम ब्रह्मदेवांचं नाव समोर येतं. पुराणातील संदर्भानुसार या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, अशी मान्यता आहे. त्यामुळे चैत्र प्रतिपदा ही कालगणनेचा आरंभबिंदू मानली जाते. दुसरा बिंदू रामायणकाळाशी जोडला जातो.


रामायणकालीन घटना तपासता लक्षात येते की, श्री प्रभू रामचंद्र यांनी रावणाचा वध केल्यानंतर सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्यासह पुष्पक विमानाने अयोध्येला परतले. श्री रामचंद्रांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि त्यांचे भव्य स्वागत करण्यासाठी घरोघरी गुढी उभारली गेली आणि पताकांनी सगळी अयोध्यानगरी सजवली गेली. या नववर्षाच्या स्वागताचा तिसरा बिंदू शककालाशी जोडला जातो. शालिवाहन शकाची सुरुवातही चैत्र प्रतिपदेला झाल्याचे मानले जाते. या दिवसापासून शालिवाहन शक सुरू झाले. चैत्र प्रतिपदेला अशा तिन्ही बिंदूंनी मान दिला आहे. भारतात साजरे होणारे सण आणि भारतीय अर्थव्यवस्था यांचं गुणोत्तर सणांवर बरंच अवलंबून असतं. सण आले की निगडित वस्तूंनी बाजारपेठ फुलून येते. याचे उत्तम उदाहरण म्हणजेे गणेशोत्सव आणि दिवाळी. हे मुख्य सण आहेत. इतर बारीकसारीक सणांचाही बाजारपेठेवर परिणाम होत असतो. सणासुदीला अनेक तात्पुरते रोजगार निर्माण होत असतात. सणांच्या काळात खरेदी करण्याची मानसिकता वाढते. गुढीपाडवा हा ‌‘शुभारंभ‌’ मानला जात असल्याने माणूस अनेकदा मोहात पडून गरजेची नसलेली पण हवी असलेली वस्तू विकत घेतो. या वस्तू त्याने विकत घ्याव्यात म्हणून वेगवेगळे उत्पादक सवलतीचे आमिष दाखवून त्यांची क्रयशक्ती वाढवून बचत कमी करतात पण हे लोकांच्या लक्षातच येत नाही. या अानुषंगाने काही पथ्ये आणि तथ्ये आजघडीला समजून घेणे गरजेचे आहे.


सणासारख्या प्रसंगी आनंदाचे शिखर गाठण्यासाठी ग्राहक नको त्या व्यापारी मोहजालात फसतो. त्याने केलेली खरेदी ही कंपनीचा तात्पुरता वाढलेला व्यवसाय दाखवते, पण कंपनीने व्यवसायवाढीसाठी आखलेल्या धोरणाच्या शृंखलेत ग्राहक असा अडकतो की पुढे हप्ते फेडणे कठीण होते आणि ग्राहक स्वतःच्या बचतीला स्वतःच गळती लावतो. सण साजरा करणं वाईट नाही, पण सणाचा मान राहील अशा पद्धतीने साजरे करायला हवेत. या सणामुळे अनेक लहान-मोठे रोजगार निर्माण होतात. त्यामुळे बरेचजण आपली क्रयशक्ती वाढवण्याचा प्रयत्न करतो. ती खोटी क्रयशक्ती व्यावसायिक वेगवेगळ्या प्रलोभनाद्वारे ग्राहकांच्या गळी उतरवतात. आजकाल ईकॉमर्स, डिजिटल मार्केटिंगमुळे खरेदी खूपच सुलभ झाली आहे. ती खरंच सुलभ झाली आहे की आपल्या डोळ्यांसमोर चुकीच्या पद्धतीने माहिती ठेऊन ती सुलभ झाल्याचे व्यापारी आपल्या मनावर ठसवतात याचा विचार ग्राहकाने करायला हवा. सणाचं पावित्र्य बाजूला सारून आपल्या मनातील इच्छांच्या बाजारीकरणाला आपल्याही नकळत मदत होते आहे का, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आजकाल बाजूच्या घरात असलेल्या वस्तूंची बरोबरी करून तीच वस्तू आपल्या आवाक्यात नसताना खरेदी करण्याची लालसा वाढत चालली आहे. व्यावसायिक याचा सहज फायदा घेतात. या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा साजरा करताना सणाचे पावित्र्य, औचित्य जपणे महत्त्वाचे ठरते. सणांना नव्या काळात नवी झळाळी लाभत असताना जरूर अनुसरावी, पण ‌‘जुने ते सोने‌’ का मानले जाते, हे समजून घ्यायचीही तयारी असायला हवी.

Comments
Add Comment

Virat Kohli : विराटभोवती विणला विजयाचा धागा

आयपीएल 2026 साठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने संघरचनेत महत्त्वाचे बदल करत भविष्यातील यशाचा मजबूत पाया रचण्याचा

उत्तंकामुळे गुलीकाची मुक्ती

उत्तंकामुळे गुलीकाची मुक्ती: भालचंद्र ठोंबरे अधर्मी कृत्ये करणारे, पापी, दरोडेखोर यांना ऋषीमुनींनी केलेल्या

नको त्या संगतीत ‘टीनएजर्स’

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू चुकीच्या संगतीत अडकलेल्या टीनएजर्स मुलांना जेव्हा पालक कौन्सिलिंगसाठी घेऊन

लोकमाता अहिल्याबाई होळकर

स्पांदन- अशियनी शिंदे-भोईर वसई गावातील विवा कट्टा या उपक्रमात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या

‘कर चले हम सलाम…’

नॉस्टॅल्जिया: श्रीनिवास बेलसरे एक सुंदर चिंतनशील विचार अलीकडेच वाचनात आला - ‘जिना सबको नही आता, मौत सबको आती

कदाचित हा तूमचा अखेरचा चित्रपट ठरु शकतो

स्मृतीपटल : अनिल तोरणे  अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणेच ठरलेल्या वेळी चित्रपटाच्या सेटवर हजर राहणाऱ्या